बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (12:00 IST)

एक मराठा लाख मराठा : मराठी क्रांती मोर्चा

मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाचे स्वरूप इतके मोठे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विषय समजून घेवून ९ ऑगस्टला मोर्चातील सर्व मागण्या मान्य केल्या. किती मोर्चे निघाले आणि वर्षभर नेमके काय घडले याबाबतचा लेख. कोपर्डी प्रकरण ते मोर्चातील नेमक्या काय मागण्या होत्या काय पूर्ण झाल्या त्याचा हा लेखाजोखा पुढील प्रमाणे आहे.
 
जेव्हा पुढील शतक येईल तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक इतिहास तपासाला जाईल तेव्हा मात्र मराठा समाजाच्या अभूतपूर्व क्रांती मोर्चांची आवर्जून दखल इतिहास कार घेतील. त्यातही आंदोलन सुरु होते ते फक्त मौन धरत लाखोंच्या संख्येने समुदाय रस्त्यावर उतरला होता. राजकीय आणि सामाजिकरीत्या महाराष्ट्र हादरवून टाकला आहे.
 
आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील मराठा क्रांती मोर्चा हे महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला ‘मराठा क्रांती मोर्चा’काढण्यात आला. यानंतर बीड, जळगाव,परभणी,हिंगोली,नांदेड सह राज्यातील ५७ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. याबरोबरच राज्याबाहेरही बिदर, इंदोर, देवास, बुऱ्हानपूर, ग्वाल्हेर या शहरांमध्ये तसेच रशिया, नेदरलँड, दुबई, अमेरिका आदी देशांमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता.तर मुंबई येथे ५८ वा मोर्चा निघाला आणि तो सर्वा अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे.
 
या मोर्चाचे विशेष असे की कोणत्याही नेता अथवा पुरुष यांचे नेतृत्व करत नव्हता तर शिस्तबद्ध महिला-तरुणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन अग्रभागी भगवा ध्वजधारक युवती व त्यापाठोपाठ लहान मुले, शालेय र्थिनी, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व इतर समाजबांधव राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी असे या सर्व मोर्चात सहभागी झाले होता.
 
कोपर्डी प्रकरण नेमके काय होते ?
कोपर्डी प्रकरणात बळी गेलीली निष्पाप मुलगी अवघी 15 वर्षांची होती. हे सर्व प्रकरण १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर येथे घडले. या प्रकरणात तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे केवळ अहमदनगर सह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशही हादरून गेला होता. हा प्रकार इतका भयानक होता की मानवता हादरली आहे. या प्रकरणातील आरोपी पीडितेशी अत्यंत क्रूर वागले होते. त्यांनी मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना दिल्या होत्या. ते तिच्याशी असे काही वागले होते की,जणू ती काही एखादी निर्जीव वस्तूच आहे. वस्तिवरील एका मुलाने त्या तिन्ही नराधमांना पाहिले. मुलाला पाहताच हे नराधम पळू लागले पण,या मुलाने त्यांचा पाटलाग केला. तिघांपैकी जितेंद्र शिंदे नावाच्या एका नराधमाला या मुलाने ओळखले. त्याने गावात येऊन या प्रकाराची माहिती दिली.दरम्यान,सध्या कोपर्डी गावात शांतता आहे. आरोपी ज्या दलित वस्तीतील आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे आरोपींची पाठराखण केली नाही. आरोपीचे कुटूंबिय घरदार सोडून निघून गेल्याचे समजते.
 
मराठा आरक्षण प्रश्न काय आहे ?
मराठा क्रांती मोर्चे होण्यापूर्वी व वर्तमान भाजप–सेना युती शासन सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी सरकारने राणे समितीच्या हवाल्यानुसार सामाजिक,शैक्षणीक व आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव संमत केला व त्या संबंधीचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाविरोधात काही कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप–सेनेचे सरकार सत्तेत आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर ९८ पानी स्थगितीचे निर्देश दिले. महाराष्ट्र शासनाने प्रवर्गाचे आरक्षण विषयक अध्यादेशाची मुदत संपताना कायदा केला. या कायद्यालाही न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे.
 
राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुर संस्थानच्या जाहीरनाम्यात २६ जुलै १९०२ रोजी प्रशासनातील नोकऱ्यात ५० टक्के आरक्षण दिले गेले व त्यात मराठा जात सामील होती. १९५६ मध्ये नेमलेल्या कालेलकर आयोगाने मराठा जातीचा समावेश इतर मागासलेल्या समाजामध्ये केलाय. आता कुणबी मराठा, मराठा कुणब्यांना ओबीसीच्या आरक्षणाची कवाडे उघडण्यात आलीत. त्यामुळे आता हिंदु-मराठ्यांचाही समावेश ओबीसींमध्ये करा किंवा मराठयांसाठी स्वतंत्र आरक्षण द्या,मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकऱ्यांत आरक्षण द्या अशी मागणी जोर धरतेय.

मुख्यमंत्री  देवेद्र फडणवीस अत्यंत मुत्सदी पद्धतीने अनेक प्रश्न हाताळत आहे. वर्षभर होत असलेल्या मोर्चाची त्यांनी योग्य ती दखल घेतली. वेळोवेळी सरकार आणि पक्षाची भूमिका त्यांनी समोर ठेवली होती. आरक्षण आणि इतर मागण्या कश्या मान्य केल्या जातील आणि कायद्यात कश्या प्रकारे बसवल्या जातील हे त्यांनी सांगितले. अत्यंत संयमी पद्धतीने त्यांनी प्रश्न हाताळला आणि कोणालाही त्यांनी दुखावले नाही. त्यांनी मुद्देसूद आणि योग्य प्रकारे कोपर्डी आणि मोर्चातील प्रश्न हाताळला आहे.