शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (09:34 IST)

'उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांची आघाडी ही राजकीय जोखीमच'

uddhav prakash ambedkar
शिवसेनेच्या स्थापनेमागे ज्यांची प्रेरणा होती ते, प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर या दोघांनी राजकीय आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 
यापूर्वी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि त्यापूर्वी दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ या दोघांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेबरोबर युती केली होती. आता त्यानंतर जवळपास एका तपानंतर ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले आहेत.
 
मुंबईसह महाराष्ट्रातील काही महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुका जेमतेम 13-14 महिन्यांवर आल्या आहेत.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पावणेदोन वर्षाच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांचे समीकरण लक्षात घेता, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकत्र येणं हे महाराष्ट्रातील एकूण राजकारणाला किती वळण देऊ शकेल याची चर्चा केली पाहिजे.   
गेल्या वर्षी आंतरभारती दिवाळी अंकासाठी प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेण्यासाठी मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना मी प्रबोधनकारांचे नातू आणि बाबासाहेबांचे नातू एकत्र येण्याची शक्यता आहे का असं विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी अशा आघाडीला अनुकूलता दर्शवली होती.
 
आज मात्र हा आघाडीचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी जाहीर करून महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा मुद्दा समोर आणला आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या राजकारणात शरद पवार यांना विशेषेकरून विरोध करण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर घेत आले आहेत.
 
आज मात्र शिवसेनेबरोबर आघाडी जाहीर करताना त्यांची ही भूमिका बदलली आहे असं दिसते. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जे आज महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर आहेत, त्यांच्याशी धागा जोडण्याची भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे.
 
हा फार उल्लेखनीय असा बदल आहे.कारण 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे' ची भूमिका घेत त्यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार लोकसभा किंवा विधानसभेवर निवडून पाठवला नाही.
 
संसदीय राजकारणात हा फार मोठा धक्का होता आणि तितकीच मोठी पिछेहाट होती. मात्र बाबासाहेबांचे नातू ही झळाळून टाकणारी ओळख असल्यामुळे राजकीय विश्लेषकांना आणि विरोधकांना पुढे फारसे बोलता आले नाही. आज परिस्थिती बदलली आहे.
 
मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल परिसरात उभे राहणारे आंतरराष्ट्रीय स्मारक, ज्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आले होते. जर समजा मोदी यांनी प्रकाश आंबेडकरांना त्यावेळी निमंत्रित केलं असतं तर राजकीय पटलावर नक्कीच काहीतरी उलाढाल होऊ शकली असती.
 
अर्थात, रिपब्लिकन आणि दलित नेते स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि आपले पुरोगामी इगो सांभाळत वाटचाल करत आले आहेत. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले हेही त्याला अपवाद नाहीत.
 
या परिस्थितीत पुन्हा एकदा व्यक्तिकेंद्रित नेतृत्व असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर, व्यक्तिकेंद्रित प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीची युती झाली आहे, ही गोष्ट फार काळ विसरता येणार नाही. तरीही भारतीय राजकारणातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील भाजप प्रभावित राजकारणाला काही दिशा मिळू शकेल का याची चर्चा केली पाहिजे.
 
दलित पँथरच्या दहा वर्षानंतरच्या वाटचालीनंतर 1982 साली सम्यक आंदोलनाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. त्यांनी काढलेला लाँग मार्च त्यानंतर वर्ष दीड वर्षात स्थापन केलेला भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि त्याच्या विस्तारासाठी दरम्यानच्या काही वर्षात बहुजन महासंघ असे नाव त्याला जोडून ओबीसी राजकारणाच्या परिघात आपला पक्ष आणण्याचे त्यांचे नेतृत्व या सगळ्या प्रवासाची आपल्याला कल्पना आहे.
 
आज वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांची आघाडी याबाबत काही मुद्दे मांडले पाहिजेत.
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि  पुणे, औरंगाबाद, नागपूर या महापालिकांच्या निवडणुकीत या आघाडीचा फायदा शिवसेनेला किती होईल? याबरोबरच आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह जे पक्ष महाविकास आघाडीत आहेत त्यांचे धोरण आणि भूमिका या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत काय राहील, हे देखील विचारात घेतलं पाहिजे.
 
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे राजकारण केलं, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात काँग्रेस आघाडीला बसला हे वास्तव नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या वंचित आघाडीला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही; पण मतदारांनी त्यांच्या खात्यामध्ये जवळपास 42 लाख मतं टाकली. त्याचं कारण स्पष्ट होतं.
 
भीमा - कोरेगावमध्ये 2018 साली जो गोंधळ आणि हिंसाचार झाला, त्यामुळे दलित समाज अस्वस्थ झाला. त्यातून दिनांक 3 जानेवारी 2018 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. महाराष्ट्रातील सुजाण जनतेने आणि आंबेडकरी चळवळीतील वर्गाने त्याला मोठा प्रतिसाद दिला.
 
दलित चळवळीतील आणि आंबेडकरी विचारांच्या, पक्षांच्या राजकारणाला 2009 नंतरच्या दहा वर्षांच्या काळात जो कुंठितपणा आला होता, तो फोडण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी या काळात केलं. लोकसभा 2019 निवडणुकीत आंबेडकरांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव ठाकरे या सर्व नेत्यांच्या चर्चा होत होत्या.
 
असे असूनही जागा वाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. संसदीय राजकारणात एका प्रकारे आपल्या पक्षाच्या नेत्यांना आंबेडकरांनी मागे ढकललं असं म्हटले पाहिजे.
महाराष्ट्रात गेले तीन-चार वर्षात महाविकास आघाडीमधील पक्षांनी जे राजकारण सुरू केले आहे त्यातील कच्चे दुवे वगळता हे सगळे पक्ष अधिकाधिक समन्वयाने पुढे गेले तर निश्चितच त्याचा फायदा महाराष्ट्रातील भाजपच्या प्रभावाला क्षती निर्माण करू शकतो. तथापि हे तितके सोपे नाही. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने निवडणूक यंत्रणा आणि पक्ष संघटना गेल्या अनेक वर्षात जाणीवपूर्वक विकसित आणि मजबूत केली आहे त्याच्या तुलनेत ठाकरे आणि आंबेडकर यांचे पक्ष कितपत पुरे पडतील हा प्रश्न आहेच.
 
व्यापक अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेऊन मोठी राजकीय जोखीम पत्करली आहे त्याच वेळी आंबेडकरांनीही जोखीम स्वीकारली आहे. विश्वासार्हता आघाडीच्या एकूण राजकीय प्रक्रियेत असलेली लवचिकता, समान कार्यक्रम, भूमिका आणि मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षाला रोखण्याची इच्छाशक्ती याच्या आधारेच ही आघाडी काही परिणाम दाखवू शकेल.
 
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात समाजातील जातीयतेविरुद्ध, अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोघांचे एकमत होते.
 
मुंबईतील दादर भागात असलेल्या गणेशोत्सवात असलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाला प्रयत्नपूर्वक आव्हान देण्याचा प्रयत्न प्रबोधनकारांनी बाबासाहेबांच्या मदतीने केला होता. ती सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई होती.
 
आज त्यानंतर 100 वर्षांनी प्रबोधनकारांचे नातू आणि बाबासाहेबांचे नातू हे एक राजकीय अजेंडा घेऊन एकत्र येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती विश्वासार्हता आणि भाजपविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती. त्याच्याच आधारे ही लढाई गुणात्मक पातळीवर पुढे जाईल.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष या महाविकास आघाडीतील ठाकरे - आंबेडकर यांच्याबरोबर राहतील, ही अपेक्षा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांबरोबर संसदीय राजकारणाची पुढची पावले उचलताना उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना जबाबदारीने आणि लोकशाही वरील आपल्या उत्तरदायित्वाच्या भूमिकेने भूमिकेनेच ती उचलावी लागतील.
 
भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याला आता जोडून असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या राजकीय  महाशक्तीचे आव्हान पेलताना, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही पक्ष बरोबर घेऊनच पुढे जावे लागेल, ही आजची राजकीय अपरिहार्यता आहे हे विसरून चालणार नाही.

Published By- Priya Dixit