मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

काय गमावले आणि काय कमावले?

-नितिन फलटणकर

वर्ष 2007 ज्या प्रमाणे सरले त्याच प्रमाणे पहाता- पहाता 2008 ही संपले. देशातील दहशतवाद रोखण्‍यास सरकारला अपयश आले, परंतु यावर्षी भारताच्या शिरपेचात काही नविन मोती जडले गेले. आपण चंद्रावर पोहचलो. आणि यातूनच नविन आशा आपल्याला मिळाली. काळोखानंतर प्रकाश      
सरत्या वर्षात आपल्याला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. यात मुंबईवर झालेला हल्ला हा कधीही न भरुन येणारी जखम बनली. यात 170 हून अधिक नागरिकांचा बळी गेला. महाराष्ट्राने तीन हिरे या युद्धात गमावले. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, पोलिस कम‍िशनर अशोक कामटे, आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांना या युद्धात विरमरण आले.


दुसरीकडे अभिमानाची बाबा अशी की, या वर्षात भारताने अनेक मोती आपल्या शिरपेचात रोवले. अभिनव बिंद्राने चीनमधून गोल्डमेडल आणले, भारत-अमेरिका अणुइंधन करार मंजूर झाला. पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला. प्रतिभाताई पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या इतक्या अभिमानाच्या बाबीही याचवर्षी घडल्या.
NDND


राजकारण्यांसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. वर्षाच्या मध्यालाच केंद्र सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्र्यांवर नाकर्तेपणाचे आरोप झाले. देशात महागाईचा भस्मासूर झपाट्याने वाढल्याने सामान्यांना जगनेही महाग झाले. मुंबई हल्ल्यानंतर देशातील राजकारणात अनेक बदल झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपले पद गमवावे लागले, तर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आपल्या पदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला.अनेक बड्या अधिकार्‍यांचा अजूनही नंबर लागणार आहे.

केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फारसे काही हाती नाही आले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरुच राहील्याने राज्य आणि केंद्र सरकार अडचणीत सापडले.

साहित्य संमेलनाचा नवा वाद रंगला. 'ते' नावाचे वादळ अर्थात विजय तेंडूलकर यांना आपण मुकलो. त्यांचे निधन आणि जयदेव हट्टंगडी यांचे निधन मनाला चटका लावून गेले.

WDWD
महाराष्ट्राचा विचार करता मनसे नेते राज ठाकरे यांनी मी मराठीचा नारा देत राज्यात सुरु केलेल्या उत्तर भाषकांविरोधातील आंदोलनाने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची खुर्ची जाण्याची वेळ आली होती. दुर्देवाने राज यांच्या या आंदोलनाचा बळीही पहिला मराठीच ठरला. नाशिकला घरी परतताना मनसे कार्यकर्त्यांच्या दगडफेकीने एचएल कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.

राज यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. केंद्रात, लोकसभेत हा प्रश्‍न गाजल्यानंतर केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य सरकारला राज यांना अटक करावी लागली. आणि महाराष्ट्रात शटर डाऊन झाले.

मुंबई हल्ल्यांनंतर मुख्यमंत्रीपदाचा विलासरावांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोण हा खेळ देशाने पाचदिवस पाहिला. अखेर अशोक चव्हाण यांना हा मान मिळाला. परंतु तोंडाशी आलेला घास परत गेल्याने चिडलेल्या राणेंनी कॉंग्रेस विरोधात बंड पुकारले. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. परत ते पक्षाविना रिकामेच.

