Khelo India Youth Games: हरियाणा नेमबाजीत तीन सुवर्णांसह एकूण चॅम्पियन बनला, सात पदके जिंकली
खेलो इंडिया युथ गेम्स- अंतर्गत दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये हरियाणा एकंदरीत चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे. हरियाणाच्या रमिताने गुरुवारी मुलींच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. तर हर्षिताने कांस्यपदक पटकावले आहे. राजस्थानच्या देवांशीला रौप्यपदक मिळाले आहे.
गुरुवारी जिंकलेल्या पदकांसह हरियाणाकडे नेमबाजी स्पर्धांमध्ये तीन सुवर्णांसह एकूण सात पदके आहेत. यामध्ये हरियाणाच्या तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. नेमबाजीत हरियाणाने मुलींच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये क्लीन स्वीप करताना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. मुलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्येही हरियाणाने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मुलींच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक हरियाणाच्या खात्यात गेले. तर नेमबाजीच्या पदकतालिकेत पश्चिम बंगालने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून दुसरे स्थान पटकावले.
वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक हरियाणाच्या नावावर झाले. आशिषने 102 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर उत्तर प्रदेशच्या गौतम सिंगने रौप्य आणि चंदीगडच्या परमवीर सिंगला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
बॉक्सिंग स्पर्धांमध्ये हरियाणाच्या विजयाने झाली. मुलींच्या बॉक्सिंग सामन्यात हरियाणाच्या गीतिकाने चंदीगडच्या नेहाला हरवून विजय मिळवला. अन्य एका सामन्यात हरियाणाच्या तमन्नाने चंदीगडच्या काजलचा पराभव केला. मुलांच्या बॉक्सिंग सामन्यात हरियाणाच्या आशिषने मिझोरामच्या झोराममुआनाचा पराभव केला. या विजयासह सर्व विजेत्या खेळाडूंनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.