खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला २०० कोटींचा निधी मिळावा – क्रीडा मंत्री
खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणाऱ्या पायाभूत सुविधेसाठी २०० कोटीं रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे केली.
केदार यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री श्री रिजीजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध क्रीडाबांबी चर्चा केली. राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याकरिता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून २०० कोटी रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केदार यांनी केली.
कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशी चर्चा बैठकीत झाली. राज्य शासन आणि साईमध्ये झालेल्या कराराप्रमाणे कांदीवली येथील सराव शिबीराचे औरंगाबाद येथे राज्यशासनाने विनामुल्य उपलब्ध करून दिलेल्या जागेत सराव शिबिरे व्हावीत, अशी मागणीही केदार यांनी केली.
विदर्भातील आदिवासी भागातील खेळाडुंना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी दुर्गम भागात केंद्र शासनातर्फे क्रीडा अकादमी सुरू करावी, असा प्रस्तावही श्री. केदार यांनी बैठकीत मांडला. यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे क्रीडा संकुल बांधुन तयार आहे, हे संकुल साईने लीजवर घेऊन याभागातील खेळाडुंना प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव केदारे यांनी केंद्रीय मंत्री श्री. रिजीजू यांच्या पुढे मांडला.