टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा: भविना पटेल अंतिम फेरीत; सुवर्णपदकाच्या शर्यतीत
टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबलटेनिसपटू भविना पटेलने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला.
या स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
क्लास4 गटाच्या सेमी फायनलमध्ये भविनाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या मिआओ झांगवर 3-2 (7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8) असा शानदार विजय मिळवला.
रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत भविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविनाचं कौतुक केलं आहे.
"भविना, तुझं मनापासून अभिनंदन. तू शानदार खेळलीस. संपूर्ण देश तुझ्या देदिप्यमान यशासाठी प्रार्थना करत आहे. रविवारी अंतिम लढतीच्या वेळेसही देशवासीय तुझ्या पाठीशी असतील. कोणतंही दडपण न घेता तू सर्वोत्तम कामगिरी कर. तुझ्या यशाने संपूर्ण देशाला प्रेरणा मिळाली आहे", अशा शब्दांत पंतप्रधानांनी भविनाला शाबासकी दिली आहे.