गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2008 (18:59 IST)

हॉकीत भारताचा प्रवास चढ उताराचाच

भारतीय पुरूषांच्या हॉकी संघाने २००७ मध्ये आशिया कप जिंकला असला तरी आठ वेळा ऑलिंपिक विजेता होणाऱ्या या संघापुढे पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्र ठरण्याचे आव्हान आहे.

आशिया कप विजेतेपद वगळले तर भारतीय पुरूष व महिला संघ २००७ मध्ये फार काही विशेष करू शकलेले नाही. ऑलिंपिकमध्येही हे संघ पात्र ठरू शकले नाही यावरूनच संघांची कामगिरी लक्षात घ्यावी.

या वर्षी हॉकीच्या दृष्टीकोनातून घडलेली चांगली बाब म्हणजे २०१० मध्ये होणाऱ्या पुरूष हॉकी विश्वकरंडकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आपली गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा कमावण्यासाठी दिल्ली येथे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद खेचून आणण्यात यश मिळविले आहे. या अंतर्गतच ऑस्ट्रेलियातील रिक चार्ल्सवर्थ यांना भारतीय हॉकीचे तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. निराशाजनक कामगिरीमुळेच भारतीय खेळाडू व प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत कुठेही दिसले नाहीत.


आशिया कपमध्ये चौदा गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा प्रभूज्योतसिंग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या स्पर्धेत होता. पण ऑस्ट्रेलियाच्या जेमी ड्वेयर याने बाजी मारत पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये तर एकीलाही नामांकन मिळू शकले नाही, यातच सारे काही आले. यंदा कोणत्याही हॉकी खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मिळू शकला नाही. अर्जुन पुरस्कारही फक्त ज्योती सुनीता कल्लूला मिळाला. द्रोणाचार्य पुरस्कार या क्षेत्राला मिळाला नाही. वीरेंदर सिंह यांनाच फक्त जीवनगौरव पुरस्कार व ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले.

तुघलकी निर्णय घेण्याची परंपरा याही वर्षी पाळण्यात आली. आशिया कपमध्ये प्रत्येक गोलसाठी बक्षिस व आपल्या संघावर गोल झाल्यास दंड असा विचित्र नियम महासंघाचे अध्यक्ष के. पी. एस. गिल यांनी काढला. ज्याच्यावर सर्वत्र टीका झाली.

भारतीय पुरूषांचा संघ नवे प्रशिक्षक जोकिम कारवाल्हो यांच्या नेतृत्वाखाली ५ ते १३ मेपर्यंत मलेशियात अझलह शाह हॉकी स्पर्धा खेळायला गेला. पण तेथे तिसऱ्या क्रमांकापर्यंतच संघाने धडक मारली. सेमी फायनलमध्ये मलेशियाकडून भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला. अखेर कास्य पदकासाठी झालेली लढत भारताने दक्षिण कोरीयाला हरवून जिंकली.

त्यानंतर २३ जून ते एक जुलैपर्यंत बेल्जियममध्ये झालेल्या सहा देशांच्या स्पर्धेत संघ सहभागी झाला होता. यातील विजेत्याला प्रतिष्ठित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती. पण पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर न करता येण्याची जुनी चूक भारताला भोवली.

अर्जेंटिनाविरूद्धच्या सामन्यात तर भारताला अकरा पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. त्यातील एकावरही गोल होऊ शकला नाही. परिणामी या सामन्यात २-१ अशी हार पत्करावी लागली. परिणामी अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले. अखेर इंग्लंडला हरवून भारताला कास्य पदक तेवढे मिळाले.

वरिष्ठांची ही कामगिरी असताना २१ वर्षाखालील संघाची कामगिरीही वेगळी नव्हती. जर्मनीत आठ देशांदरम्याची मालिका खेळण्यास गेलेला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. अर्थात वर्षाच्या शेवटी झालेल्या बीएसएनएल आशिया कपमध्ये कामगिरी उंचावून भारताने हा कप आपल्याकडेच राखला हे यश नमूद करावे लागेल.

अकरा देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत भारताने सलग सात सामने जिंकून विजेतेपद पटकावले. आशियातील पहिल्या क्रमांकाचा संघ दक्षिण कोरीयाला भारताने दोनदा हरविले, तर श्रीलंकेला तब्बल २०-० अशा विक्रमी गोलांनी पराभूत केले. भारताने आशिया कपमध्ये तब्बल ५७ गोल केले आणि त्यांच्याविरूद्ध फक्त पाच गोल झाले. अंतिम फेरीत कोरीयाला तर ७-२ अशी शिकस्त दिली.

महिला संघाची सुरवात निराशाजनक झाली. चार देशांच्या स्पर्धेत जपानविरूद्धच्या सामन्यातच या संघाला मात खावी लागली. इटलीत झालेल्या चौरंगी स्पर्धेतही याचीच पुनरावृत्ती झाली.

हॉंगकॉंगमध्ये झालेल्या सहाव्या आशिया कप स्पर्धेत संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नऊ देशांच्या या स्पर्धेत थायलंड, सिंगापूर यांना १६-० असे हरवून सुरवात चांगली केली होती. पण त्यानंतर कामगिरीत सातत्य न राखल्याने संघाला पुढे जाता आले नाही.

दिल्लीत खेळल्या गेलेल्या चौरंगी लाल बहादूर शास्त्री महिला हॉकी स्पर्धेत अझरबैझानला १-० असे हरवून भारतीय संघाने या वर्षातील एकमेव विजेतेपद मिळविले. भारतीय पुरूष व हॉकी संघांपुढे ऑलिंपिकसाठी पात्र होणे हेच एक मोठे आव्हान नजिकच्या काळात आहे.

पुरूष हॉकी संघ मार्चमध्ये चिलीतील सॅंटियागो येथे ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळेल. तर महिला संघ एप्रिलमध्ये रशियात कझान येथे ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळेल.