गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (09:03 IST)

नामांतर चळवळ : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी?

मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन 29 वर्षं झाली पण अजूनही नामांतर किंवा नामविस्तार म्हटलं की एक प्रदीर्घ लढा आठवतो. मराठवाड्यातल्या आजच्या चाळीशी-पन्नाशीतल्या लोकांनी हा लढा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भोगला आहे. त्या नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत. भलेही जखमा भरून निघाल्या असतील. पण व्रण अजूनही कायम आहेत. भीमा कोरेगावच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारीच्या नामविस्तार दिन सोहळ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
 
काल-परवा हीच मंडळी वीर योद्ध्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावला गेली होती. तीच मंडळी नामांतर लढ्यात वीर मरण आलेल्यांचे स्मरण करतील. कारण इतिहास विसरून नामानिराळे होता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'जे आपला इतिहास विसरतात ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत.'
 
पण काही मंडळी इतिहासच बदलून लोकांची दिशाभूल करतात. त्यामुळेच आपला इतिहास आठवावा लागतो. आपल्या इतिहासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करावा लागतो, या प्रयत्नांतूनच नवी वाट सापडत असते.
या लढ्याचा इतिहास असाच प्रेरणादायी आहे. तसेच तो दिल्या-घेतल्याचा हिशेब मांडणारा आहे. हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. कुणाचा दुस्वास करणारा तर मुळीच नव्हता. ज्या डॉ. बाबासाहेबांनी झोपडी-झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या महामानवाला अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता.
हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं. अनेक पुरोगामी संघटना आणि व्यक्तींचा या लढ्याला सक्रिय पाठिंबा मिळत होता. विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून उभे ठाकले होते. म्हणून तर नामांतराची लढाई संपायला १७ वर्षं लागली. एवढा दीर्घकाळ हा संघर्ष लांबत गेला.
 
चळवळीची पार्श्वभूमी
1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, गावातील पाणवठ्यांवर पाणी भरता यावे, यासाठी दलित पॅँथरचं आंदोलन सुरू होतं. त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणी जोर धरू लागली.
 
1974च्या मराठवाडा विकास आंदोलनातही नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराची याचा पाठपुरावा करत असे. 1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. तसं आश्वासनही दिलं. मात्र 1978ला महाराष्ट्रात सरकार बदललं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं. विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली होती.
मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी नामांतराबाबत पुढाकार घेतला. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन नामविस्ताराचा ठराव मंजूर केला. दिनांक 27 जुलै 1978ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली. भविष्यात मात्र वेगळेच वाढून ठेवलेलं होतं.
 
दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते. त्यामुळे नामांतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या. एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता.
वास्तविक पाहता नामांतर हे एक साधे आंदोलन होते. पण नामांतराला त्वेषाने विरोध केला गेला, तेवढ्याच तीव्रतेने दलितांच्या या आंदोलनाला लढ्याचे स्वरूप आले. दलितांना एकटे पाडले जात होतं. हर तऱ्हेने दलितांची कोंडी केली जात होती, छळ केला जात होता. अत्याचारात भयानक क्रूरता होती. विशेष म्हणजे हल्लेखोर मोकाट सुटले होते.
 
प्रख्यात साहित्यिक कमलेश्वरांची औरंगाबादला भेट
श्री साप्ताहिकाचे पंढरीनाथ सावंत आंदोलनाच्या तीव्रतेचा आणि हिंसाचाराचा वेध घेण्यासाठी मराठवाड्यात आले होते. प्रकाश शिरसाठ यांनी सावंत यांना मराठवाडाभर फिरवले. शिवाय होरपळलेल्या समाज मनावर फुंकर घालणे, त्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्या दिशेनेही पावले उचलली जात होती.
प्रख्यात हिंदी लेखक विचारवंत कमलेश्वर औरंगाबाद येथे येऊन गेले. बाबा आढाव, बाबा दळवी, बापूराव जगताप, अ‍ॅड. अंकुश भालेराव ही मंडळी नामांतरवाद्यांची बाजू मांडत होती. काही जणांनी तुरुंगवासही भोगला. जीवावर उदार होऊन आंदोलनात उतरलेल्या गौतम वाघमारे (नांदेड) आणि विलास ढोने (पश्चिम महाराष्ट्र) यांनी थेट मृत्यूला कवटाळले.
 
