तुमचा फोन टॅप होतोय; भाजपच्या मंत्र्यानेच मला सावध केले होते
फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात आता संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी मी त्यांना इतकेच म्हटले की, माझे बोलणे कोणाला ऐकायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. मी लपूनछपून कोणतीही गोष्ट करत नाही. त्यामुळे ज्यांना माझे बोलणे ऐकायचेय त्यांना ऐकू द्या, असे राऊत यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.तत्कालीन भाजप सरकारच्या हातात असलेल्या सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचं फोनवरचं संभाषण ऐकण्यात आले, असा आरोप आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.