सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (10:10 IST)

स्वीटी बुरा आणि नीतू घनघसची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण'झेप

ANI
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या नीतू घनघस आणि स्वीटी बुरा या दोघींनी सुवर्णपदकाला गवसणी घातली.नीतू घनघसने 48 किलो वजनी गटात मंगोलियाची बॉक्सर लुतसाइ खान हिला 5-0 ने हरवून नीतूने सुवर्णपदक पटकावलं.

ही स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये सुरू आहे. शनिवारी (25 मार्च) झालेल्या एकतर्फी सामन्यात नीतूने लुतसाइ हिला सहज नमवलं. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती सहावी भारतीय बॉक्सर बनली आहे.
 
सेमीफायनल सामन्यात नीतू घनघसने कझाकस्तानच्या अलुआ बालकिबेकोआ हिला हरवलं होतं. या स्पर्धेत नीतूशिवाय इतर भारतीय बॉक्सर्सनीही चांगली कामगिरी केली.
 
स्वीटी बुराला 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक
जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या स्वीटी बुरा हिने 81 किलो गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलं आहे.तिने अंतिम फेरीत चीनच्या वांग लीनाचा पराभव केला आहे.
 
तिने शनिवारी (25 मार्च) भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. याआधी नीतू घनघसनेही 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं आहे.
 
या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारामध्ये नीतूने उदयोन्मुख खेळाडूचा किताबही जिंकला आहे.
 
स्वीटी बुरा कोण आहे?
स्वीटी बुराला लहानपणापासूनच ठोसे मारण्याची सवय होती. शाळेच्या दिवसांत स्वीटी फारशी कुणाशी बोलत नव्हती, पण तिला राग मात्र कायम यायचा.
 
स्वीटी बुराने बीबीसीला सांगितलं होतं की, "जर कोणी कोणाशी वाईट वागले तर मी त्याला बेदम मारहाण करायचे. मी त्याला खूप मारायचे. माझे हात खूप चालायचे त्यावेळी."
शाळेत असताना स्वीटी कबड्डी खेळायची. पण शाळेतील वर्गमित्र तिला बॉक्सरच म्हणायचे. पुढे चालून स्वीटीचं बॉक्सिंगच्या जगात त्याचं नाव चमकेल असं क्वचितच कुणाला वाटलं असेल.
 
जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या ASBC आशियाई एलिट चॅम्पियनशिपच्या लाइट हेवीवेट 81 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याचा करिष्मा स्वीटी बुराने दाखवला आहे. विजेतेपदाच्या लढतीत तिने कझाकिस्तानच्या गुलसाया येरझेहनचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं.
 
तिने 2015 मध्ये रौप्यपदक जिंकले होते, तर गेल्या वर्षी कांस्यपदक जिंकले होते. आता तिनं प्रथमच सुवर्णपदक जिंकलं आहे.आशियाई चॅम्पियनशिपमधील विजय स्वीटी बुरासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तिने हे पदक आपल्या कारकिर्दीच्या कठीण टप्प्यात जिंकलं आहे.
 
2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने बॉक्सिंगची सर्वांत मोठी तुकडी पाठवली होती, ज्यामध्ये चार महिलांसह नऊ बॉक्सर होते. पण यावेळी बुराला ऑलिम्पिकचे तिकीट मिळू शकले नव्हते. यामुळे बुरा इतकी नाराज झाली होती की, तिने नऊ महिने बॉक्सिंग ग्लोव्हजला हात लावला नव्हता.
 
दरम्यान, जुलैमध्ये बुराने भारतीय कबड्डीपटू दीपक निवास हुड्डासोबत लग्न केलं आणि पुन्हा एकदा बुराचे लक्ष कबड्डीकडे वळले.
 
Published By - Priya Dixit