मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By वेबदुनिया|

टेनिस, बॅडमिंटन, मुष्टियोद्धात चढती कमान

जितेंद्र झंवर

क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात इतर खेळांकडे आता लक्ष दिले जात आहे. टेनिस, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस, गोल्फमध्ये मिळालेल्या यशामुळे क्रीडा प्रेमी या खेळांकडे वळत आहेत. यामुळे पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एक चांगला संदेश यावर्षी गेला आहे. सानिया मिर्झा, सोमदेव देववर्मन, युकी भांबरी, लिएंडर पेस, पंकज अडवाणी, विश्वानाथन आनंद, साईना नेहवाल यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे केले आहे. परंतु हॉकीतील गतवैभवासाठी अजून प्रतिक्षाच करावी लागणार आहे. इतर खेळांमध्ये यश मिळत असले तरी हॉकीतील अपयशाची मालिका यावर्षी कायम राहिली.

PTI
PTI
टेनिस
टेनिससाठी वर्ष सुवर्णमय राहिले. भारतीय खेळाडूंनी वर्षभरात चार ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत यश मिळविले. डेव्हिस कपमध्ये अकरा वर्षानंतर जागतिक गटात स्थान‍ मिळविले. सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीच्या माध्यातून दोन युवा खेळाडू भारतीय टेनिसला मिळाले. वर्षाच्या सुरवातीला सोमदेवने चेन्नई ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून चांगली सुरवात केली. त्यानंतर महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद मिळविले तर युकी भांबरीने ज्युनिअर गटातील एकेरीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताचा लिएंडर पेस याने चेक गणराज्याचा साथीदार लुकास डलूही याच्याबरोबर खेळत फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
WD
WD


डेव्हिस कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात 4-1 असे पराभूत करीत 11 वर्षानंतर भारतीय संघाने जागतिक गटात प्रवेश मिळविला. सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीसाठी हे वर्ष चांगले राहिले. वर्षाच्या सुरवातील एटीपी मानांकनात 204 क्रमांकावर असलेला सोमदेव वर्षाच्या शेवटी 126 व्या क्रमांकावर आला. युकी वर्षाच्या प्रारंभी 1156 व्या क्रमांकावर होतो. परंतु वर्ष संपताना त्याने मोठी उडी घेतली असून तो 338 क्रमांकावर आला आहे. सोमदेवेने चेन्नई ओपनमध्ये अंतिम फेरी गाठताना दोन वेळेचा विजेता स्पेनच्या कालरेस मोया याचा पराभव केला होतो. अंतिम सामन्यात त्याला क्रोएशियाच्या मारिन सिलिचकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु त्याने चांगला संघर्ष केला. त्यानंतर सिलिचचा मेसन टेनिस क्लासिक स्पर्धेत पराभव करुन चेन्नईतील पराभवाचा बदला घेतला.

सानिया मिर्झासाठी सन 2009 ऐतिहासिक राहिले. सन 2008 मध्ये दुखापतीमुळे विविध स्पर्धातून बाहेर राहिल्यानंतर ती मानांकनात 100 च्या पलीकडे गेली होती. परंतु यावर्षी चांगले पुनरागमन करीत ती 57 व्या क्रमांकावर पोहचली. महेश भूपतीबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद तिने मिळविले. हे विजेतेपद मिळविणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. ‍सानियाने हैदराबादमधील उद्योगपती सोहराब मिर्झाबरोबर साखरपुडा करुन खासगी जीवनात हे वर्ष ऐतिहासिक ठरविले. पुरुष दुहेरीत महेश भूपती आणि त्याचा जोडीदार नोल्स ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले. परंतु त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. वर्षाच्या शेवटी या जोडीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता भूपती आपला जुना जोडीदार मॅक्स मिरनीबरोबर खेळणार आहे.


