रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (11:49 IST)

हे गलिच्छ राजकारण; विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे- हसन मुश्रीफ

hasan mushrif
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी तसंच कारखान्यावर ईडीने छापे टाकले आहेत.
 
कोल्हापुरातील कागल येथे आप्पासाहेब नलावडे गडहिग्लज साखर कारखाना हा अनधिकृतपणे चालविला जात असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.तसेच आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी या कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरांवर पहाटे 6.30 वाजल्यापासून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.
 
मागील वर्षी देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी व कार्यालय येथे छापेमारी केली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकली आहे.
 
आज पहाटे सकाळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभाग व ईडीने छापेमारी करत असल्याची माहिती मिळताच, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. कारण मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणार एक मोठा गट तसेच त्यांचा चाहता वर्ग आहे.
 
आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी पडल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त आक्रमक झाले आहेत. तसेच ह कार्यकर्ते आयकर विभाग व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे.
 
हे गलिच्छ राजकारण- हसन मुश्रीफ
“मी काही कामानिमित्ताने बाहेर आहे. कारखाना, निवासस्थान, नातेवाईकांची घरं हे सगळं तपासण्याचं काम सुरू आहे. मला दूरध्वनीवरुन ही बातमी समजली. मुलीच्या घरावर छापे घातले आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. प्रसारमाध्यमांमध्ये कागल आणि अन्यत्र ठिकाणी बंद पुकारल्याचं कळलं. बंद मागे घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. कुठलाही दंगाधोपा करु नये. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं”, असं हसन मुश्रीफ यांनी व्हीडिओच्या माध्यमातून सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, “दीड दोन वर्षापूर्वीही असे छापे पडले होते. केंद्रीय यंत्रणांनी सगळी माहिती घेतली होती. छापा कशासाठी घालण्यात आला याची मला माहिती नाही. वास्तविक मी 30-35 मी सार्वजनिक जीवनात आहे. कोणत्या हेतूने छापा घालण्यात आला समजलेलं नाही. मी सगळी माहिती घेतल्यावर खुलासा करेन. तोवर कार्यकर्त्यांनी शांतता राखावी.
 
कागल परिसरातील भाजप नेत्यांनी माझ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांवर ईडीची कारवाई होईल असं सांगिततलं होतं. हे जे चाललं आहे ते गलिच्छ स्वरुपाचं राजकारण आहे. राजकारणात अशा स्वरुपाच्या कारवाया होणार असतील तर याचा निषेधच व्हायला हवा. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होते आहे. विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे अशी शंका येते आहे”.
 
जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई होते- सुप्रिया सुळे
“आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरंच काहीही नाही. अतिथी देवो भव, आमच्याकडे पाव्हणे आलेत त्यांचे स्वागत करुच.”, अशी प्रतिक्रिया देत असताना त्या म्हणाल्या की राज्यात ईडी म्हणजेच एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई केली जाते असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
अशा राजकारणामुळे कुटुंब भरडलं जातं. त्या कुटुंबातील मुली, नातू कोणत्या परिस्थितीतून जातात, याचा विचार कुणीही करत नाही. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल, याचा विचार केला नव्हता. “एक गोष्ट प्रांजळपणे मला या ईडी सरकारला सांगायची आहे. ही अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाई यावर लक्षं दिलं तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल.