गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (10:42 IST)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर: 2022च्या पुरस्कारासाठी 5 नामांकनांची घोषणा

बीबीसीने चौथ्या ' बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कारांचं आयोजन केलं आहे आणि त्यासाठीच्या नामांकनांची घोषणा झाली आहे.वर्ष 2022च्या पुरस्कारासाठी नामांकनं मिळालेल्या खेळाडू आहेत वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगाट, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि मुष्टियोद्धा निखत झरीन.
 
एकता भ्यान, 2018 सालच्या आशियाड पॅरा खेळांमध्ये सुवर्णपदकविजेत्या पॅरा ॲथलीट, यांनी पॅरा ॲथलीट्सचा सन्मान केल्याबद्दल बीबीसीचं कौतुक केलंय.
 
अपंगत्व असलेल्या लोकांकडेही कौशल्य आणि क्षमता असतात आणि त्या ओळखून त्या साजऱ्या केल्या पाहिजे हा महत्त्वाचा संदेश यातून जातो, असं त्या म्हणाल्या.
 
पुढे त्यांनी म्हटलं, "पॅरा खेळांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्याप्रति समावेशकता आणण्यात अशा प्रयत्नांची मदत होते. यामुळे पॅरा ॲथलीट्सना स्पर्धेत सहभागी होण्याच्या आणि उत्तुंग भरारी घेण्याच्या अधिक संधी मिळतील आणि अपंगत्व असलेल्या अनेक लोकांना खेळात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आहे."
 
बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंह यांनी म्हटलं, "आपल्या महिला खेळाडूंनी वेळोवेळी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्या खऱ्या योद्ध्या आहेत. आपल्या महिला खेळाडूंचा गौरव करण्याप्रति बीबीसीची जी कटिबद्धता आहे त्याचं मी स्वागत करतो."
 
बीबीसी न्यूजच्या भारतातील प्रमुख रुपा झा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं : हा पुरस्कार भारतीय महिला खेळाडूंच्या योगदानाचा आणि क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या यशाचा सन्मान करतो.
 
बीबीसीच्या कोणत्याही भारतीय भाषांच्या वेबसाईटवर किंवा बीबीसी स्पोर्टच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला मत देऊ शकता.
 
20 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत मतदान खुलं असेल आणि विजेत्यांची घोषणा 5 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत एका समारंभात केली जाईल. सर्व अटी शर्ती तसंच प्रायव्हसी नोटीस वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत.
 
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईट्सवर तसंच बीबीसी स्पोर्ट वेबसाईटवर विजेत्यांची घोषणा केली जाईल. ज्या खेळाडूला सर्वाधिक मतं मिळतील त्या यंदाच्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या मानकरी ठरतील.
 
नामाकंन मिळालेल्या खेळाडूंची थोडक्यात ओळख;
 
मीराबाई चानू
वेटलिफ्टिंग चॅम्पियन साईखोम मीराबाई चानू हिने क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. 2021 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर ठरलीय.
2022 च्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत तिने रजत पदक जिंकलं तर त्याच वर्षी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं.
 
2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई निर्धारित भार उचलण्यात अपयशी ठरली होती आणि तिने जवळपास या खेळाला अलविदा केला होता.
 
पण 2017 साली जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णवेध घेतला.
 
मणिपूरमध्ये जन्माला आलेल्या मीराबाईचे पालक चहा विक्रेते होते. आपल्या क्रीडा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने अनेक अडथळे पाहिले.
 
पण या सगळ्यांवर मात करत तिने ऑलिम्पिक पदकापर्यंतचा पल्ला गाठला. मीराबाई चानूने 2021 साली बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता.
 
साक्षी मलिक
2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत या साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. 58 किलो वजनीगटात तिने कांस्यपदक जिंकलं होतं.
ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती चौथी भारतीय महिला खेळाडू होती. साक्षीला पहिल्यापासून खेळात रस होता आणि आपल्या पैलवान आजोबांकडून तिला प्रेरणा मिळाली.
 
रिओ ऑलिम्पिकमधील यशानंतर साक्षीच्या कारकीर्दीला ओहोटी लागली, पण 2022 साली बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिने जोरदार पुनरागमन केलं.
 
साक्षी मलिकने त्यापूर्वीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रजत आणि कांस्यपदक जिंकलं होतं.
 
विनेश फोगाट
कुस्तीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन पदकं जिंकणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला आहे. कॉमनवेल्थ आणि आशियाड खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारीही ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
लागोपाठच्या तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये विविध वजनी गटांमध्ये तिच्या नावावर सुवर्णपदकं आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये 53 किलो वजनी गटात तिने आपलं शेवटचं सुवर्णपदक जिंकलं.
 
विनेश महिला कुस्तीपटूंच्या कुटुंबातून येते, तिच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत.
 
पी. व्ही. सिंधू
बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधू ही पहिली भारतीय महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकली.
टोकियोमध्ये जिंकलेलं कांस्यपदक तिचं दुसरं ऑलिम्पिक मेडल ठरलं, 2016 साली रिओमध्ये जिंकलेलं रजत पदक तिचं पहिलं मेडल होतं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं.
 
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (BWF) वर्ल्ड टूर फायनल्स 2021 मध्ये सिंधूने रजत पदक जिंकलं होतं. 2019 साली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत सिंधूने इतिहास रचला होता. वयाच्या 17 व्या वर्षी 2012 साली तिने BWF च्या क्रमवारीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं होतं.
 
सिंधू 2019 साली पहिल्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरली होती.
 
निखत झरीन
2011 साली ज्युनिअर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या निखतने 2022 साली जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा खिताब आपल्या नावावर केला.
 
2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निखतने फ्लायवेट गटात सुवर्णपदक जिंकलं. 2022 साली भारतातील नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्णपदक जिंकलं.
आपल्या मुलीने तिची ऊर्जा योग्य ठिकाणी लावावी या विचाराने निखतच्या वडिलांनी तिला क्रीडा जगताची ओळख करून दिली.
 
वयाच्या बाराव्या वर्षी एका सामन्यादरम्यान निखतचा डोळा सुजला, नातेवाईकांनीही तिचं लग्न कसं होईल असे टोमणे मारले, पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निखतच्या वडिलांनी तिला आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Published By- Priya Dixit