रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (09:35 IST)

शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांचं 'भांडण' नेमकं काय आहे? त्यांच्यातील राजकीय संघर्ष काय आहे?

prakash ambedkar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या एकमेकांविरोधातल्या प्रतिक्रिया यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत.परंतु सोमवारी (23 जानेवारी) उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ‘आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण’ असल्याचं जाहीरच सांगितलं.
 
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर याच पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “शरद पवार यांची प्रतिक्रिया मी वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं आहे.”
 
हे भांडण किंवा हा वाद नेमका काय आहे? शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय संघर्ष काय आहे? आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊ शकतात का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (23 जानेवारी 2023) पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. याच पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आपल्या जुन्या वादाचा उल्लेख केला.
 
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होणार असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, “मला माहिती नाही. मी या भानगडीतच पडत नाही.”
 
या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले “ही प्रतिक्रिया मला नवीन नाही. शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे.
 
हे शेतातलं भांडण नाही तर नेतृत्त्व आणि कोणत्या दिशेने जायचं याचं भांडण आहे. आगामी काळात शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा मी बाळगतो,”
तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध सुधारतील यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
 
शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये अचनाक युती झालेली नाही तर हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “आम्हाला काल स्वप्न पडलं आणि आज एकत्र आलो असं झालेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी चर्चा केली आहे. ही व्यक्तीगत युती असली तरी त्यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावं ही आमची इच्छा आहे.”
 
बीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "दोन जण भांडतात तेव्हा दोघं एकत्र बसत नाही त्याला तिसरा लागतो. त्यांनी तिसऱ्या अंपायरची भूमिका घेतली आहे. ती त्यांनी बजावावी एवढीच विनंती आहे."   
 
आरोप-प्रत्यारोप
शिवसेनेतील ठाकरे गटासोबत युती केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत येतील अशी अपेक्षा प्रकाश आंबडकर यांनी व्यक्ती केली आहे. पण यापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि आघाडीच्या नेत्यांचं राजकारण कायम परस्पर विरोधी राहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे.
 
आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण यापूर्वी दोन्ही नेत्यांचे अनेकदा खटके उडाले आहेत.   
 
2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही असं म्हटलं होतं.
 
“शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत आहेत परंतु त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. या कारणामुळे आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढवली नाही.”
 
प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रतिक्रियेला त्यावेळी शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “मला आठवतंय की ईशान्य मुंबईच्या एका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम्ही एकत्र उमेदवार उभा केला होता.
 
या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली. याचा लाभ त्यावेळी प्रमोद महाजन यांना झाला होता. त्यामुळे भाजपला फायदा करून देणाऱ्यांनी इतरांच्या धर्मनिरपेक्षतेवर बोलू नये.”
 
शरद पवार पुढे असंही म्हणाले की, “मला यावर भाष्य करायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर दोन्ही वेळेला आमचा पाठिंबा घेतला नसता. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच होते.”
 
2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याची टीका केली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपला झाला असंही आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
 
अर्थात हा आरोप वेळोवेळी वंचित बहुजन आघाडीने फेटाळला आहे.
वंचित बहुनज आघाडीला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, पण दहा पेक्षा जास्त जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी एक लाखहून अधिक मतं मिळवली होती आणि याचा थेट फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला होता.
 
2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार राष्ट्रीय नेते होणार होते पण आता ते केवळ बारामतीचे नेते राहिले आहेत.”
 
त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुका लढवल्या नाहीत आणि याचा मोठा फटका आघाडीच्या उमेदवारांना झाल्याचं दिसलं.
 
इतकंच नाही तर मार्च 2019 मध्ये म्हणजेच निवडणुका तोंडावर असताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता.  
 
“1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. तसा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा,'' असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांमध्ये काही तथ्य नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते असे आरोप का करत आहेत असा प्रश्न त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.
 
 तर काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विचारले असता ते म्हणाले होते, “शरद पवार यांना महाराष्ट्रात कोणीच ओळखत नसेल तेवढा मी ओळखता. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासाठी या दोन पक्षांकडूनच विरोध होतोय.”
 
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यातील गेल्या काही वर्षांपासूनची ही मोजकी उदाहरणं आहेत. पण राजकीय विश्लेषक आणि जाणकारांचं म्हणणं आहे की हा वाद आताचा नाही. याला राजकीय पार्श्वभूमी आहे.
 
वादाला सुरूवात कुठून झाली?
भारिप बहुजन महासंघाच्या (भारतीय रिपब्लिक पक्ष-बहुजन महासंघ) स्थापनेपासून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जयदेव गायकवाड सांगतात, “प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे वाद जुने आहेत. भारिपची स्थापना झाली त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक  लढवली होती आणि त्यांचा साधारण 13 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी त्यांना असं वाटलं की मराठा मतांच्या राजकारणामुळे त्यांचा पराभव झाला आणि यामागे शरद पवार यांचं राजकारण असावं असं त्यांना वाटत होतं.
 
पण तरीही त्यानंतर 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आंबेडकरी चववळीतल्या नवीन नेत्यांशी चर्चा करू असं जाहीर आवाहन केलं होतं.”
 
