बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (09:02 IST)

बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी, साक्षी मलिक म्हणते 'मी कुस्ती सोडते'

बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण कुस्ती सोडत असल्याचं म्हटलं.
'जर संजय सिंह महासंघात राहणार असतील तर मी कुस्ती सोडत आहे', असं तिने म्हटलं.
 
दिल्लीमध्ये गुरुवारी (21 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिकने म्हटलं, “मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, अध्यक्षपदी बृजभूषण सिंह यांचा सहकारी, बिजनेस पार्टनर असलेला मनुष्य असेल, तो महासंघात राहणार असेल तर मी कुस्ती सोडत आहे. मी यापुढे तुम्हाला कधीही तिथे दिसणार नाही.”
 
साक्षी मलिकने म्हटलं की, "आम्ही लढाई लढलो, मनापासून लढलो...आम्ही 40 दिवस आम्ही रस्त्यांवर झोपलो आणि देशातील अनेक भागांमधून बरेच लोक आमचं समर्थन करण्यासाठी पुढे आले. ज्यांनी आतापर्यंत मला इतका पाठिंबा दिला, त्यांचे आभार."
भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर संजय सिंह यांनी म्हटलं की, "कुस्तीसाठी कँप आयोजित केले जातील. ज्यांना कुस्ती खेळायची आहे, ते कुस्ती खेळतील...ज्यांना राजकारण करायचं आहे, ते राजकारण करतील."
 
साक्षी मलिक हिच्याशी काही महिन्यांपूर्वी आमच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी साक्षी मलिकसोबत संवाद साधला होता. बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाबद्दल तिने आपली भूमिका मांडली होती.
 
त्याचा हा संपादित अंशही इथे प्रसिद्ध करत आहोत.
 
“पदक मिळवल्यानंतर ज्यांनी एवढा मान दिला, घरी बोलावलं होतं; तेच आता काहीही बोलत नाहीयेत, याचं खूप दुःख होतंय.”
 
माझे प्रश्न घेऊन जेव्हा मी साक्षी मलिकच्या रोहतकमधील आखाड्यात पोहोचले, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता आपलं म्हणणं मांडण्याची तिची तयारी दिसली.
 
पाच महिन्यांपासून अधिक काळ चाललेल्या तुमच्या आंदोलनाबद्दल पंतप्रधान मोदींना काय सांगायचं आहे, असं मी विचारल्यावर तिनं म्हटलं, “त्यांनी आतापर्यंत आमच्याशी या विषयावर कोणताही चर्चा केलेली नाहीये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे. आम्ही सगळेजण तर त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. त्यांच्यासोबत आम्ही जेवलो आहोत. आम्हाला ते मुलगी मानतात. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, त्यांनी आमच्या मुद्द्यांची दखल घ्यावी.”
 
“ही जी पोलीस कारवाई होत आहे, ती पूर्णपणे निष्पक्ष व्हावी, तपासात कोणताही हस्तक्षेप होऊ नये हे त्यांनी पुढे होऊन बोलायला हवं. जी काही चौकशी होईल, ती निष्पक्ष व्हावी एवढीच आमची इच्छा आहे.” 
 
सरकार जी पावलं उचलत आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मौन दुखावणारं आहे का, हे विचारल्यावर साक्षीच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला आणि तिनं म्हटलं, “दुखावणारं तर आहे. आम्ही जवळपास 40 दिवस रस्त्यावर होतो. तेव्हाही काही नाही. जेव्हा आंदोलन केलं तेव्हाही काही म्हटले नाहीत. त्यांना पूर्णपणे माहीत होतं की, आम्ही कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन करतोय.”
 
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह साक्षी मलिकने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिलेल्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंहांविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपांवर जवळपास पाच महिने आवाज उठवला होता.
 
बृजभूषण शरण सिंह यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि आपण न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू असंही बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं.
 
सरकारने आतापर्यंत काय केलं?
जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने आरोपांच्या चौकशीसाठी एका ‘ओव्हरसाइट समिती’ नेमली. याच समितीकडे कुस्ती महासंघाचं दैनंदिन काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
 
‘ओव्हरसाइट समिती’ची चौकशी संपल्यानंतर त्याच्या शिफारसी सार्वजनिक करण्यात आल्या नाहीत. मात्र, कुस्ती महासंघाचा कार्यभार दोन सदस्यीय ‘अ‍ॅडहॉक समिती’कडे सोपविण्यात आला.
 
साक्षीसोबतच लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या सर्व महिला कुस्तीपटूंनी ‘ओव्हरसाइट समिती’च्या काम करण्याच्या पद्धतींवर आक्षेप व्यक्त केले होते.
 
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. गृह मंत्री आणि क्रीडा मंत्र्यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली होती.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत केलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं, “बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जे आरोप करण्यात आले, त्यांची चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करणं, कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जून घेणे, या निवडणुकीत सिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश नसावा आणि कुस्ती महासंघामध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार रोखण्यासाठी अंतर्गत समिती बनवली जावी अशा वेगवेगळ्या मागण्यांवर आमची चर्चा झाली.”
 
या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आपलं आंदोलन स्थगित केलं आहे.
 
