रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:16 IST)

चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याने काहीच फरक पडणार नाही : फडणवीस

एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. कालच्या त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही, असं सांगतानाच यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस  औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही. पण यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीकाही केली.
 
एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन दुसऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री मला भेटले होते. त्यामुळे मला यात काही फार महत्त्वाचे वाटत नाही. या सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. देशातील विविध राज्यात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कुठेही त्याचा परिणाम झाला नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. त्याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असं ते म्हणाले.