सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Updated : सोमवार, 5 डिसेंबर 2022 (09:27 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वी शेवटच्या 24 तासांत काय काय घडलं?

Ambedkar
Author,नामदेव काटकर
6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. 
 
जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. 
 
या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी ते त्रस्त होते. मधुमेहाने त्यांचं शरीर पोखरून जर्जर झाले होते. संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछान्यात तळमळत पडून राहावे लागत असे.  
 
बाबासाहेबांच्या शेवटच्या काही तासांबाबत लिहिताना, त्यांच्या या आजारांचा उल्लेख आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांमधील बाबासाहेबांच्या प्रकृतीची कल्पना यातून येईल. 
 
पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआदल्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला काय काय घडलं, हे आपण या लेखातून जाणून घेऊच. तत्पूर्वी, निधनापूर्वी सार्वजनिकरित्या बाबासाहेब शेवटचे कुठे उपस्थित होते, हेही जाणून घेऊ.
 
राज्यसभेतील शेवटचा दिवस  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले, ते भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत. 
 
1956 च्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब दिल्लीबाहेर होते. 12 नोव्हेंबरला ते पाटणामार्गे कांठमांडूला गेले. तिथे 14 नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. 
 
या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले. या कार्यक्रमात नेपाळच्या राजेंनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितले. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. बाबासाहेबांचं बौद्ध जगतातील स्थान यावरून ठळक दिसून येतो. 
 
काठमांडूत विविध स्थळांना, लोकांच्या भेटीगाठीनं बाबासाहेब थकले होते. त्यात भारतात परतत असताना त्यांनी बौद्धधर्मीय तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या. काठमांडूत गौतम बुद्धाचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला, ऐतिहासिक अशोक स्तंभाला, नंतर परतताना पाटण्याहून बुद्धगयेला बाबासाहेबांनी भेट दिली. 
 
या भल्यामोठ्या प्रवासानंतर 30 नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले, तेव्हा ते थकले होते. 
 
इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना जाता येत नव्हतं. तरीही 4 डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा अग्रह धरला. 
 
डॉ. मालवणकर बाबासाहेबांसोबत होते. त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं. 
 
बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले. दुपारी जेवल्यानंतर ते झोपले. बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली. 
 
मुंबईतल्या धर्मांतर सोहळ्याचे नियोजन  
राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी सविता (माईसाहेब) आंबेडकरांनी उठवून कॉफी दिली. 26, अलिपूर रोडच्या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारत बसले होते. 
 
तितक्यात तिथे नानकचंद रट्टू आले.  
 
16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा नियोजित होता. बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूरसारखं धर्मांतर व्हावं, असं मुंबईतील नेतेमंडळींना वाटत होतं. तिथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते. 
 
मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी 14 डिसेंबरच्या तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली. प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं, असं माईसाहेबांनी म्हटलं.
 
मग त्यानुसार विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्याचे बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं. 
 
नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत होते. नंतर अकरा-साडेअकराच्या सुमारास बासाहेब झोपले आणि रट्टूंनाही उशीर झाल्यानं ते तिथेच बंगल्यात झोपले.  
 
बाबासाहेबांचे शेवटचे 24 तास  
5 डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेब उठले. माईसाहेबांनीच चहाचा ट्रे नेत त्यांना उठवलं. तिथेच दोघांनी चहा घेतला. तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघेलेले नानकचंद रट्टू तिथे आले. तेही चहा प्यायले आणि निघाले. 
 
बाबासाहेबांना प्रात:र्विधी उरकण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली. मग न्याहारीसाठी टेबलावर आणून बसवलं. बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसले, बाबासाहेबांनी वर्तमानपत्रं वाचली. 
 
मग माईसाहेबांना औषधं, इंजेक्शन देऊन स्वयंपाकघरात कामाला गेल्या. बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. 
 
मग माईसाहेब बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहीत-वाचीत बसले होते. ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनालेखनाचं काम ते पूर्ण करत होते. 
 
बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले. 
 
दिल्लीतल्या घरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह पुस्तकांपर्यंत माईसाहेब स्वत: खरेदी करत असत. बाबासाहेब संसदेत गेले असताना किंवा झोपलेले असताना त्या ही कामं करत. 
 
5 डिसेंबरलाही बाबासाहेब झोपलेले असतानाच त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉ. मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते. त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती, म्हणून तेही माईसाहेबांसोबत बाजारात गेले. 
 
बाबासाहेब झोपलेले असल्यानं त्यांची झोपमोड टाळण्यासाठी ते न सांगताच गेले. दुपारी अडीचच्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉ. मालवणकर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परतले. तेव्हा बाबासाहेब रागात होते. 
 
