शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (20:46 IST)

महाराष्ट्रात थंडीची लाट का आली आहे?

राज्यात सध्या थंडीची जोरदार लाट आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा कमी झाला आहे. देशाच्या उत्तर भागातही थंडीने कहर केला आहे. त्याचरोबर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचा प्रभाव वाढला आहे.
ही थंडी वाढण्याची कारणं काय आहेत, ती किती दिवस राहणार आहेत या प्रश्नांची उत्तरं या लेखातून शोधू या
 
थंडीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांच्याशी संवाद साधला.
 
लाट येण्यामागची कारणं
वायव्य भागातून म्हणजे राजस्थानच्या आसपासच्या भागातून आपल्याकडे सध्या वारे येत आहेत. हे वारे इशान्य, पूर्वेकडे जात आहेत. महाराष्ट्रावर आल्यावर हे वारे चक्राकार पद्धतीने वळत आहेत. बरेच लोक हा प्रश्न विचारत आहेत की कोल्हापूर किंवा लातूर भागात थंडी का जाणवत नाहीये.
 
तर त्याचं उत्तर आहे की हे वारे तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. वाऱ्यांच्या या प्रवाहामुळे आपल्याला सगळ्यात जास्त थंडी विदर्भात 8 जानेवारी नंतर जाणवायला लागली. 9-10 तारखेपर्यंत थंडी हळूहळू मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्रात आली. मुंबईमध्ये 17 डिग्री सेल्सिअस असल्यावर हिवाळा म्हणायला हरकत नाही.
 
पुण्यातही थंडी जाणवतेय. याचसोबत अहमदनगर, जळगाव, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, या ठिकाणी तापमान पाच ते सहा डिग्रीने खाली आलं. कमाल तापमान खाली आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव अधिक जाणवायला लागला.
 
कोणत्या भागात थंडीचा इशारा दिला?
राज्याच्या उत्तर भागासाठी कोल्ड वेव्हचे इशारेही देण्यात आले होते. दवं पडण्याची शक्यता होती. त्याचा परिणाम हा शेतीमधले पिकं आणि दृश्यतेवर होतो. जळगाव, बुलढाणा, नागपूर, विदर्भातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील जवळपास जिल्हे आणि मध्य भागांतले जिल्ह्यामध्ये तापमान तीन ते चार डिग्रीने खाली आलं.
 
9 तारखेला आम्ही जे इशारे दिले होते ते 9 आणि 10 तारखेसाठी होते. आता फक्त 10 तारखेचा इशारा आहे. 11 तारखेसाठी काही इशारा नाहिये. 10 तारखेचा इशारा हा उत्तर मध्य महाराष्ट्रासाठी आहेत. जळगाव नाशिक नंदूरबार आणि धुळे अहमदनगर  या भागांमध्ये चोवीस तासांसाठी कोल्ड वेव्ह आणि दव पडण्याची वाॅर्निंग आहेत. हा लेटेस्ट अपडेट आहे.
 
लाट किती काळ राहील?
हिवाळा हा थंडीच्या लाटेच्या स्वरुपात येतो. असं खूप कमी वेळी होतं की, सलग १५ दिवस लाट आहे. साधारणपणे ४-५ दिवसांची ही लाट असते. मग त्या परिस्थितीमध्ये बदल होतो. 
 
अनुमानाप्रमाणे पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये या परिस्थितीमध्ये बदल होईल. थंडीची लाट ओसरेल. 
 
कोणत्या क्षेत्रांवर परिणाम ?
हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी थंडीचा पिकांवर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती दिली. डॉ. साबळे हे महात्मा फुले कृषी महाविद्यालयात कृषी हवामान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
 
"आठ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान खाली आलं की पिकांवर परिणाम व्हायला सुरुवात होते. गोंदिया, उत्तर महाराष्ट्र इथे आठ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झालं. आठ अंशांपेक्षा कमी तापमान झालं पिकांवर निश्चितपणे वाईट परिणाम होतो. पानं करपतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी पिकं प्रयत्न करतात. त्यामुळे पिकं करपतात.
 
