विधानसभा अध्यक्षपदाची निवड गाजणार?
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने सभागृहात शक्तिपरीक्षेस सामोरे जाण्याबद्दल मुंबईत जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावर जाऊन भेट घेतली आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत होता असे सांगण्यात येते. त्याच बरोबर महामंडळांच्या नियुक्त्या यावर तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वर्तणूकीवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे राजकीय संबंध दुरावल्याच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. प्रताप सरनाईक, अजय चौधरी आणि विजय शिवतारे या शिवसेना आमदारांचे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जाहीरपणे वाजले आहे. प्रताप सरनाईकांनी उघडपणे भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. अजय चौधरी – जितेंद्र आव्हाड़ यांच्यात वाद झालाय. शरद पवारांच्या हस्ते म्हाडाचे निवास टाटा रूग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले. तो निर्णय उध्दव ठाकरे यांनी फिरवला. या पार्श्वभूमीवर शिवसेना – राष्ट्रवादी संबंध आलबेल नाहीत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. ते पवारांना आवडले नव्हते. पण त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागला. आता दुसऱ्या नेत्याला त्यातही पुणे जिल्ह्यातील संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात थोपटे बसत नाहीत. कारण ते पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत.
अशा स्थितीत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात घेण्याचा निर्णय शरद पवारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गळी उतरविल्याचे बोलले जात आहे.
उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकट्याने सुमारे ४० मिनिटे भेट घेतली होती. हे पवार विसरले असण्याची शक्यता नाही. आपल्याला टाळून जर उध्दव ठाकरे थेट पंतप्रधानांना भेटत असतील, तर जो राजकीय सिग्नल घ्यायचा तो पवारांनी घेतला आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना धक्के देण्याचा अथवा राजकीय धडा शिकविण्याच्या मनसूबा पवारांनी ठेवल्याचे बोलले जात आहे.