त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेन, असा इशारा खोपकर यांनी दिला
अमेय खोपकर यांनी अलीकडेच मुस्लिमांना इशारा दिला होता. ज्या हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांना फटाक्यांचा त्रास होतोय, त्यांनी देश सोडून निघून जावं, असं विधान खोपकरांनी केलं. खोपकरांच्या या विधानावरून सोशल मीडियात त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही अमेय खोपकर यांच्यावर टीकास्र सोडलं.
किशोरी पेडणेकरांच्या टीकेला अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे शिवसेनेचे नेते माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करतील, त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेन, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. यावेळी अमेय खोपकर म्हणाले की, किशोरी पेडणेकर यांनी अशा विषयांवर बोलू नये. सध्या त्यांचं पक्षातील अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी आदळआपट करायला सुरुवात केली आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षातील महत्त्व वाढत आहे. यामुळे किशोरी पेडणेकरांचा जळफळाट होत आहे. यातूनच त्यांनी माझ्यावर टीका केली आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor