बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (19:02 IST)

Break Point: लिअँडर पेस आणि महेश भूपतीची जोडी का फुटली?

सुप्रिया सोगले
पेस - भूपती जोडीला 'इंडियन एक्सप्रेस' म्हणून ओळखलं जात होतं. पण क्रीडा क्षेत्रातील या जोडीमध्ये वाद झाले आणि ते वेगळे झाले.
 
टेनिसपटू महेश भूपती आणि लिअँडर पेस या प्रसिद्ध जोडीच्या प्रवासावर 1 ऑक्टोबरला डॉक्युड्रामा प्रदर्शित होतोय. प्रेक्षकांना यामध्ये त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना पाहायला मिळतील. 'ब्रेक पॉइंट - ब्रोमांस टू ब्रेकअप' असं या सीरिजचं नाव आहे.
 
लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये डेव्हिस कपपासून ते ग्रँडस्लॅम आणि विम्बल्डनपर्यंत किताब मिळवले. भारतात टेनिसची लोकप्रियता वाढवण्यासाठी या दोघांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे.
या सीरिजमुळं जुन्या वादांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला असं, महेश भूपती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"ते वाद पुन्हा एकदा अनुभवणं हे अत्यंत भावनिक होतं. मात्र, आम्ही त्यासाठी तयार होतो. ही सीरिज सुरू होण्यापूर्वीच आम्हाला माहिती होतं की, आम्ही कशामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तयार होतो, आणि आम्ही हे केलं याचा आम्हाला आनंद आहे," असं ते म्हणाले.
लिअँडर पेसनं भारताला टेनिसमध्ये अनेक स्पर्धांमध्ये मोठं यश मिळून दिलं आहे. एक काळ असा होता जेव्हा हे दोघं टेनिसपटू कोर्टवर विजयाचा डंका वाजवत होते, त्याचवेळी टेनिस कोर्टबाहेर त्यांचे वैयक्तिक मतभेदही सुरू होते. त्यांच्यातला दुरावा वाढत गेला आणि अखेर 2006 मध्ये ही जोडी तुटली.
 
दोघांच्या नात्यावर चित्रपट तयार करण्याबाबत गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक प्रस्ताव आल्याचं महेश भूपती यांनी सांगितलं. पण गोष्टी पटत नव्हत्या. अखेर नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर तिवारी यांच्यांशी याबाबत चर्चा केली. अंतिम निर्णय झाला.
 
"आमची गोष्ट सांगण्यासाठी आम्हाला कसं स्वातंत्र्य मिळेल, हे त्यांनी समजावलं. त्यामुळं ही गोष्ट सादर करण्यासाठी नितेश आणि अश्विनी योग्य वाटले," असं ते म्हणाले.
 
भारतामध्ये क्रीडा विषयावर डॉक्युमेंट्री सिरीज फार लोकप्रिय होत नाहीत. असं असतानाही हा निर्णय घेण्याबाबत महेश यांनी माहिती दिली. "आम्हाला अनेक लोकांनी डॉक्युमेंट्री ड्रामाला भारतात पसंती मिळत नसल्यानं ते तयार करू नका असं सांगितलं. मात्र, मी आणि लिअँडर आम्ही कायम ट्रेंडसेटर राहिलो आहोत. आम्हाला वाटलं की 2 तासांत आमची गोष्ट सांगणं शक्य नाही. त्यामुळं आम्ही धोका पत्करला आणि आमच्यानंतर आणखी अशा क्रीडा क्षेत्राशी संबंधित सीरिज तयार होतील, अशी आशा करतो."
 
लिअँडरबरोबर पहिली भेट
महेश भूपती यांनी तीन वर्षांचे असताना वडिलांच्या सांगण्यावरून टेनिस खेळायला सुरुवात केली होती. त्यांनी अगदी वरच्या पातळीपर्यंत टेनिस खेळावं अशी त्यांची इच्छा होती. लिएँडर आणि त्यांची पहिली भेट 15 वर्षांचे असताना झाली होती. ते दोघं ज्युनियर टूर्नामेंटसाठी श्रीलंकेला गेले होते. त्या स्पर्धेत दोघं खेळत होते आणि तिथंच त्यांची मैत्री झाली.
महेश यांच्या मते, लिअँडर आणि त्यांच्या नात्याबाबत सर्वांना माहिती आहे. त्यांच्यातील वाद जगापासून लपलेला नाही. मात्र अनेक लोकांना याबाबत स्पष्टीकरण हवं होतं. या सीरिजमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत.
 
टेनिस आणि भारत
भारतात कायम क्रीडा क्षेत्रात क्रिकेटचा दबदबा राहिला आहे.
मात्र, टेनिसबाबतही भारताला कायम खास आकर्षण राहिलं असल्याचं महेश भूपती यांचं मत आहे. पूर्वी विजय अमृतराज, रामनाथन कृष्णन आणि नंतर लिअँडर आणि त्यांची जोडी. त्यांच्या यशानं भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर स्थान प्राप्त करून दिलं.
 
त्यांच्या मते, त्यांनी भारतीय टेनिससाठी एक मार्ग तयार करून दिला आहे. मात्र सध्या भारतीय टेनिसमध्ये फार विशेष काही दिसत नसल्याचं त्यांना वाटत. महेश यांच्या मते, त्यांच्या आणि लिेँडर यांच्यानंतर सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना आले. मात्र आता भारतीय टेनिसमध्ये स्थिरपणा आला आहे.
 
यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकाव्या लागतील, असं ते म्हणतात. ''भारतात टेनिसची काहीही यंत्रणा नाही. एक यंत्रणा तयार करावी लागेल, तरच परिस्थिती बदलेलं,'' असं महेश भूपती याचं कारण सांगताना म्हणाले.