शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2009 (13:45 IST)

वाढत्या महागाईत सरले वर्ष

WD
WD
2009 हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या उंच उडी घेतली की, सोने घ्यावे का डाळ याचा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला.

सुरुवातीला 13 टक्क्यांपर्यंत गेलेला महागाई दर दणक्यात शून्याखाली गेल्याने सरकारच्या मनात धडकी भरली. महागाई दर नकारात्मक गेल्याने सरकारचेही धाबे दणाणले. रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात काही कडक उपाययोजना केल्यानंतर या वर्षाच्या मध्यानंतर महागाई दर पुन्हा एकदा शून्याच्यावर आला.

कॉग्रेस सरकार सत्तेवर असतानाच महागाईने 13 टक्क्यांपर्यंत मजल मारली होती, तर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आल्यानंतर महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत आला आहे. आता वर्ष सरत आले आहे.सरत्या वर्षात काय महागले याचा गिनती करणे अशक्य आहे. डाळ, साखर, तांदूळ, शेंगदाणे, या जीवनावश्यक पदार्थांच्या दरात टप्प्या टप्प्याने वाढ होत गेली.

भाज्यांचीही हीच अवस्था झाली आहे. कधी कांदे महागतात, तर कधी टमॅटो, कधी बटाट्यांचे भाव गगनाला भिडतात, तर कधी कोथिंबिरीची जुडी 50 रुपयांवर जाते.

महागाईच्या त्सुनामीत अनेकांचे बजेट कोलमडले आहे. दुधापासून ते अगदी डायबेटिसच्या गोळ्यांपर्यंत सारे काही महाग झाले आहे.
मागील नऊ महिन्यांचा विचार करता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात महागाई थोडीफार नियंत्रणात आली होती. यानंतर मात्र अन्नधान्य निर्देशांक आणि महागाई दर सातत्याने वधारत आहे.
WD
WD


जानेवारी: जानेवारी महिन्यात खाद्य पदार्थ, एटीएफ इंधन, अल्कोहल, या वस्तूंच्या किंमती दणक्यात वाढल्याने महागाई दर दुसऱ्या आठवड्यात वाढत 5.64 टक्क्यांवर गेली होती. यापूर्वीच्या आठवड्यात हेच दर 5.60 टक्के होते.

फेब्रुवारी: या महिन्यात 31 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.68 टक्क्यांनी घसरत 4.39 टक्क्यांवर आले होते, परंतु जीवनावश्यक वस्तू मात्र महागल्या होत्या. या वस्तू महागल्याने 14 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.50 टक्क्यांनी घसरत 3.36 टक्क्यांवर आला होता.

मार्च: 28 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर घसरत 2.43 टक्क्यांवर आल्यानंतर देशातील अर्थतज्ज्ञांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. प्रथमच महागाई दर इतके घसरले होते. दुसरीकडे देशातील वस्तू मात्र महाग झाल्याने सामान्यांना कोणती आकडेवारी खरी मानावी हा प्रश्नच पडला होता. सात मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर घसरत चक्क 0.44 टक्क्यांवर आले होते.

एप्रिल: चहा, तेल, गूळ आणि डाळींच्या किंमती या महिन्यात गगनाला भिडल्याने महागाई दर 21 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 0.31 टक्क्यांवर आली होती.

मे: मे महिन्यात महागाई दर 0.48 टक्क्यांनी वाढत 0.61 टक्क्यांवर आले होते. या महिन्यातही जीवनावश्यक वस्तू महागच होत्या.

जून : या महिन्यात महागाई दर 0.48 टक्क्यांवर आले होते. सलग दोन आठवडे शून्या खाली असलेल्या या दरांनी सरकारच्या मनातील धडकी आणखी वाढवली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महागाई दराची हीच अवस्था होती.

सप्टेंबर: सप्टेंबर महिन्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने 12 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर वाढत 0.37 टक्क्यांवर आले होते. यापूर्वीच्या आठवड्यात हेच दर 0.12 टक्क्यांवर होते. मागील वर्षाचा विचार करता हे दर या कालावधीत 12.42 टक्क्यांवर होते. या महिन्यात पहिल्यांदा महागाई दर सकारात्मक झाले होते.

ऑक्टोबर: 26 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.70 टक्क्यांवर आले होते. यापूर्वी हेच दर 0.83 टक्क्यांवर होते. या महिन्यातही जीवनावश्यक वस्तू महागल्या होत्या.

नोव्हेंबर: नोव्हेंबर महिन्यात फळं, भाज्या, गहू, ज्वारी, आणि डाळी प्रचंड महागल्या होत्या. 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 13.68 टक्क्यांवर गेले होते.

डिसेंबर: कांदे, तांदूळ, गहू, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने अन्नधान्यावर आधारीत महागाई दर दणक्यात वाढत 17.47 टक्क्यांवर गेले.

WD
WD
या सर्व महिन्यांचा आढावा पाहता वर्षभरात अनेक वस्तूंचे दर झपाट्याने वाढल्याने सामान्यांचे जगणे माग झाले होते. महागाईला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने या प्रश्नी हात वर करण्याचा प्रयत्न केला, तर राज्य सरकारने मात्र यास केंद्रच जबाबदार असल्याचे सांगत आपले अंग या प्रकरणातून काढून घेण्याचा प्रयत्न केला.