शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (10:59 IST)

महाराष्ट्र सरकारचं काय होणार? उत्तर प्रदेश, गोव्यात भाजपची घोडदौड उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवेल का?

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये बहुमत मिळवून भाजपने सत्ता काबिज केलीये. पण, महाराष्ट्रात हाता-तोंडाशी आलेली सत्ता निसटल्यानंतर, राज्यात भाजपला सत्ता मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाही.
 
महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून अनेक छुपे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे, या चार राज्यांमधील विजय भाजपला महाराष्ट्रात ऑपरेशन 'लोटस'साठी बळ देणारा नक्कीच ठरेल असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
 
विधिमंडळात भाजपने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजपने रस्त्यावर लढण्यास सुरुवात केलीये.
 
या परिस्थितीत, भाजपचा चौफेर विजय उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे का? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात आघाडीचे नेते
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सद्यस्थितीत तुरुंगात आहेत. तर, महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री विविध प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
 
ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना, राष्टवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलीये.
 
या यंत्रणा स्वायत्त असल्या तरी, केंद्र सरकारच्या थेट अख्यात्यारित येतात. त्यामुळेच, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांकडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सातत्याने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करत असल्याचा आरोप केला जातोय.
 
भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर, केंद्रीय तपास यंत्रणांनी या नेत्यांवर कारवाई केल्याची उदाहरणंही दिसून आली आहेत.
 
उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भाजप
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजपने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. विधिमंडळ असो किंवा रस्त्यावरची लढाई भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही.
 
आत्तापर्यंत पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात भाजप नेते अत्यंत आक्रमक आणि ठाकरे सरकार कायम बॅकफूटवर असल्याचं दिसून आलंय.
 
राजकीय विश्लेषक सांगतात, याचं प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नसलेला समन्वय. ज्याचा थेट फायदा भाजपने घेतला आणि ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
 
भाजपचा विजय उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा?
एकीकडे दिवसेंदिवस ठाकरे सरकारविरोधात आक्रमक होणारी भाजप आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडचणीत सापडलेले महाविकास आघाडीचे नेते.
 
या परिस्थितीत चार राज्य जिंकलेली भाजप उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते का? हे आम्ही राजकीय जाणकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
महाराष्ट्र टाईम्सच्या नाशिक आवृत्तीचे संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे म्हणाले, "महाराष्ट्रात आघाडी सरकारची उलटी गिनती आता निश्चितच सुरू होणार." एकूणच ठाकरे सरकारची झालेली कोंडी आणि चार राज्यांमध्ये मिळालेलं निर्विवाद वर्चस्व यामुळे भाजपचं मनोबल प्रचंड वाढेल.
 
हाता-तोंडाशी आलेली महाराष्ट्राची सत्ता अचानक निसटल्यानंतर, सत्ता पुन्हा काबीज करण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच, भाजपकडून सत्तापालटासाठी छुपे प्रयत्न करण्यात येत होते.
 
भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा रंगू लागली. भाजपचे नेते आम्ही सत्ता कधी बनवू याची वारंवार तारिख देताना दिसून आले. पण भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. शैलेंद्र तनपुरे पुढे सांगतात, "राज्यात ऑपरेशन लोटससाठी भाजपचे प्रयत्न सुरू होतेच. या निवडणूक निकालांमुळे त्यांच्या प्रयत्नांना आता एक दिशा मिळेल."
 
भाजपच्या विजयाचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होईल? उद्धव ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे? बीबीसीशी बोलताना द न्यू इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ट राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणतात, "भाजपच्या विजयाचा उद्धव ठाकरे सरकारवर तात्काळ काही परिणाम होणार नाही." मात्र, हा उद्धव ठाकरेंसाठी आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का नक्कीच आहे.
 
गोव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवलाय. देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक असल्याचं पाहायला मिळालंय.
 
सुधीर सुर्यवंशी पुढे सांगतात, "या विजयामुळे महाराष्ट्रात भाजपचा आवाज अधिक मजबूत होईल." ठाकरे सरकारवर आरोप करून, सरकारला एक्सपोज करण्याची भाजपची तीव्रता अधिकाधिक वाढत जाईल.
 
भाजप ऑपरेशन लोटस करणार का?
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न काही नवीन नाहीत. पण चार राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता भाजप ऑपरेशन लोटस करणार का?
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये बीबीसीशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आपल्या कर्मानेच पडेल. भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही." भाजप राज्यात 2024 च्या निवडणुकीची तयारी करत आहे.
 
भाजप ऑपरेशन लोटस करण्याची शक्यता आहे का? याबाबात बीबीसीशी बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, "भाजपला सत्तेशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. त्यांनी प्रयत्न कधी थांबवले? त्यांचे सातत्याने सत्तेसाठी प्रयत्न सरू आहेत."