मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 9 जानेवारी 2021 (14:28 IST)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची परवानगी

महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 64व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. 
 
या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे. सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटाझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-19 करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले.
 
दरम्यान पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले जाण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या अनेक भागांतून कुस्तीशौकिन गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.