मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By वेबदुनिया|

क्रिकेटमध्ये 'खूशी जादा... गम कम'

जितेंद्र झंवर

नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये दिसते. वर्षभरात भारतीय क्रिकेट संघाने चार 'वन-डे' मालिका जिंकल्या. दोन कसोटी मालिकेत विजय मिळविला. वर्षाच्या अखेरी कसोटीत अव्वल क्रमांकावर मिळविला. कसोटीतील शंभरावा विजय साजरा केला. मात्र टी-20 वर्ल्डकप आणि चॅंपियन्स करंडकमधील पराभव क्रिकेट प्रेमींच्या जिव्हारी लागला. परंतु एकंदरीत वर्ष चांगले राहिले.

PTI
PTI
भारतीय क्रिकेट संघाने वर्षाची सुरवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने केली. या मालिकेत 4-1 असा दणदणीत विजय मिळवून नववर्षाची धडाक्यात सुरवात टीम इंडियाने केली. लंकेत टी-20 मालिकेत विजय मिळवून ट्वेंटी क्रिकेटचे बादशहा आम्हीच असल्याचे सिद्ध केले. श्रीलंका दौर्‍यातील या विजयामुळे न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु या दौर्‍याची सुरवात निराशाजनक झाली. टी-20 मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-0 असा पराभव करुन भारताच्या वर्चस्वाला धक्का दिला. या धक्यातून सावरत भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 अशी तर एकदिवसीय मालिका 3-1 अशी जिंकत किवीच्या संघाला जमिनीवर आणले.
WD
WD


न्यूझीलंड दौर्‍यानंतर आयपीएल स्पर्धा झाली. या स्पर्धेनंतर टी-20 चा वर्ल्डकप होणार होतो. आयपीएलमध्ये भारताचे अव्वल खेळाडू जायबंदी झाले. दुखापतीनंतरही भारतीय खेळाडू वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचले. सेहवागला तर सामने सुरु होण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले. वर्ल्डकपमध्ये गतविजेता असलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असताना भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला. भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले. ' बूंद से गई वो हौद से नहीं आती! ' या म्हणीप्रमाणे वर्ल्डकपनंतर वेस्ट इंडीजमध्ये मालिका भारताने 2-1 अशी मालिका जिंकली. परंतु यामुळे क्रिकेट प्रेमींचे समाधान झाले नाही.

ND
ND
दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार होती. त्यापूर्वी श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ गेला. या मालिकेत विजेतेपद मिळवून भारतीय संघाने अपेक्षा वाढविल्या. परंतु आफ्रिकेतील मैदानात भारतीय संघाने सफशेल नांगी टाकली. या मिनी वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया साखळी फेरीत गारद झाली. या स्पर्धेनंतर मायदेशातच झालेल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरला. ही मालिका 4-2 अशी गमविली.

एकदिवसीयमधील दोन स्पर्धेतील अपयशानंतर वर्षाच्या शेवटी श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका भारताने बरोबरीत सोडविली. त्यानंतर कसोटी मालिकेत 2-0 असे वर्चस्व राखत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनातही अव्वल स्थान पटकविले. कसोटी मानांकन सुरु झाल्यापासून भारत प्रथमच पहिल्या स्थानावर विराजमान झाला. या मालिकेदरम्यान कसोटीतील शंभरावा विजय साजरा केला. कसोटीत सामन्यातील सुरवात गोड आणि शेवटही गोड झाला.

भारतीय क्रिकेटचे वर्ष मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या या विक्रमापासून इतर खेळाडू खूपच लांब आहेत. आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये 20 वर्षांची कारकीर्द मास्टर ब्लास्टरने पूर्ण केली.

महेंद्रसिंह धोनी कर्णधार म्हणून वर्षभरात यशस्वी राहिला. सलग नऊ एकदिवसीय सामन्यात विजय मिळविणारा तो पहिला कर्णधार ठरला. वर्षअखेरीस धोनीने आयसीसी मानांकनात पहिले स्थान मिळविले. वर्षभरात गौतम गंभीर आयसीसी मानांकनात बहुतांशीवेळा पहिल्या स्थानावर होतो.