भाजप आणि मनसे जाहीर युती करणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आज (6 ऑगस्ट) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
आज सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज या ठिकाणी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. ही सदिच्छा भेट असून दोन नेते भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली
राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप मी ऐकली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आगामी उत्तर प्रदेश निवडणुका पाहता मनसेची परप्रातियांसंदर्भातील भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते आणि म्हणूनच दोन पक्ष जाहीर युती करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांना युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि उत्तरं आम्हाला विचारता. चंद्रकांत पाटील यांना मी कोणतीही क्लिप पाठवली नाही. मी पाठवणार असं म्हटलो होतो. त्यांना कोणी पाठवली मला कल्पना नाही."