आठ अंशांपेक्षा कमी तापमान झाल्यावर त्यांच्या पोषक द्रव्य शोषणाच्या क्रियांवर परिणाम होतो. आठ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झाल्यावर जनजीवनावरही परिणाम होतो. माणसांमध्ये पिकांमध्ये रोगांचे प्रमाण वाढतं. माणसांमध्ये वेगवेगळे उद्भवतात.
 
रबी पिक जसं की गहू हरभरा यांना धोका संभवतो. द्राक्ष यासारख्या पिकाला तर धोका आहेच. अशी पिकं जी काढणीला आलेले नाहीयेत पण लागवड झालीये आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये काढणीला येऊ शकतात त्यांच्यावर परिणाम होतो. तसेच उन्हाळी पिकं जसं की कलिंगड, गोडलिंब  यांच्या पेरणीवर परिणाम होतो. कमी तापमान असलं की ते लवकर उगवत नाही. भेंडी, दोडके यांसारख्या भाज्यांवर परिणाम होतो.
या लाटेला तीव्र स्वरुपाची थंडीची लाट म्हणता येणार नाही. जर खूप तीव्र थंडी असेल तर त्याचा परिणाम प्राण्यांवरही होतो. दवं किंवा धुक्यामुळे दृश्यतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे रहदारीवर परिणाम होतो. यातही सकाळच्या वेळच्या रहदारी वेगमर्यादा येतात.
 
तिसरी गोष्ट म्हणजे तापमान खाली गेल्यावर किंवा धुकं असेल तर धुलिकण हवेत खाली तरंगण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. त्याचा परिणाम आपल्या श्वसन इंद्रियांवर होतो. .
 
यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. थंडीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचे जे ट्रांसफाॅर्मर असतात ते ट्रिप होतात. हा परिणाम फ्राॅस्टमुळे होतो. कारण ते बेसिकली पाणीच असतं. दृश्यतेमुळे विमानांच्या रहदारीवर परिणाम होतो. शेती क्षेत्रात जर तापमान खूप खाली गेलं तर द्राक्षांसारख्या फळांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

डिसेंबरमध्ये नेहमीसारखी थंडी का जाणवली नाही?
आपल्याकडे येणारा हिवाळा हा कुठूनतरी आलेला हिवाळा असतो. उत्तर भारत किंवा नाॅर्थवेस्टकडून आलेला हा हिवाळा असतो. कारण त्यांच्याकडे जी Western Disturbance Dystem त्यामुळे उत्तर भारतात थंडी पडते. डोंगराळ भागात बर्फ पडतो.
 
डिसेंबर मध्ये ही सिस्टीम उत्तर भारतात ज्या रेखावृत्तांवरुन जाण्याची अपेक्षा होती तशी गेल्या नाही. त्यामुळे उत्तर भारतात थंडी पडली नाही. त्यामुळे उत्तर भारतातून आपल्याकडे येणारे  थंड किंवा कोरडे वारे आले नाहीत. त्यामुळे राज्यात डिसेंबरमध्ये हवी तशी थंडी पडली नाही.
 
थंडीच्या काळात काय काळजी घ्यावी?
थंडीचे पुरेसे कपडे आहेत की नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास घरातच रहावे. प्रसारमाध्यमात थंडीविषयी जी माहिती येते त्यावर लक्ष ठेवावं. शेजारी कोणी म्हातारी माणसं रहात असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं. त्यांना काही लागल्यास योग्य ती मदत करावी.
 
गरम सूप किंवा चहा-कॉफी घेत रहावे. गरम पाणी प्यावं. त्यामुळे शरीरात उब निर्माण होईल. जर तुमच्या भागातील पाईपलाईन गोठणार असतील तर त्यातून पाण्याचा निचरा करत रहा. या काळात वीज गेली तरी ठेवलेलं अन्न 48 तास टिकतं त्यामुळे काळजी नसावी.
 
घरात स्लीपर आणि पायमोज्यांचा वापर करावा. थंडी कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन करू नका, त्याने शरीराचं तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असते.  

Published By- Priya Dixit