गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (12:23 IST)

Russia-Ukraine War: रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नुकत्याच झालेल्या रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, मंगळवारी असे वृत्त आले की रशिया खोरसान परिसरातून नागरीकांना बाहेर काढत आहे. हा भाग नुकताच रशियाने जोडलेल्या भागाला लागून आहे. रशियाच्या ताज्या कारवाईकडे त्या प्रदेशातील लढाई तीव्र होण्याची चिन्हे म्हणून पाहिले जात आहे. यामुळे युक्रेनमध्ये चिंता वाढली आहे.
 
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी पुष्टी केली की रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या वीज प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. ते म्हणाले की, 10 ऑक्टोबरपासून युक्रेनमधील 30 टक्के वीज केंद्रे नष्ट झाली आहेत. यामुळे युक्रेनमधील अनेक भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
 
रशियाने या महिन्यात आपली युद्धनीती बदलल्याचे स्थानिक निरीक्षकांचे मत आहे. आता ते मुख्य लक्ष्य म्हणून युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी पुष्टी केली की त्यांनी युक्रेनच्या ऊर्जा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी मंगळवारी सांगितले की रशियाने युक्रेनच्या वीज केंद्रांवर हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. यासोबतच सागरी तळांवरून शस्त्रेही डागण्यात आली. ते म्हणाले की, सध्याच्या हल्ल्यांच्या टप्प्यात युक्रेनच्या शस्त्रास्त्रांच्या दुकानांनाही लक्ष्य केले जात आहे, जेथे पाश्चात्य देशांकडून पाठवलेली शस्त्रे आणि उपकरणे ठेवण्यात आली आहेत.
 
या हल्ल्यांदरम्यान रशियाने इराणमध्ये बनवलेल्या कामिकाझे या ड्रोनचा वापर केल्याचा दावाही पाश्चात्य माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यांमध्ये किमान आठ जणांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रशियाने इराणने बनवलेल्या ड्रोनच्या वापराला दुजोरा दिलेला नाही.रशिया सध्या युक्रेनच्या मूलभूत पायाभूत सुविधा नष्ट करून देशाचे सामान्य जीवन ठप्प करण्याच्या धोरणाचा अवलंब करत आहे.
 
डनिप्रो भागात हल्ला झालेल्या पॉवर हाऊसमधून धूर निघत असल्याचे दिसले. सीएनएन टीमने पुष्टी केली आहे की अनेक भागात वीज नाही. यामुळे अनेक रुग्णालयातील उपचारही ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.
 
 
 
Edited By - Priya Dixit