विद्यापीठाची फाळणी
दलित पँथरच्या चळवळीने राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, ज. वि. पवार, रामदास आठवले, गंगाधर गाडे असे अनेक धडाडीचे आणि झुंझार नेते महाराष्ट्राला दिले. तद्वत नामांतर लढ्याने मराठवाडाभर नेते आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ उठवले. कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली.
एका गटाने अस्मितेची लढाई लढली, तर दुसऱ्याने नामांतर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला होता. शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली. तो नामविस्तार दिन (१४ जानेवारी) म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.
 
समाजात दुही का वाढली?
स्वातंत्र्याच्या आधीपासूनच शेती नसलेले आणि हातावर पोट असलेली दलित कुटुंबं मजुरीसाठी शहरांकडे धाव घेत होती. शहरांकडे स्थलांतर करणारे कुणी एकाजातीचे नव्हते, तर अठरापगड जातींचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व उदयाला आल्यानंतर त्यात अधिकची भर पडली. शिक्षण आणि रोजगारासाठी शहरे सोयीची ठरत होती. लोक शहरात स्थिरावले. पण गावगाडा खिळखिळा होत गेला. बारा बलुतेदारीची वीण उसवली.
या स्थलांतराचा ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला. शेतीची घडी विस्कटली, शेत-कामासाठी मजूर मिळेनासे झाले. त्यात 1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या बरोबर लाखो दलितांनीही धर्मांतर केलं. गावकीची कामं सोडलीच होती आता हिंदू धर्मही सोडला.
 
कालपर्यंत खाली मान घालून चालणारा, 'जी मालक' म्हणत कायम कमरेत वाकलेला दलित माणूस ताठ मानेने वावरू लागला. दलितांचे असं 'पायरी सोडून' वागणं अनेक सवर्णांच्या डोळ्यांत खुपू लागलं होतं. दलितांचा स्वाभिमान अनेकांना मुजोरपणा वाटत होता.
 
शिवाय कामधंद्याला शहरात गेलेली ही मंडळी सणासुदीला नवेकोरे अंगभर कपडे घालून टेचीत गावात यायची. गाठीला पैसा अडका असायचा बायकांच्या अंगावर नवं लुगडं, एखाद दुसरा दागिणाही दिसायला लागला होता. त्यांच्याकडं जे होतं ते त्यांच्या कष्टाचेच, घाम गाळून कमावलेले होते. तरीही इतरांना ते बघवत नव्हतं. या ना त्या कारणानं काही सवर्णांच्या मनात दलितांविषयीची असूया वाढत गेली. हा सगळा राग नामांतर आंदोलनात उफाळून आला.
नामांतर विरोधकांनी केवळ दलितांवरच आपला राग काढला नाही तर सरकारी मालमत्तांवरही हल्ले चढवले. यावेळी झालेल्या हिंसाचाराचा तपशील सरकार दरबारी उपलब्ध आहे. एवढं मात्र खरं या आंदोलनात लागलेला आगडोंब विझायला दीड-दोन वर्षं लागली. पोळलेली मनं तर अजूनही शांत झाली नाहीत. समाज मनातली दुहीची दरी अजूनही मिटलेली नाही.
 
नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी?
आता तर थोर पुरुष आणि संतांची समाजनिहाय वाटणी सुरू झाली आहे. 'तुझा नेता थोर की माझा नेता थोर' या वादातून तरुणांना भडकवले जात आहे. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धी हरवून, जातीचा टिळा लावून माथेफिरूंसारखे हे तरुण वागतात. हा लढा लढला गेला. लढणारे लढले. मरणारे गेले. मात्र या लढ्याची झळ पोहोचलेली हजारो माणसं आजही जिवंत आहेत.
 
त्यांनी जे भोगले त्यांच्या जाणिवा, त्यांचे दु:ख आजच्या पिढीपर्यंत किती झिरपत आले, हे सांगता येणार नाही. कारण माणसांची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. 'ये तो चलतेही रहता है' अशी मानसिकता वाढत आहे. म्हणून नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज आहे. तरच इतिहास बिघडवणे वा बदलण्याचे मनसुबे उधळून टाकता येतील.
 
Published By - Priya Dixit