“त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवण्यासाठी त्याकाळात अनेकवेळा प्रयत्न झाले. प्रकाश आंबेडकरही तयार झाले. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांची विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा होती. परंतु शरद पवार यांनी रा.सु.गवई यांचं नाव पक्कं केलं होतं. शरद पवार यांनी गवईंना शब्द दिला होता त्यामुळे ते काही त्यावेळी शक्य झालं नाही. ही बाब त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना फारशी पटली नव्हती.”
ते पुढे सांगतात, “1998 मध्ये चार दलित नेत्यांनी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्त्वात लढवली होती. रा.सु.गवई, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे चारही दिलत नेते खुल्या वर्गातील मतदारसंघातून निवडून आले होते.
 
त्यानंतर शपथग्रहण सोहळ्याला मी त्यांच्यासोबत गेलो होतो. त्यावेळी गटनेते पदावरून त्यांच्यात मतभेद झाल्याचं मला आठवतं. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर नाराज होते. त्यानंतर या चार नेत्यांपैकी रामदास आठवले शरद पवार यांचे विश्वासू बनले. या घटनाक्रमाला इतरही अनेक राजकीय पैलू आहेत. परंतु प्रामुख्याने अशा काही घटाना घडत गेल्या आणि त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये कायम अंतर राहिलं.”
 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र यापूर्वी हा मुद्दा फेटाळला आहे.
 
शरद पवार यांच्यामुळे आपण खासदार झालो नव्हतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळे मी खासदार झालेलो नव्हतो असं म्हटलं. “पवारांनी एवढं खोटं बोलू नये. 1997-98 मध्ये काँग्रेससोबत बोलणी झाली तेव्हा सीताराम केसरी होते. आमच्यात बोलणी झाली होती. या चर्चेत शरद पवार कुठेही नव्हते. माझ्या राजकारणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही.”
 
‘मराठा केंद्रित आणि दलित-ओबीसी केंद्रित राजकारणाची दिशा’
तर ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सांगतात, “1984-85 दरम्यान प्रकाश आंबेडकर राजकारणात आले. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं वर्चस्व होतं. त्यावेळी शरद पवार यांनी रा.सु.गवई यांना अधिक बळ दिलं होतं. ती एक खदखद असावी.”
 
ते पुढे सांगतात, “प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणात दलित मतांसोबत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा त्यांचा प्रयोग आहे. तो प्रामुख्याने ग्रामीण भागात मराठा विरोधी राजकारणाचा भाग आहे आणि शरद पवार यांचं मराठा केंद्रीत राजकारण आणि आंबेडकर यांचं मराठा विरोधी राजकारण असा कॉनफ्लिक्ट आहे. यातून त्यांचे खटके उडाले.
 
तुम्हाला अल्पसंख्याक किंवा छोट्या जाती एकत्र आणायच्या असतील तर कोणीतरी एक राजकीय शत्रू असावा लागतो. त्यामुळे गाव-खेड्यातल्या राजकारणासाठी मराठा विरोधी राजकीय भूमिका किंवा राजकारण ते करत आले आहेत. त्यामुळे गेल्या 30-35 वर्षांपासून तरी शरद पवार आणि त्यांचा राजकीय संघर्ष सतत राहिला आहे.”
“महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसींची संख्या साधारण समसमान आहे. मराठा आणि ओबीसी हे ग्रामीण भागातलं तसं एकत्र न येणारे राजकीय प्रवाह आणि सामाजिक घटक आहे. त्यामुळे दोघांची दिशा मराठा केंद्रीत आणि ओबीसी केंद्रित अशी आहे. त्यामुळे ओबीसी आणि दलितांची मोट जिथे बांधता येईल तिथे प्रकाश आंबेडकर यशस्वी होतात हे पश्चिम विदर्भात दिसतं आपल्याला.”
 
तर प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण मराठा विरोधी नव्हतं असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे. “तसं असतं तर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला नसता. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं ही त्यांची भूमिका होती. तसंच या आरक्षणाविरोधात मोर्चे काढू नका असंही आवाहन त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने केलं होतं.
 
प्रकाश आंबेडकर यांचा विरोधात पक्षातील प्रस्थापित मराठा घराणेशाहीला होता. अकोला पॅटर्नमध्ये त्यांनी सामान्यांना संधी दिली आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत सामान्य घरातले उमेदवार निवडून आले.”     
 
या दोन्ही नेत्यांमधला वाद वाढत गेला याचं आणखी एक कारण श्रीमंत माने सांगतात. “शरद पवार यांनी रा.सु.गवई यांच्यानंतर रामदास आठवलेंना अधिक महत्त्व दिलं हे सुद्धा एक कारण असू शकतं. सुरुवातीच्या काळात रा.सु.गवई यांना प्राधान्य दिलं.
 
ते विधानपरिषदेचे उपसभापतीही झाले. त्यानंतर गवई थोडे दूर गेले ते काँग्रेसच्या अधिक जवळ गेले आणि रामदास आठवले शरद पवार यांच्यासोबत होते. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली. ते समाजकल्याण मंत्री होते.”
 
परंतु आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असंही कोणाला अडीच वर्षांपूर्वीपर्यंत वाटलं नव्हतं.  आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पुढे काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट नाही.
 
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे आमच्या नाराजीचा प्रश्न कुठे येतो? उगीच गैरसमज पसरवत आहात. उद्धव ठाकरे यांनी कोणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं आणि त्यांच्या कोट्यातून घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आराखडे आखावे लागतात.”
 
त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार? आणि विशेषत: शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पहावं लागेल.    
 
Published By- Priya Dixit