शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:14 IST)

मुख्यमंत्री न झाल्याने संजय राऊत यांनी युतीत विष कालवलं; मोहित कंबोज यांचा दावा

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची खोटी कथा संजय राऊत यांनीच रचली होती. संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती तोडण्याचं काम संजय राऊत यांनीच केलं. तसेच भाजप आणि शिवसेनेमधील दुरावा कायम राहावा यासाठी दररोज सकाळी येऊन बोलणे हे संजय राऊत यांचं राजकारण आहे, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.  सकाळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी हा उल्लेख केला आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यापासून भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊतांविरोधात आघाडी उघडली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि मुख्यमंत्रीपदावरून युतीमध्ये झालेले मतभेद या सर्वाला संजय राऊतच कारणीभूत असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.
 
वाधवान प्रकरणावरूनही मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राऊत साहेब वाधवान यांना कोविड काळात कुणी पास दिला? त्यांच्यासाठी कुठल्या बंगल्यावरून फोन गेला होता. गेल्या एक वर्षापासून वाधवान कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे. कोण कोण नेते त्यांना भेटायला गेले होते. जेलमधील कैद्याला पंचतारांकित सुविधा मिळत आहेत. या सरकारमध्ये कोण मदत करत आहे. हॉस्पिटलला अय्याशीचा अड्डा कुणी बनवला आहे, असा सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारपांची मालिका सुरू आहे. सुरुवातीला किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या या जुगलबंदीत आता इतर नेतेही सहभागी झाले आहेत.