सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (17:58 IST)

संजय राऊतांच्या एका तासाला अमृता फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भाजप-शिवसेना संघर्ष नव्याने अधोरेखित झाला आहे.
 
संजय राऊंतांनी तब्बल तासभर चाललेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. यामध्ये किरीट सोमय्या लक्ष्यस्थानी होते. केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं.
 
महाआयटीतला घोटाळ्याबाबत त्यांनी सूचित केलं. राऊतांच्या तासभराच्या पत्रकार परिषदेला अमृता फडणवीस यांनी एका ट्वीटने उत्तर दिलं आहे. आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है! असं अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.
 
मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे त्याला रोखण्यासाठी या वास्तूपासून सुरुवात करतोय. 'तुमचं मन माफ असेल, कोणाच्या बापाला घाबरू नका असं शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं' असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.
 
राऊत म्हणाले, नामर्दाप्रमाणे आमच्यावर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. अनिल परब, आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या आमच्या नेत्यावर कारवाई करत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गौरवापर सुरू आहे. खोटे आरोप केले जातात किंवा बदनाम केलं जातं. तुम्ही सरंडर व्हा नाहीतर कारवाई होईल असा दबाव टाकला जातो. बहुमत असताना भाजप नेते सरकार पाडण्याच्या तारखा का देतात?
 
"मी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. तपास यंत्रणा असा का त्रास देतात? माझ्यावर दबाव टाकण्यात आला, सरकार पाडा असं सांगण्यात येतं, आम्हाला राष्ट्रपती राजवट आणायची आहे किॆवा आमदार द्या सरकार आणण्यासाठी", असं राऊत म्हणाले.
 
राऊत पुढे म्हणाले, 170 आमदारांचं बहुमत कसं पायदळी तुडवू शकता? असं मी म्हटलं. तुम्ही मदत केली नाहीत तर तुम्हाला टाईट केलं जाईल असं सांगण्यात आलं. ठाकरे सरकारला धक्ता पोहचेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. मी नावं आता सांगणार नाही पण भविष्यात जाहीर करू.
 
"पवार कुटुंबाच्या घरांवरही धाडी पडल्या. त्यांनाही अशा धमक्या दिल्या. पहाटे चार वाजता, पहाटे तीन वाजता माझ्या घरी धाडी पडायला सुरुवात झाली. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो मला अटक होणार. तुमचं सरकार आलं नाही म्हणून ईडीचा वापर करून हे करता? बाळासाहेबांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही. मी नाही म्हणालो तेव्हापासून माझे नीकटवर्तीय, नातेवाईकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. माझी मुलं, नातेवाईक यांना बदनाम करण्यास सुरुवात केली", असं राऊत यांनी सांगितलं.
 
"माझ्या मुलांना फोन केले की घरी ईडी, सीबीआयच्या धाडी पडतील, तुमच्या वडिलांना अटक होईल. आतापर्यंत आम्ही शांत होतो. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणाले लोकांसमोर सत्य येऊ द्या. आजची पत्रकार ईडीच्या कार्यालयासमोर घेण्याची इच्छा होती. सुरुवात इथून करू, शेवट ईडीच्या कार्यालयासमोर करू", असं राऊत म्हणाले.
 
"महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, बाहेरचे लोक येऊन आमच्या घरी येणार, बायका मुलींवर दबाव आणणार. हे असं राजकारण कधी झालं नाही",
ठाकरे कुटुंबीयांचे बंगले दिसले तर राजकारण सोडेन
 
राऊत म्हणाले, "ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळ 19 बंगले बांधल्याचा आरोप मुलुंडच्या दलालाने केला आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे कधीही सांगा आपण बसेस करू आणि त्या बंगल्यावर पिकनिक काढू. तिकडे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन.
 
बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू. 19 बंगले कुठे आहेत?
 
लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा. ह्याच किरीट सोमय्याने कोर्टात याचिका दाखल केली होती की शालेय शिक्षणात मराठी भाषा सक्तीची असू, महाराष्ट्रात राहून मराठीची सक्ती नको म्हणून कोर्टात गेले".
 
पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे विकत घेतली ते दाखवा. यात बारा लोक आहेत. बाराव्या माणसाकडून जमीन विकत घेतली. सरकार पडू देणार नाही हे सांगितल्यावर माझ्या मागे लागले. मी माझ्या आयुष्यात काहीही चुकीचं केलं नाही.
 
माझ्या बँकेकडून मला सांगितलं की गेल्या 20 वर्षांपासूनचे स्टेटमेंट ईडी घेऊन गेले आहेत. 50 गुंठे जमिनीच्या चौकशीसाठी माझ्या गावातल्या लोकांची चौकशी केली जात आहे. ईडी दबाव टाकतंय संजय राऊतांविरोधात जबाब द्या. ते गरीब लोक आहेत. हा कुठल्या प्रकारचा तपास आहे? असा सवाल राऊत यांनी केला.
 
फूलवाले-मेहंदीवाल्यापर्यंत ईडी
2024 नंतर काय करायचं ते बघू, आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशेबालाही लागले. फूलवाले, फटाके, मेहंदीवाल्याकडेही गेले. हे ईडीचं काम आहे का? असा प्रश्न राऊत यांनी केला.
 
'आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. या वास्तूला एक महत्त्व आहे. अनेक लढे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात आम्ही या वास्तूतून सुरू केले आहेत. अनेक लढे या वास्तूने पाहिले आहेत. या वास्तूने दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट पचवला आहे. शिवसेनाप्रमुखांबरोबर ज्यांनी काम केलं ते सगळे नेते उपस्थित आहेत. संपूर्ण शिवसेना इथे उपस्थित आहे', असं राऊत यांनी सांगितलं.
 
गुजरातमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. दोन वर्ष तिकडे तक्रार झाली नाही असं राऊत म्हणाले.
 
आमच्या घरात तुम्ही शिरता, मुलांच्या कामाच्या ठिकाणी, दुकानात शिरताय. जिथे जायचंय तिथे जा पण टक्कर शिवसेनेशी आहे हे लक्षात घ्या असं राऊत म्हणाले.
 
महाआयटीत निविदा न काढता टेंडर
पाच वर्षांत एक दुधवाला सात हजार कोटींचा मालक कसा बनला? महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर इथे त्यांचे येणे जाणे सुरू झाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरीही त्याचे येणे जाणे होते. सात हजार कोटींमधील साडे तीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले आहेत.
 
सगळ्यात मोठा घोटाळा महाआयटीमध्ये झाला, 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. निविदा न काढता टेंडर कसे मिळाले. अमोल काळे, धवांगळे कोण आहेत? मनी ट्रांसफर कसे झालेत ते सगळं सांगणार. तुम्ही शिवसेनेशी, महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे.
 
पीएमसी बँकेतील आरोपीशी सोमय्यांचे आर्थिक संबंध
पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रा चाळ याचा संबंध लावला. माझ्या मित्रांना टार्गेट केलं जात आहे. मी पळपुटा नाही.
 
पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरतोय हा आरोप केला. राकेश वाधवा हे यातील प्रमुख आरोपी आहेत. वाधवा यांच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटी रुपये गेले आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्यांची आहे. नील सोमय्याची आहे. आणि त्यांचा भागीदार राकेश वाधवा आहे. हे मी पुराव्यासहीत सांगत आहे. राकेश वाधवानशी यांचा आर्थिक संबंध आहे.
 
वसईला जमीन घेतली. एक सात कोटीला जमीन घेतली. यावर एक कंपनी सुरू केली. याचा डायरेक्टर नील सोमय्या आहे. Environment clearance नाही. आदित्य ठाकरे यांना आवाहन करतो की यात तात्काळ लक्ष घ्या, परवाने रद्द करा आणि या प्रकरणात नील सोमय्याला अटक करा.
 
पीएमसी बँक प्रकरणातील तपास ईडी करत आहे. हे सगळे डॉक्यूमेंट ईडीकडे मी तीन वेळा पाठवले आहेत. ईडीचा भ्रष्टाचार एवढा आहे की हे सगळे वसुली एजंट बनले आहेत. मी शिवसैनिक आहे. संघर्ष करेन .
 
मला ईडीला विचारायचे आहे, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे? चार महिन्यांपासून मुंबईतल्या प्रतिष्ठित बिल्डरांकडून वसुली सुरू आहे. मी मोदी आणि शहांनाही लिहिणार आहे. मुंबईतल्या सात बिल्डकरांकडून किमान 300 कोटी रुपये उकळले आहेत. जितेंद्र लवलानी, फरीद शमा, रोमी कोण आहेत? त्यांचं काय सुरू असतं?
 
राज्यातलं सरकार पाडण्याचं षडयंत्र
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र. महाराष्ट्र, झारखंड, बंगालचं सरकार पाडण्याचं कारस्थान सुरू आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे.
 
आमचा DNA अजून पाहिली नाही तुम्ही, आमच्या मुलांना धमकवता तुम्ही. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. माझ्याशी वैर आहे तर माझ्याशी लढा.
 
मोदी, शाहांना विचारायचे आहे की हीच तुमची लोकशाही आहे का? मी अमित शहांना कॉल केला होती. मी तुमचा आदर करतो पण हे चालू असलेलं बरं नाही, तुम्ही मला टॉर्चर करा पण माझ्या निकटवर्तीयांना लक्ष्य करू नका.
 
महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकार कायम राहणार. 2024 मध्ये देशात परिवर्तन होणार. ही पूर्ण गोष्ट नाही. व्हीडिओ, क्लिप समोर येतील. आज दिलेली माहिती केवळ ट्रेलर आहे.
 
मी शिवसैनिक आहे. संघर्ष करण्यात माझं आयुष्य गेलं आहे. मी पळून जाणार नाही असं राऊत यांनी सांगितलं.
 
मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन
फडणवीसांचा आणखी एक फ्रंट मॅन आहे. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: मोहित कंबोजने जमीन विकत घेतली आहे.
 
साडेतीन नेते कोण हे उद्यापासून कळेल. अर्धा कोण, पाऊण कोण लवकरच कळेल असं राऊत यांनी सांगितलं.
 
पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याआधी राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना इथून नमस्कार करतो. ते वर्षा बंगल्यावरुन पत्रकार परिषद पाहत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी आताच फोनवर बोललो. सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन सुरू आहेत".
 
शिवसेनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेसाठी राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईतल्या दादर इथल्या शिवसेना भवनासमोर जमले आहेत.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह विनायक राऊत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी,अरविंद सावंत, उदय सामंत, आनंदराव अडसूळ, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या नेत्यांसह शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत.
 
'झुकेंगे नही' अशी पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त घटनास्थळी आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रित केली आहे.
 
सेनाभवनबाहेर स्पीकर आणि स्क्रिनची व्यवस्था केलीय. पत्रकार परिषद जाहीर ऐकवली जाणार आहे.
 
या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (14 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना तसंच केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिला होता.
"डोक्यावरुन पाणी गेलं असून आम्हीही आता सहन करणार नाही. आता आम्ही बरबाद करणार,"असा इशारा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, विरोधकांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनाही माझी पत्रकार परिषद ऐकायली हवी.
 
ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार होत आहे. त्यांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल. या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. शिवसेना हा 11 कोटी मराठी माणसांचा आवाज, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
देशात कोरोनाचा संसर्ग पसरायला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार होती. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधल्या कामगारांना रेल्वेची तिकीटं काढून दिली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.
 
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.
 
"कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत हे दाखवू, असं संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
 
संजय राऊत यांच्या या वक्तव्याची महाराष्ट्रात १४ फेब्रुवारीपासून चर्चा सुरू झालीय. राऊत दररोज राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. मात्र, काल त्यांनी घोषणा केलेल्या या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन नेत्यांची नाव जाहीर केली जातील असं म्हटलंय.
 
या पत्रकार परिषदेबद्दल आदित्य ठाकरेंनीही सूचक उत्तर दिलंय. दरम्यान, भाजपच्या या साडेतीन नेत्यांना लवकरच कोठडीत टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे राज्याचं लक्ष शिवसेना भवनात 15 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलंय.
 
या पत्रकार परिषदेवरचं आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचीही चर्चा होतेय. त्यांना या पत्रकार परिषदेबद्दल नागपूर इथे विचारलं असता ते म्हणाले की, "सामना तर होऊ द्या, आत्ताशी टॉस झाला आहे". त्यामुळे भाजपचे मोठे नेते यात अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. यापूर्वी राऊत यांच्या पत्नीलाही ईडीची नोटीस आली होती. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत.
 
यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ यांची ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देत आहेत असं राऊत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान म्हणाले होते.
 
"माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेईन," असा इशारा संजय राऊत यांनी दिल्लीतून दिला होता.
 
मात्र, संजय राऊतांची ही पत्रकार परिषद म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, "जर मी गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन. विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जातेय. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून साडेतीन लोकांची नाटकं. साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?"