शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (17:39 IST)

प्रकाश आंबेडकरांशी केलेली युती सांभाळणं उद्धव ठाकरेंना कठीण होईल?

uddhav prakash ambedkar
"शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत." प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत हे विधान केलं आणि शिवसेनेसोबत झालेल्या युतीनंतर 4 दिवसात महाविकास आघाडीत ठिणगी पडली.
 
आंबेडकर यांच्या थेट शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवारांवरची टीका खपवून घेतली जाणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला.
 
ते म्हणाले, "शरद पवारांबाबत प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल भूमिका घेताना शब्द जपून वापरले पाहीजेत."
 
संजय राऊत यांच्या सल्यानंतरही प्रकाश आंबेडकर त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. याउलट त्यांनी कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारला.
 
"ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत. माझी युती उद्धव ठाकरेंशी झाली आहे," असंही ते म्हणाले.
 
दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची युती उद्धव ठाकरेंशी झाली आहे. महाविकास आघाडीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
 
त्यामुळे एका आठवड्याच्या आत प्रकाश आंबेडकरांसोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकीय वाद सुरू झाले.
 
या राजकीय वादानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे...  ही युती टिकवून ठेवणे उद्धव ठाकरेंना कठीण जाणार आहे का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांआधीच कसरत वाढली?
23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येऊन युती जाहीर केली.
 
यावेळी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा भाग असणार आहेत का? शरद पवारांशी आंबेडकरांशी असलेले संबंध उद्धव ठाकरे सुधारण्यास प्रयत्न करणार का? कॉंग्रेस-राष्ट्रवादीची या युतीबाबत काय भूमिका आहे? असे अनेक प्रश्न दोन्ही नेत्यांना विचारण्यात आले.
 
त्यावर उद्धव ठाकरेंनी "आम्ही दोन्ही पक्षांशी चर्चा केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचे संबंध सुधारण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग असतील.  कॉंग्रेस पक्षाचीही याला  सहमती मिळेल. कॉंग्रेसचीही माझी चर्चा झालेली आहे. दोन दिवसांत याबाबत अधिक गोष्टी कळतील," अशी सकारात्मक उत्तरं दिली.
 
या पत्रकार परिषदेला अगदी चार दिवस झाले. पण तेवढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत असं वक्तव्य केले.
 
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही असा इशारा आंबेडकरांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही आक्रमक झाले. मग शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फसला. त्यानंतर काही तासांनी प्रकाश आंबेडकर यांनी माझं वक्तव्य हे इतिहासातील काही घटनांशी संबंधित होतं. त्याचा आता काही संबंध नसल्याचं म्हणत सारवासारव केली.
 
पण संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य मान्य नसल्याचे म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, कोण संजय राऊत? हा प्रश्न उपस्थित करत वादाची ठिणगी कायम ठेवली.
 
त्यामुळे घटक पक्षांना सांभाळून घेताना उद्धव ठाकरेंना स्वपक्षातील नेत्यांचीही नाराजीकडेही लक्ष द्यावे लागेल. युतीत हे किती दिवस करणार हा ही प्रश्न आहे राहतोच.
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी वैर सर्वश्रुत आहे. त्यात कॉंग्रेसला ही युती मान्य नसल्याने खटके उडत राहणार. उद्धव ठाकरेंसाठी या सर्व पक्षांचा समतोल साधणं मोठं आव्हान आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसं आव्हान वाढत जाणार आहे."
 
शरद पवार यांना प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल विचारलं, तेव्हा "अजून जागा वाटपाची वेळ आलेली नाही. चर्चाच झालेली नाही तर हरकतीचा मुद्दा येतो कुठे? तसेच आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही," असं त्यांनी सांगितलं.
 
ही युती मुंबई महापालिकेपुरतीच?
प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय व्यक्तिमत्व इतर नेत्यांपेक्षा वेगळं आहे. मित्रपक्षांना एकत्रित घेऊन सामंजस्याने पुढे जाणे किंवा त्यांच्यासाठी मवाळ भूमिका घेऊन तडजोड करणे यापैकी नाहीत.
 
लोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, "प्रकाश आंबेडकर यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते एक वेगळं रसायन आहे. जे उद्धव ठाकरेंना सहजासहजी पचवता येईल असं वाटतं नाही. वंचित बहुजन आघाडीचे  मुंबई महापालिकेत कधीही नगरसेवक निवडून आले नसले तरीही आगामी निवडणुकीत ते शिवसेनेकडे जास्त जागांची मागणी करणार ही दाट शक्यता आहे. पण दलित मतदार हा शिवसेनेसोबत आहे हे दाखवण्यासाठी ही युती आहे."
 
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार असतील तर ही युती किती काळ टिकेल? याबाबत बोलताना संदीप प्रधान पुढे सांगतात,
 
" मुंबई महापालिका निवडणूक जर कॉंग्रेससोबत लढवली तर त्यांची महापालिकेत तुलनेने चांगले संख्याबळ असल्यामुळे त्यांना अधिकच्या जागा द्याव्या लागतील. जर एकत्र नाही लढले तर महाविकास आघाडी फुटली असं चित्र दिसेल. हे टाळण्यासाठी कॉंग्रेस व्यतिरिक्त वंचितसोबत लढून निकालानंतर पुन्हा कॉंग्रेस बरोबरएकत्र यायचं अशी उद्धव ठाकरेंची खेळी असू शकते.
 
वंचितला कमी जागा दिल्या तरी चालू शकतं पण कॉंग्रेसबरोबर ही वाटाघाटी करणं कठीण आहे. त्यामुळे सुध्दा यातून बाहेर पडण्यासाठी वंचितसोबतची युती असावी. त्याचा रागरंग पाहता ही दीर्घकाळासाठीची युती आहे असं वाटत नाही. मुंबई महापालिकेपर्यंत ही युती टिकवून पुढे वेगळा विचार जर शिवसेनेने केला तरी आश्चर्य वाटणार नाही. "
 
प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  "प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ कल्पित कहाणी" असल्याचं म्हटलं आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, " उध्दव ठाकरेंनी आंबेडकरांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरते आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेतलं तरी पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत ठेवून एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता वाटत नाही.
 
कारण जागावाटपामध्ये प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आंबेडकरांना सामिल करून घेतलं तरीही किंवा नाही घेतलं तरी उध्दव ठाकरेंना मोठी कसरत करावी लागणार हे निश्चित..! "
 
Published By- Priya Dixit