माईसाहेबांनी त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात म्हटलंय की, ‘साहेब रागात येणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही, पेन जागेवर सापडलं नाही, तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत. जरासे मनाविरुद्ध घडले वा अपेक्षेप्रमाणे झाले नाही की त्यांचा रागाचा पारा चटकन् वर चढे. त्यांचा राग म्हणजे गडगडाट वाटे. पण साहेबांचा राग क्षणिक असे. हवे असलेले पुस्तक, वही वा कागद सापडला म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांचा राग कोठे पळून जात असे.’ 
 
बाजारातनं आल्यावर त्या थेट बाबासाहेबांच्या खोलीतच गेल्या. आपण वाटत पाहत असल्याचं बाबासाहेबांनी सांगितलं. मग त्यांना समजावून माईसाहेब बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाकघरातच गेल्या. 
 
रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात बौद्धधर्म-जैनधर्मावर चर्चा करत होते. 
 
चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या 12 व्या खंडात लिहिल्याप्रमाणे, 6 डिसेंबरला जैनांचे संमेलन भरणार होते आणि त्यात जैन मुंनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी चर्चा करावी, असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. 
 
याचदरम्यान डॉ. मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकले होते. डॉ. मालवणकरांनी परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेनं निघाले, असं माईसाहेबांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
 
मात्र, चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांवरील चरित्रात म्हटलंय की, ‘डॉ. मालवणकर निघताना बाबासाहेबांशी चकार शब्द बोलले नाहीत.’ 
 
नंतर जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं. “दुसऱ्या दिवशी (6 डिसेंबर) संध्याकाळची माझ्या सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या, आपण चर्चा करू,” असं बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळला सांगितलं होतं. 
 
मग बाबासाहेबा ‘बुद्धमं सरणं गच्छमि’ या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले. 
 
माईसाहेब सांगतात की, बाबासाहेब आनंद मन:स्थितीत असले म्हणजे ते बुद्धवंदना आणि कबिराचे दोहे म्हणत असत. 
 
थोड्या वेळाने माईसाहेबांनी दिवानखाण्यात डोकावून पाहिले तेव्हा बाबासाहेब रेडिओग्रॅमवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास नानकचंद रट्टूंना सांगत होते. 
 
मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले. त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडेच जेवण केले. त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या. माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले. ‘चलो कबीर तेरा भवसगर डेरा’ हा कबीरांचा दोहा बाबासाहेब तालसुरात गात होते. 
 
मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले. त्यांच्या हातात काही ग्रंथही होते.
 
 जाता जाता बाबासाहेबांनी नानकचंद रट्टूंना ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’च्या प्रस्तावनेची प्रत आणि एस. एम. जोशी, आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. मग ते काम करून नानकचंद रट्टूही त्यांच्या घरी गेले. माईसाहेब स्वयंकापघरात आवाराआवरीच्या कामात गुंतल्या. 
 
...आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं  
माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित-वाचीत बसत. बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन-लिखाण चालत असे.
 
पण 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली. 
 
मग एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंना, तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास झोपी गेले. 
 
अत्यंत भावनिक होत माईसाहेब लिहितात की, 5 डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली. 
 
‘सूर्यास्ता’नं उजाडलेली 6 डिसेंबरची सकाळ  
6 डिसेंबर 1956 ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या. सकाळचे सात-साडेसात वाजले होते.  
 
माईसाहेब लिहितात की, “खोलीत गेल्यावर पाहिलं की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी साहेबांना दोन-तीनवेळा आवाज दिला. पण त्यांची काही हालचाल दिसली नाही. मला वाटले की, त्यांन गाढ झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि...” 
 
बाबासाहेबांचे झोपेतच परिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना धक्का बसला. त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. बंगल्यात माईसाहेब आणि मदतनीस सुदामा असे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवेल्या आवाजात सुदामाला हाक मारली. 
 
मग माईसाहेबांनी डॉ. मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं. डॉ. मालवणकरांनी ‘कोरामाईन’ इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही. तेव्हा मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणायला सांगितलं. 
 
सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले. मग कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सोडून गेले होते. 
 
माईसाहेब सांगतात की, मग तिघांनीही विचारविनियम करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. 
 
नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, यूएनआय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगानं देशभर पसरल्या. 
 
हजारो अनुयायी दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडच्या दिशेनं येऊ लागले. 
 
चांगदेव खैरमोडे त्यांनी लिहिलेल्या चरित्रात म्हणतात की, ‘बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार सारनाथला करण्याचा आग्रह माईसाहेब करत होत्या.’ मात्र, बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार मुंबईत करण्याचा आग्रह माईसाहेबांनी धरल्याचं त्या आत्मचरित्रात म्हणतात. 
 
मात्र, अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा निर्णय झाला. मग दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली. 
 
जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूरमार्गे मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलं. पुढे मुंबईत अभूतपूर्व अंत्ययात्रा देशानं पाहिली.
 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनावरून पुढे माईसाहेब आंबेडकरांवर अनेक आरोप झाले. अगदी माईसाहेबांच्याच भाषेत सांगायचं तर बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं ‘कसोटीपर्व’ सुरू झालं.
Published By -Smita Joshi