रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (08:27 IST)

तर भारताचा अफगाणिस्तान होईल - चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे टोला

“धार्मिक आणि जातीय कट्टरतेला प्रोत्साहन दिल्यास समाजात उभी फूट पडून नरक बनेल. तसेच, भारतात अफगाणिस्तानप्रमाणे तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तरुणांनी सतर्क रहावे” असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
 
महबूबाबाद आणि कोठागुडेम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर संबोधित करताना केसीआर म्हणाले, “केंद्रात पुरोगामी विचारांचे आणि निप:क्षपाती सरकार असेल तर देश, राज्य प्रगती करू शकेल. केंद्राने राज्य सरकारला मदत न केल्याने तेलंगणाचे सकल उत्पादन ( जीडीपी ) वाढले नाही,” असा आरोप केसीआर यांनी केला.
 
“देशाची अवस्था तालिबानसारखी झाली, तर गुंतवणूक येईल का? नोकऱ्या मिळतील का? सध्याचं उद्योगधंदे राहतील का? देशात अशांतता निर्माण होत, लाठीचार्ज आणि गोळीबारसारखे वातावरण निर्माण झाले, तर समाज कसा राहणार? देशाला चुकीच्या मार्गावर नेण्याचं प्रयत्न होत आहेत,” असेही केसीआर यांनी सांगितलं.
 
“देशात पाणी आणि विजेची संसाधने उपलब्ध आहेत. तरी, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्या-राज्यात पाण्यावरून वाद सुरु आहे. दिल्लीतही पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही, हे लज्जास्पद आहे. असे असतानाही मोठी-मोठी भाषणे केली जातात,” असा टोला केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला.

Published By - Priya Dixit