मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (15:19 IST)

डोक्यात घाव घालून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सोलापूरच्या करमाळा तालुक्यात प्रचंड खळबळ

पतीने आपल्या पत्नी आणि मुलीच्या डोक्यात घाव घालून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) करमाळा तालुक्यात घडली आहे. घटनेनंतर पती फरार झाला आहे. हा प्रकार सोमवार (दि.8) सकाळी पावणे दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे. निर्घृण खूनाच्या  घटनेमुळे करमाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लक्ष्मी अण्णा माने (वय-30), श्रृती अण्णा माने (वय-12 दोघेही रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे निर्घृण खून झालेल्या मायलेकींची नावे आहेत.

तर अण्णा भास्कर माने असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कमलेश कोपाळ चोपडे (वय-30 रा. देवळाली, ता. करमाळा) याने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अण्णा माने, मयत लक्ष्मी व श्रृती, मुलगा रोहित व सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहतात.दोन्ही मृत व संशयित आरोपी अण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते.दरम्यान, पहाटे सहाच्या सुमारास संशयित आरोपी हा दुचाकीवरुन निघून गेल्याचे मुलगा रोहित याने पाहिले होते.त्यानंतर सकाळी लक्ष्मी व श्रृती या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने खुनाचा (Murder) प्रकार उघडकीस आला.
संशयित आरोपी अण्णा माने याने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करुन खून (Solapur Crime) केला. याप्रकरणी मयत लक्ष्मीच्या भावाने फिर्याद दिली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके पाठवली आहेत. अद्याप आरोपीचा शोध लागला नाही.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर करीत आहेत.