बॅडमिंटन
WD
WD
बॅडमिंटनसाठी वर्ष ऐतिहासिक राहिले. साईना नेहवालने या खेळात असलेला चीन खेळाडूंचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. साईनाने सुपर सिरीज स्पर्धेत विजेतेपद मिळवून भारतीय बॅडमिंटनची आपण मोठी स्टार असल्याचे स्पष्ट केले. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. त्यापूर्वी जून महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत तिने विजेतेपद मिळविले होते. साईनला या वर्षी अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच पी.गोपीचंदला द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मिश्र दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि व्ही. दीजू यांनी चांगली कामगिरी केली. या जोडीने ताइपै ग्रांपी गोल्ड स्पर्धा जिंकून पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले.

मुष्टियोद्धा
बीजिंग ऑलिंपिकमध्ये मुष्टियोद्धात सुरु झालेली विजयाची मालिका यावर्षी सुरु राहिली. यामुळेच विजेंदर सिंहबरोबर मेरी कोम हिला राजीव गांधी पुरस्कार देऊन गौरविले गेले. विजेंदर, अखिल, जितेंदर, सुरंजय, ननाओ आणि मेरी कोम यांनी चांगली कामगिरी करीत देशाला पदके मिळवून दिली. सुरंजयने चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके वर्षभरात पटकविली. विजेंदरने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळविल्यानंतर मिलानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकवून इतिहास निर्माण केला. 42 वर्षानंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळाले. यामुळे हे वर्ष भारतीय मुष्टियोद्धासाठी सुवर्णमय राहिले. कुस्तीमध्ये सुशीलकुमारची कामगिरी चांगली राहिली.
WD
WD



हॉकी वादात राहिली
राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचा सुवर्णकाळ अजून परत आलेला नाही. यामुळे मागील आठवणी काढून अभिमान बाळगण्याची वेळ भारतीय हॉकी प्रेमींवर यावर्षी आली. हॉकीची मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरी कामगिरी यावर्षी चांगलीच गाजली. हॉकी इंडियाचे गठण, अझलन शाह स्पर्धेचे विजेतेपद याच हॉकीतल्या चांगल्या बाबी आहेत.

WD
WD
भारतीय संघाने तेरा वर्षानंतर अझलन शाह कप जिंकून हॉकी प्रेमींना खूश केले. परंतु आशिया कपमध्ये पाचव्या तर चॅम्पियन चॅलेंज स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावर भारतीय संघाला समाधान करावे लागले. यावर्षी जोस ब्रासा या विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करुन हॉकीला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न हॉकी इंडियाने केले. त्याचा सकारात्मक परिणाम यावर्षी तर मिळाले नाही. हॉकी इंडियाच्या गठणातील वादही यावर्षी चांगला गाजला. त्यानंतर संदीपसिंग याच्याकडून कर्णधारपद काढून राजपालसिंगला देण्यात आलेल्या कर्णधारपदाभोवती वादाचे स्वरुप राहिले. गोलकिपर बलजीत सिंग याच्या डोळ्याला सराव करताना दुखापत झाली. त्यामुळे जवळजवळ तो डोळा त्याने गमविला होतो. परंतु केंद्र सरकारने त्याच्या उपचाराचा खर्च उचलत त्याला अमेरिकेत पाठविले. त्याच्या डोळ्यात सुधारणा झाली असली तरी त्याच्या मैदानात उतरण्याबाबत अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिला हॉकीची कामगिरी चांगली राहिली. महिला संघाने चॅम्पियन चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्यानंतर आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकविले. अकरा वर्षानंतर भारतीय संघ आशियाईत अंतिम फेरीत पोहचला होतो.

जागतिक व्यावसायिक बिलियडर्स स्पर्धेत पंकज अडवाणीने विजेतेपद मिळवून इतिहास निर्माण केला. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदसाठी हे वर्ष संमिश्र राहिले. ऍथलेटिक्समध्ये वर्षभरात फारशी चमकदार कामगिरी झाली नाही.

भारताच्या क्रीडा इतिहासात डोपिंगचा यावर्षी नवा अध्याय जोडला आहे. जानेवारीमध्ये राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी संस्थेची (नाडा) स्थापना झाली. त्यानंतर 24 खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. तसेच 15 खेळाडूंच्या भविष्यावर अजून निर्णय व्हायचा असून, 25 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.