साक्षी मलिकने बीबीसीशी बोलताना म्हटलं की, याचा अर्थ आंदोलन संपला असा होत नाही. अटकेच्या मागणीवर आम्हाला सरकारकडून कोणतं आश्वासन मिळालं नाहीये. आरोपपत्र 15 तारखेपर्यंत दाखल करण्याचं आश्वासन आम्हाला क्रीडा मंत्र्यांनी दिलं आहे. आरोपपत्रं जितकं भक्कम असेल, कारवाई त्याच हिशोबाने होईल.
 
आतापर्यंत काय काय झालं?
 
यावर्षी 18 जानेवारीला महिला कुस्तीपटूंनी पहिल्यांदा याविरोधात आवाज उठवला.
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासारख्या कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या जंतर-मंतरवरून आवाज उठवला.
त्यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
बृजभूषण सिंह आणि प्रशिक्षक नॅशनल कॅम्पमध्ये महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात, हे सांगतान विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले होते.
बृजभूषण सिंह यांनी कोणत्याही कुस्तीपटूचं शोषण झालं नसल्याचं म्हटलं होतं. जर हे आरोप सिद्ध झाले, तर आपण फासावर जायला तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आणि 23 जानेवारीला आरोपांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय निरीक्षण समिती बनवली.
21 एप्रिल- महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील कनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये बृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही.
23 एप्रिल- कुस्तीपटूंनी दुसऱ्यांदा जंतर-मंतरवर धरणं आंदोलन सुरू केलं.
24 एप्रिल- पालम 360 खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोलंकी या खेळाडूंना समर्थन देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनी दुसऱ्या खाप पंचायतींकडेही समर्थनासाठी अपील केलं.
25 एप्रिल- विनेश फोगाटसह इतर 6 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केल्या. ज्यांपैकी एक एफआयआर ही पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली होती.
नंतर अल्पवयीन कुस्तीपटूंच्या वडिलांनी बृजभूषण सिंहांविरोधातलं आपलं वक्त्व्य मागे घेतलं.
तीन कुस्तीपटूंनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
त्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तिन्ही कुस्तीपटूंची भेट घेतली.
अल्पवयीन कुस्तीपटूचा जबाब आणि अटकेची मागणी
 
आरोपपत्र दाखल करण्यासाठी निश्चित केलेली शेवटची तारीख (15 जून) जवळ येत असतानाच खासदार बृजभूषण सिंह यांनी या रविवारी (11 जून) आपला मतदारसंघ कैसरगंजच्या गोंडा भागात रॅली आयोजित केली होती.
 
केंद्रात भाजप सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या या रॅलीत त्यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर कोणतंही भाष्य केलं नाही.
 
पण शायरी करत त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं, “यह मिला मुझको मोहब्बत का सिला, बेवफ़ा कहके मेरा नाम लिया जाता है, इसको रुसवाई कहें कि शोहरत अपनी, दबे होठों से मेरा नाम लिया जाता है”
 
दरम्यान, पॉक्सो कायद्यांतर्गत ‘अ‍ॅग्रवेटेड सेक्शुअल असॉल्ट’च्या कलमांतर्गत बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या पीडिता कुस्तीपटूने नवीन जबाब दिल्याच्या बातम्या आल्या.
 
साक्षी मलिकने म्हटलं की, ती त्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या संपर्कात नाहीये. तिने दिलेला नवीन जबाब हे दबावात येऊन उचललेलं पाऊल असल्याचं साक्षीचं मत आहे.
 
साक्षीने म्हटलं, “पॉक्सोचं प्रकरण बाजूला केलं, तरी इतक्या तक्रारी पाहता नैतिकतेच्या मुद्द्यावर चौकशीसाठी बृजभूषण शरण सिंह यांना अटक केली जाऊ शकते. पण मला माहिती आहे की, कायदा सर्वांसाठी एक नाहीये.”
 
‘या’ कारणामुळे उठवला लैंगिक शोषणाविरोधात आवाज
ज्या दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये कुस्ती महासंघाच्या प्रशासनात गेल्या 12 वर्षांपासून अध्यक्ष असल्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांचं वाढलेलं प्रभुत्व आणि ताकद यांचा वारंवार उल्लेख आहे.
 
कुस्तीपटूंच्या मते, लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव मान्य न केल्यास त्यांना प्रशासनातील कायद्यांचा वापर करून अनेक पद्धतीने त्रास देण्यात आला. लैंगिक शोषणाविरोधात तातडीने तक्रार न करण्याचं कारणही हेच असल्याचं कुस्तीपटूंचं म्हणणं होतं.
 
त्यांच्यासोबत हे प्रकार करिअरच्या सुरुवातीलाच घडले होते. त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्याचं धाडस त्यांना एकवटता आलं नाही, असं अनेक तक्रारदारांनी म्हटलं.
 
गेल्या वर्षी जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्यावेळी समोर आलेल्या माहितीमुळे यावर्षी जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी आवाज उठविण्याचं ठरवलं, असं साक्षीने स्पष्ट केलं.
 
“2022 मध्ये एक-दोन महिला कुस्तीपटूंनी आम्हाला जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान घडलेल्या लैंगिक शोषणाच्या काही घटना सांगितल्या. तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि काहीतरी करायला हवं, असं आम्हाला वाटलं,” साक्षीने सांगितलं.
 
तेव्हा विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी गृह मंत्र्यांची भेटही घेतली होती. पण पुढे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, असं साक्षीने म्हटलं.
 
त्यानंतर हे तिघेही जण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते आणि पुढची रणनीतीही एकत्र ठरवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी आता 15 जूनची प्रतीक्षा आहे.

Published By- Priya Dixit