शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :कोलकाता , शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (12:05 IST)

फिफा 17 वर्षांखालील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा आज

तीन आठवड्यांपासून भारतात सुरू असलेल्या फिफा 17 वर्षांखालील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत एकापेक्षा एक सरस अशा रोमांचकारी लढतींचा थरार भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अत्यंत उच्च दर्जाच्या अशा या जागतिक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज होणाऱ्या अंतिम लढतीत स्पेन आणि इंग्लंड यांच्यात झुंज रंगणार आहे. अंतिम फेरीत दोन युरोपियन देशांमध्येच लढत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
भारतात होणाऱ्या या पहिल्यावहिल्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या आयोजनाचा मान कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमला मिळाला आहे. अंतिम लढतीनंतर एकूण प्रेक्षकसंख्येचा विश्‍वविक्रम नोंदविला जाण्याची अपेक्षा आहे. अंतिम फेरीतील दोन्ही संघ अत्यंत वेगवान आणि आक्रमक खेळ करण्याबाबत प्रसिद्ध असून इंग्लंडने स्पर्धेत 18 गोल नोंदविले आहेत, तर स्पेनने 15 वेळा गोलजाळ्याचा वेध घेतला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही नेत्रदीपक गोल पाहायला मिळतील, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.