सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (21:12 IST)

साताऱ्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम आता राज्यभर

महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.साताऱ्यात पोलीस विभागाने या पथदर्शी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सहा महिन्यांतच या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नरत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली. त्याची घोषणा सादर केलेल्या अर्थसंकल्पात केल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
 
महिला सुरक्षेसाठी अभिनव कार्यप्रणाली निर्माण करणारा आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री श्री देसाई यांनी या उपक्रमाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले होते. तसेच वेळोवेळी आढावा घेऊन पोलीस यंत्रणा आणि संबंधितांना प्रोत्साहन दिले. सातारा पोलीस दलाने पथदर्शी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला. महिलांसाठी असलेल्या कायदेविषयक जागृती, पोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने तपास करणे, आरोपींना तातडीने अटक करणे, लवकर आरोपपत्र दाखल करणे, आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच पिडीत महिला व बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे यासाठी पोलीस विभागाने गंभीरपणे पावले उचलली. त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठीही पोलीस विभागाने नियोजन केले.
 
सातारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ जुलै २०२१ पासून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत यातून पाचशेहून अधिक युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण, तर ३७ हजारांहून अधिक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे परिणाम जिल्ह्यात सकारात्मक दिसून आले आहेत.साताऱ्यात पोलीस विभागाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला. सातारा पोलिसांनी घेतलेल्या कष्टामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने हा उपक्रम आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे ठरवले आहे. सातारा पोलिसांनी या पथदर्शी उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच त्याची व्याप्ती वाढवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यासाठी सातारा पोलिसांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले आहे.