गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (11:45 IST)

तेलंगणा : के.चंद्रशेखर राव यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न? तीन जणांना अटक

Telangana
तेलंगणामध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. तेलंगणा पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना फितवून पक्षांतर करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तिघांवर आहे.
 
तेलंगणा राष्ट्र समितीने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
पोलिसांनी सांगितलं की, तीन लोक अच्चमपेटचे आमदार गुव्वला बालराजू, कोल्हापूरचे आमदार बीरम हर्षवर्धन रेड्डी, पिनपकाचे आमदार रेगाकांता राव आणि तांदूरचे आमदार पायलट रोहीत रेड्डी यांना लाच देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पक्षांतरासाठी हे प्रलोभन दाखवलं जात होतं.
 
सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी सांगितलं की, तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हैदराबादमधील एका फार्म हाऊसवर छापे घालून शोध घेतला गेला.
 
बुधवारी (26 ऑक्टोबर) रात्री तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदारांनी स्वतःच ही माहिती दिल्याचं रवींद्र यांनी सांगितलं.
 
"आमदारांनी सांगितलं की, तीन लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांना पैसा, पद, वेगवेगळे करार यांचं आमिष दाखवून पक्ष सोडायला सांगितलं. या माहितीच्या आधारे रंगारेड्डी जिल्ह्यातील मोईनाबादमधील फार्म हाऊसवर छापा घालण्यात आला आणि तिथे तीन लोक सापडले. या तिघांपैकी रामचंद्र भारती ऊर्फ सतीश शर्मा हे हरियाणाच्या फरीदाबादमधील एका देवळात पुजारी आहेत. त्यांना यापूर्वीही हैदराबाद आणि दिल्लीत पाहिलं गेलंय," असं स्टीफन रवींद्र यांनी सांगितलं.
 
तिरुपती इथले एक स्वामीजी, ज्यांना सिम्हाजी म्हणूनही ओळखलं जातं, तेदेखील रामचंद्र भारतींसोबत आले असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. त्यांनी सांगितलं की, नंदकुमार नावाच्या व्यक्तीने या तिघांना इथे आणलं होतं आणि आमदारांसोबत चर्चाही केली होती.
 
3 नोव्हेंबरला मुनुगोडे विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. इथे टीआरएस, बीजेपी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.
 
तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रतोद दस्यम विनय भास्कर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, के चंद्रशेखर राव यांचं सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत.
 
केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते जी. किशन रेड्डी यांनी मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरच आरोप केले आहेत. मुनुगोडे पोटनिवडणुकीत हरण्याच्या भीतीने ते हे सगळं नाटक करत असल्याचं रेड्डी यांनी म्हटलं आहे.
 
टीव्ही-9 न्यूज चॅनेलशी फोनवरून बोलताना त्यांनी म्हटलं की, "भाजपला आमदारांची काय गरज आहे."
 
टीआरएसचे आमदार बालका सूमन यांनी या प्रकरणी भाजपवर आरोप केला आहे. "भाजपनं रचलेल्या या षडयंत्राचा आमच्या आमदारांनी भांडाफोड केला आहे. सपूर्ण देश आज पाहत आहे भाजप नेमकं काय करत आहे ते," असं ते न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलले आहेत.