शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (20:41 IST)

संजय राऊतांचे भाजपवर साडेतीन गंभीर आरोप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोप केले. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरही त्यांनी भाष्य केलं.
 
1.किरीट सोमय्या-नील सोमय्यांवर टीकास्र
शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी किरीट सोमय्या तसंच त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले.
 
सोमय्या म्हणाले, "पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरतोय हा आरोप केला. राकेश वाधवा हे यातील प्रमुख आरोपी आहेत. वाधवा यांच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटी रुपये गेले आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्यांची आहे. नील सोमय्याची आहे. आणि त्यांचा भागीदार राकेश वाधवा आहे. हे मी पुराव्यासहीत सांगत आहे. राकेश वाधवानशी यांचा आर्थिक संबंध आहे".
 
ते पुढे म्हणाले, "वसईला जमीन घेतली. सात कोटीला जमीन घेण्यात आली. एक कंपनी सुरू करण्यात आली. याचा डायरेक्टर नील सोमय्या आहे. याला पर्यावरणीय मान्यता नाहीये. आदित्य ठाकरे यांना आवाहन करतो की यात तात्काळ लक्ष घ्या, परवाने रद्द करा आणि या प्रकरणात नील सोमय्याला अटक करा".
 
"पीएमसी बँक प्रकरणातील तपास ईडी करत आहे. हे सगळे डॉक्युमेंट ईडीकडे मी तीन वेळा पाठवले आहेत. ईडीचा भ्रष्टाचार एवढा आहे की हे सगळे वसुली एजंट बनले आहेत.
 
मला ईडीला विचारायचे आहे, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे? चार महिन्यांपासून मुंबईतल्या प्रतिष्ठित बिल्डरांकडून वसुली सुरू आहे. मी मोदी आणि शहांनाही लिहिणार आहे. मुंबईतल्या सात बिल्डकरांकडून किमान 300 कोटी रुपये उकळले आहेत. जितेंद्र लवलानी, फरीद शमा, रोमी कोण आहेत? त्यांचं काय सुरू असतं",? असा सवाल राऊत यांनी केला.
 
फडणवीसांचा आणखी एक फ्रंट मॅन आहे. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: मोहित कंबोजने जमीन विकत घेतली आहे असा आरोप राऊत यांनी केला.
 
2. 'ठाकरे कुटुंबीयांचे बंगले दिसले तर राजकारण सोडेन'
राऊत म्हणाले, "ठाकरे कुटुंबीयांनी अलिबागजवळ 19 बंगले बांधल्याचा आरोप मुलुंडच्या दलालाने केला आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे कधीही सांगा आपण बसेस करू आणि त्या बंगल्यावर पिकनिक काढू. तिकडे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन.
बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू. 19 बंगले कुठे आहेत?
 
"लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा. ह्याच किरीट सोमय्याने कोर्टात याचिका दाखल केली होती की शालेय शिक्षणात मराठी भाषा सक्तीची असू, महाराष्ट्रात राहून मराठीची सक्ती नको म्हणून कोर्टात गेले".
 
"पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे विकत घेतली ते दाखवा. यात बारा लोक आहेत. बाराव्या माणसाकडून जमीन विकत घेतली. सरकार पडू देणार नाही हे सांगितल्यावर माझ्या मागे लागले. मी माझ्या आयुष्यात काहीही चुकीचं केलं नाही.
 
"माझ्या बँकेकडून मला सांगितलं की गेल्या 20 वर्षांपासूनचे स्टेटमेंट ईडी घेऊन गेले आहेत. 50 गुंठे जमिनीच्या चौकशीसाठी माझ्या गावातल्या लोकांची चौकशी केली जात आहे. ईडी दबाव टाकतंय संजय राऊतांविरोधात जबाब द्या. ते गरीब लोक आहेत. हा कुठल्या प्रकारचा तपास आहे",? असा सवाल राऊत यांनी केला.
 
"2024 नंतर काय करायचं ते बघू, आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशेबालाही लागले. फूलवाले, फटाके, मेहंदीवाल्याकडेही गेले. हे ईडीचं काम आहे का? असा प्रश्न राऊत यांनी केला. आमच्या घरात तुम्ही शिरता, मुलांच्या कामाच्या ठिकाणी, दुकानात शिरताय. जिथे जायचंय तिथे जा पण टक्कर शिवसेनेशी आहे हे लक्षात घ्या", असं राऊत म्हणाले.
 
3. राज्यातलं सरकार पाडण्याचं षडयंत्र
"महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र. महाराष्ट्र, झारखंड, बंगालचं सरकार पाडण्याचं कारस्थान सुरू आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे. आमचा DNA अजून पाहिली नाही तुम्ही, आमच्या मुलांना धमकवता तुम्ही. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. माझ्याशी वैर आहे तर माझ्याशी लढा असं सांगितलं", असं राऊत म्हणाले.
 
"मोदी, शाहांना विचारायचे आहे की हीच तुमची लोकशाही आहे का? मी अमित शहांना कॉल केला होती. मी तुमचा आदर करतो पण हे चालू असलेलं बरं नाही, तुम्ही मला टॉर्चर करा पण माझ्या निकटवर्तीयांना लक्ष्य करू नका".
 
"महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकार कायम राहणार. 2024 मध्ये देशात परिवर्तन होणार. ही पूर्ण गोष्ट नाही. व्हीडिओ, क्लिप समोर येतील. आज दिलेली माहिती केवळ ट्रेलर आहे.
 
मी शिवसैनिक आहे. संघर्ष करण्यात माझं आयुष्य गेलं आहे. मी पळून जाणार नाही" असं राऊत यांनी सांगितलं.
 
"मी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. तपास यंत्रणा असा का त्रास देतात? माझ्यावर दबाव टाकण्यात आला, सरकार पाडा असं सांगण्यात येतं, आम्हाला राष्ट्रपती राजवट आणायची आहे किॆवा आमदार द्या सरकार आणण्यासाठी. तुम्ही मदत केली नाहीत तर टाईट करू असंही सांगण्यात आलं".
 
3.5 महाआयटीत घोटाळा
"सगळ्यात मोठा घोटाळा महाआयटीमध्ये झाला, 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. निविदा न काढता टेंडर कसे मिळाले. अमोल काळे, धवांगळे कोण आहेत", असा ओझरता उल्लेख राऊतांनी केला. मनी ट्रांसफर कसे झालेत ते सगळं सांगणार. तुम्ही शिवसेनेशी, महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे.
 
भाजपचे साडेतीन तीन कोठडीत असतील असा इशारा राऊत यांनी दिला होता. साडेतीन नेत्यांची नाव एकेक करून कळतील असं राऊत पत्रकार परिषद संपताना म्हणाले.