रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:34 IST)

मंत्र्यांच्या निधी वाटपात आता मुख्यमंत्री लक्ष घालणार; काँग्रेसची नाराजी दूर !

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. निधी वाटपात इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींसोबत अन्याय होतो, अशी काँग्रेस मंत्र्यांची भूमिका आहे. त्यातूनच त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर आहेत. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. लोकप्रतिनिधींच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेत आता आपण स्वत: लक्ष घालणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला दिलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. काँग्रेसचे नेते बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने भेट घेतली. काही त्रुटी होत्या त्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. ऊर्जा विभागाचा विषय होता. वीज कापावी लागत आहे. त्यावर चर्चा झाली. निधी वाटपाबाबत चर्चा झाली. निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

पैसा कसा उभा करता येईल या विषयावर चर्चा झाली. निधी वाटपावर चर्चा झाली. समान निधी वाटप करुन राज्याचा समान विकास कसा होईल, यावर चर्चा झाली. अशा अनेक विषयांवर चर्चा झाली, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जे काही आरोप केले आहेत त्या आरोपांची तातडीने चौकशी व्हावी. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने लक्ष ठेवून योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली, असं पटोले यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ बदलाच्या निर्णयबाबतची चर्चा ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील. ते हायकमांड आहेत. ते त्याबाबत चर्चा करतील, अशी भूमिका पटोले यांनी मांडली.

निधी वाटपाची जबाबदारी आपण स्वत: घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री स्वत: या वादावर तोडगा काढणार आहेत. ते या प्रकरणात प्रमुख भूमिका निभावतील, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“कोरोना काळात काय परिस्थिती होती ते सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती देखील बरी नव्हती. आता ते बरे झाले आहेत. ते या सर्व प्रकरणाकडे निश्चितच लक्ष देतील”, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.