मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 24 सप्टेंबर 2023 (17:46 IST)

एशियन गेम्समध्ये भारताचा 'विजयारंभ', आतापर्यंत जिंकली 5 पदकं

asian sports
चीनमधील हांगझू इथे होत असलेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये भारताने विजयी सुरुवात केलीय. भारतानं आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत.
पहिलं पदक - महिलांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये भारताच्या मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौक्से यांनी 1886 पॉइंट्स कमावत रौप्य पदक जिंकलं.
 
रमिताने 631.9, मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 पॉइंट्स कमावले.
 
चीनने 1896.6 पॉइंट्सची कमाई करत सुवर्णपदक जिंकलं.
 
दुसरं पदक - भारतीय नाविक अर्जुन लाल आणि अरविंद सिंह यांनी लाइटवेट डबल स्कल्समध्ये रौप्य पदकं जिंकलं. दोघांनीही साडे सहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत आपली शर्यत पूर्ण केली.
 
या शर्यतीत चीनने सुवर्णपदक, तर उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलं.
 
तिसरं पदक - पुरुषांच्या कॉकलेस पेअर इव्हेंटमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव यांनी कांस्य पदक जिंकलं आहे.
 
चौथं पदक - पुरूष कॉक्स 8 इव्हेंटमध्ये भारताने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
 
पाचवं पदक - महिलांच्या 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये रमिताने कांस्यपदक जिंकलं.
 
याशिवाय भारताने बांगलादेशचा आठ विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. जलतरणामध्ये श्रीहरी नटराज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून त्याचा सामना आजच असेल.
 
भारतातून किती खेळाडू सहभागी?
38 खेळांमध्ये भारतातून एकूण 634 खेळाडू सहभागी होत आहेत.
 
अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी संघ सर्वात मोठा असून, एकूण 65 खेळाडू पाठवले जात आहेत.
 
पुरुष आणि महिला फुटबॉल संघात 44 खेळाडूंचा समावेश आहे, तर नौकानयनात 33, नेमबाजीत 30 आणि बॅडमिंटनमधील 19 खेळाडूंचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये सहभागी होणार आहे.
 
एशियन गेम्स : कुठे होतंय, किती देश सहभागी?
23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझू शहरात 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
हांगझू हे यजमान शहर आहे, याशिवाय इतर पाच शहरं निंगबो, वेनझो, हू झो, शाओशिंग, जिनहुआ यांनाही या कार्यक्रमासाठी सह-यजमान बनवण्यात आलं आहे.
 
हांगझू आशियाई खेळात एकूण 40 खेळांचं आयोजन केलं जाईल. या खेळांच्या 61 शाखांमध्ये एकूण 481 स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
 
या खेळांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, इराण आणि इंडोनेशियासह एकूण 45 देश सहभागी होणार आहेत. सुमारे 12 हजार खेळाडूंनी यासाठी नोंदणी केली आहे.





















Published By- Priya Dixit