शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (13:24 IST)

सानिया मिर्झा आणि लुसी रादेका यांनी सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकची जोडीदार लुसी रादेका यांनी दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात सानिया-लुसी जोडीने जपानच्या शुको ओयामा आणि सर्बियाच्या अलेक्झांड्रा क्रुनिचचा 7-5, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
 
सानिया आणि रादेकाला या स्पर्धेत वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. मात्र, आतापर्यंत दोघांची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिप ही डब्ल्यू टीए 500 स्पर्धा आहे. उपांत्य फेरीत सानिया आणि रादेका जोडीचा सामना अव्वल मानांकित जपानच्या अना शिबाहारा आणि चीनच्या शुआई झांग यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
 
दुसऱ्या उपांत्य फेरीत एना आणि शुआई या जोडीचा सामना युक्रेनच्या ल्युडमिला किचेनोक आणि लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेन्को यांच्याशी होईल. सानियाने यापूर्वीच दुबई टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तिने 2013 मध्ये अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससोबत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. 
 
35 वर्षीय सानियाने नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्तीबाबत वक्तव्य केले होते. या वर्षानंतर टेनिसला कायमचा अलविदा करणार असल्याचे तिने सांगितले होते. सानियाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. यामध्ये तीन मिश्र दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे.