सौरव नावाचे वादळ निवृत्त
विकास शिरपूरकर
| आपल्या दीर्घकाळच्या कारकिर्दीत एका लढवय्या सारख्या लढलेल्या सौरवने ऑस्ट्रेलिया विरुध्दचा नागपूर येथील कसोटी सामना आपल्या कसोटी कारकिर्दीतीला शेवटचा असल्याचे जाहीर केल्याने दादाचे चाहते नक्कीच निराश झाले. मात्र दीर्घकाळापासून अपयशाचा सामना करत असलेल्या या वरिष्ठ खेळाडूने निवृत्त होताना ऑस्ट्रेलिया विरुध्द ठोकलेल्या धावांनी आपल्यात अजूनही बरीच आग शाबूत असल्याचे दाखवून दिल्यानंतर निवृत्ती स्वीकारली हे दिलासा देणारेही आहे. संघातील युवा खेळाडूंना सतत पाठबळ देणे. त्यांच्यात धावांची आणि बळी घेण्याची भूक वाढविणे, आणि प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच शब्दात अगदी संत तुकारामांच्या 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' शैलीतून उत्तर देणा-या दादाला म्हणूनच तर 'दादा' म्हणतात. ऑस्ट्रेलियासारखा बलाढय देश असो किंवा पाकिस्तान सारखा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी सौरवच्या नेतृत्वाखाली संघाने या देशांना त्यांच्याच भूमीवर पाणी पाजण्याचा इतिहास घडविला आहे.
|
| जितकी आग गांगुलीची बॅट धावा करून ओकत असे तितकीच गांगुलीच्या बॉडी लॅग्वेजमधूनही झळकायची. आणि म्हणूनच गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एकेकाळी जगातील बलाढ्य संघ समजला जात असे. विश्व चषकात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याची कामगिरीही त्याच्याच काळातली. आज भारतीय संघात तरुण खेळाडूंमध्ये जिंकण्याचा जो स्पिरिट दिसतो हे दादाच्या मेहनतीचेच फळ म्हणावे लागेल. दादाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली ती देखिल या लढाऊ वृत्तीमुळेच. क्रिकेटमध्ये प्रत्येक यशस्वी खेळाडूला विशेषणे दिली जात असतात. तद्वतच सौरवलाही 'द रॉयल बेंगॉल टायगर' म्हणून संबोधले जाते. मात्र हा वाघ केवळ कागदी नव्हता तर त्याची डरकाळी प्रतिस्पर्ध्यांना गर्भगळीत करणारी होती. हे त्याने अनेकदा सिध्द करून दाखविले आहे.
|