हे झाले राज्याचे आणि देशाचे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक बदल झाले. यात काही सुखकारक होते, तर काही वेदना देणारे. अमेरिका यंदाच्या वर्षाच्या चर्चेचा विषय ठरला. बुश यांनी इराक विरोधात पुकारलेल्या युद्धानंतर सद्दाम हुसेन यांना देण्यात आलेली फाशी, ओसामाने बुश यांना दाखवलेला ठेंगा, पाकचा दुटप्पीपणा, अमेरिकन बँकांनी बेताल वाटलेल्या कर्जाने बुडालेली अर्थव्यवस्था, गगनाला भेदत वाढलेले कच्च्या तेलाचे भाव या सार्‍या बाबींनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचे कंबरडे तर मोडलेच परंतु महासत्ता म्हणवल्या जाणार्‍या या देशावर जागतिक बँकेकडे हात पसरवण्याची पाळी आली ती याच वर्षात.
WDWD


बुश यांच्यानंतर कोण? हा मुद्दाही या वर्षात बराच गाजला. रिपब्लिकन विरोधात डेमोक्रेटीक अशी लढत यावर्षीच्या अमेरिकन निवडणूकीत दिसून आली नाही. जॉन मेक्कन विरोधात एक कृष्णवर्णीय नेता बराक ओबामा अशी ही निवडणूक लढवली गेली. अपेक्षेप्रमाणे ओबामांच्या गुणांमुळे आणि त्यांच्या धोरणांनी इतिहास रचला. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना जनतेने स्वीकारले. त्यांनी प्रथमच पाकला तंबी दिली ही भारतासाठी समाधानकारक बाब होती. अमेरिकी अर्थव्यवस्था इतकी मोडकळीस आली की नासाने मंगळ प्रकल्पच गुंडाळला.

दुसरी महासत्ता असलेल्या रशियाने जॉर्जियावर केलेला हल्ला संरक्षण तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरला. ठासून भरलेला दारुगोळा रिकामा होताना ज्या आवेशाने फुटतो त्याच आवेशाने रशियाने जॉर्जियाला नेस्तेनाबुत केले. या काळात पुन्हा एकदा अमेरिका आणि रशियात शितयुद्ध सुरू झाल्याने ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना असा प्रश्न अनेक देशांना पडला. कालांतराने अमेरिकी अर्थव्यवस्थाच कोलमडल्याने अमेरिकेनेही याकडे दुर्लक्ष केले.

चीनमध्ये झालेल्या ऑलिंपिकने साऱ्या जगाला स्तब्ध केले. रशिया आणि चीन यावर्षात अधिक निकट आले ही भारतासाठी चिंतेची बाब असून, बीजिंग ऑलिंपिकच्या माध्यमातून चीनने शक्ती प्रदर्शनच केले आहे. गेल्या वर्षभरात चीनने आपली ताकद वाढवतानाच भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका यांना भरघोस मदत देऊ केली आहे, कदाचित हे भारतीय नेत्यांच्या डोळ्यात आले नसले तरी चीन आता तयारीला लागले असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आशियात चीननला टक्कर देणारा एकमेव देश आता भारत उरला आहे. जिथे अमेरिकेची अर्थव्यवस्था मोडली असताना भारताने अमेरिकेला आधार दिल्याने चीनच्या डोळ्यात हेच खुपत आहे, म्हणून येणाऱ्या काळात भारताला जपून पावलं टाकावी लागणार आहेत. चीनने तिबेट प्रश्नी घेतलेल्या भूमिकेला जगभर विरोध झाला. चीनवर मानवाधिकार उल्लंघनाचेही आरोप झाले. चीनमध्ये याच काळात झालेल्या शक्तिशाली भूकंपात लाखो जणांचा बळी गेला. शेजारील राष्ट्र अर्थात पाकमध्येही मुशर्रफ यांची सत्ता जाऊन तेथे लोकशाही पद्धतीने गिलानी आणि झरदारींची निवड झाली, तर दुसरीकडे नेपाळमध्ये माओवादी प्रचंड सत्ताधीश बनले.

सोमालियाच्या चाच्यांनीही यावर्षात लक्ष वेधले. त्यांनी यावर्षात 100 वर जहाजांचे अपहरण केल्याने भारत आणि चीन या ऐभय देशांना आपले नौदल यांच्या बंदोबस्तासाठी अदनच्या खाडीत पाठवावे लागले. अमेरिकेत शिक्षरासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांचे सत्रही यावर्षात सुरुच होते.