शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (00:30 IST)

स्पेनमधील कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटला सुवर्ण पदक; जाणून घ्या विनेशचा प्रवास

(बीबीसीच्या भारतीय भाषांच्या तत्कालीन टीव्ही एडिटर वंदना यांनी विनेश फोगाट यांची भेट घेऊन हा लेख लिहिला होता. तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)क्रिकेटच्या विश्वचषकानंतर आता जगभरात पॅरिस ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे.
पण त्याआधी विनेश फोगाटकडून स्पेनमधील Grand Prix 2024 या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
विनेश फोगाटने मारिया ट्युमेरेकोव्हाचा अंतिम फेरीत 10-5 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 5 महिला कुस्तीपटू आणि 2 पुरुष कुस्तीपटू खेळणार आहेत.
विनेश फोगट पॅरीस ऑलिम्पिकसाठी याआधीच पात्र ठरली आहे.
 
याच वर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होतायत. विनेश 50 किलो वजन गटात ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे.
विनेशशिवाय अंशू मलिकने 57 किलो आणि रितिकाने 76 किलो गटात ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.
2022नंतर पहिल्यांदाच विनेश पात्रता फेरीसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. कझाकिस्तानमधील बिश्केक येथे ऑलिम्पिक पात्रतेसाठी सामने झाले होते. तेव्हा 29 वर्षांच्या विनेशने आपलं ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं.
गेल्यावर्षापासून (2023) भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं नेतृत्व विनेशने केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली. तर काही महिन्यांपूर्वीच सरकारने बृजभूषण सिंह यांच्यावर योग्य कारवाई न केल्याने अर्जून पुरस्कार परत केला होता. सिंह यांच्यावर काही कुस्तीपटूंनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेल्या विनेशचा ऑलिम्पकपर्यंतचा प्रवास कसा होता, याबाबतचा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
2020च्या सुरुवातीला बीबीसीच्या टीव्ही एडिटर वंदना यांनी विनेश यांची लखनौमध्ये भेट घेतली. तेव्हा नव्वदच्या दशकात गाजणाऱ्या बॉलिवुडच्या गाण्यांवर विनेश सराव करत होती.
कुस्तीचा डाव लढण्याआधी ती स्वतःला तयार करत होती. लखनौच्या इनडोर स्टेडियमचं हे दृश्य अनेक गोष्टी स्पष्ट करत होतं.
 
जानेवारी महिन्यातल्या एका थंड सकाळी आम्ही महिला मल्ल विनेश फोगटला भेटायला गेलो होतो. विनेश सकाळी सकाळी इथे कसून तयारी करताना दिसली.
आम्हाला पाहून तिने स्मित केलं हात हलवून अभिवादन केलं आणि परत आपल्या सरावात मग्न झाली. तिच्या प्रशिक्षकांच्या एकेक गोष्ट ती तल्लीनतेने ऐकत होती, जणू पुढच्या मॅचची हारजीत यावरच ठरणार आहे. अधून-मधून ती फक्त आपल्या आवडीची गाणी ऐकायला थांबायची, काही पंजाबी काही हिंदी. त्या दिवसाची तिची थीम होती - उदास प्रेमगीतं.
25 ऑगस्ट 1994 ला हरियाणातल्या बलाली गावात जन्मलेल्या एका अशा महिला खेळाडूची कहाणी आहे, जी आपल्या हिंमतीच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातल्या सर्वोतम महिला खेळाडूंपैकी एक बनली.
तीन तास कसून मेहनत केल्यानंतर विनेश मुलाखतीसाठी मॅटवरच बसतानाच म्हणाली, "कुस्ती खेळणं माझ्या नशीबातच लिहिलं होतं."
विनेशचे मोठे काका म्हणजे महावीर फोगट. त्यांनी ठरवून टाकलं होतं की घरातल्या मुलींना कुस्तीपटू बनवायचं. मी तेव्हा फक्त सात वर्षांची होते.
गीता, बबीता महावीर फोगट यांच्या मुली आहेत, तर विनेश त्यांची पुतणी.
 
असा केला सराव
पण तरीही विनेशसाठी हे सोपं नव्हतं. "20 वर्षांपूर्वी हरियाणाच्या लहानशा गावातल्या मुलींनी कुस्ती खेळणं, त्यांना कुस्ती खेळायला शिकवणं याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. पितृसत्ताक विचारसरणी नसानसात भिनली होती. आम्हा बहिणींचे केस कापलेले असायचे, मुलांसारखे. आम्ही शॉर्ट्स घालून सराव करायला जायचो. शेजारच्या बायका आईला येऊन म्हणायच्या कमीत कमी फुल पँट घालायला लावा पोरींना. आईला सुरुवातीला लाज वाटायची हे ऐकून."
सुरुवातीच्या दिवसांमधला संघर्ष विनेश विसरली नाहीये. ती सांगते, "जेव्हा लहान होतो आणि काका खेळायला घेऊन जायचे तेव्हा भारी वाटायचं. कोणत्या लहान मुलाला खेळायला आवडणार नाही. हळूहळू त्यांना वाटलं, या मुलींमध्ये दम आहे, या चांगल्या कुस्तीपटू बनू शकतात. मग आमची दमछाक सुरू झाली. काकांनी असा काही सराव करून घ्यायला सुरुवात केली की विचारता सोय नाही. सकाळी साडेतीनला उठावं लागायचं. आजकालच्या पोरांना असं करावं लागलं ना तर ते पहिल्याच दिवशी पळून जातील."
"जर काही चुकलं तर ट्रेनिंग अजून जास्त वेळ चालायचं आणि फटके पडायचे ते वेगळंच. मग आम्ही शाळेत जायचो. शाळेत जायचो काय, वर्गात झोपाच काढायचो म्हणा ना" विनेश मिश्कीलपणे सांगते.
"तेव्हा आयुष्याचा अर्थ एकच होता, कुस्ती करा, खा आणि गपचूप झोपा. केस वाढवायचीही परवानगी नव्हती कारण काकांना वाटायचं की याने आमचं लक्ष भलतीकडे जाईल. लोक त्यांना बरंच काही बोलायचे, पण काकांचं एकच लक्ष्य होतं, ऑलिम्पिक मेडल."
'ऑलिम्पिक मेडल म्हणजे काय ठाऊकच नव्हतं'
हरियाणातल्या छोट्याशा गावातल्या चिमुरड्या विनेशला माहितीही नव्हतं की ऑलिम्पिक असतं काय...
"आम्ही सरावाला इतक्या वैतागलो होतो की वाटायचं, अरे काय ते ऑलिम्पिक असतं ते काकांना आणून तरी द्या कोणी. आमचा त्रास तरी संपेल. पण फक्त काकांना माहीत होतं ते किती लांबचा विचार करत होते," विनेशच्या चेहऱ्यावर अभिमान झळकतो.
हळूहळू विनेशच्या मेहनीतला फळ आलं. गावातून निघून ती राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकायला लागली. तिचा आयुष्यात टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा 19 वर्षांच्या विनेशने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर एका नव्या महिला कुस्तीपटूचा उदय झाला होता.
प्रत्येक खेळाडूसारखंच विनेशलाही हरायला अजिबात आवडत नाही.
 
'लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं'
हा लढवय्येपणा विनेशला तिच्या आई प्रेमलता यांच्याकडून मिळाला आहे. आपल्या यशाचं श्रेय ती आपले काका आणि आई यांनाच देते.
विनेश जेव्हा खूप लहान होती तेव्हा तिच्या वडिलांचा खून झाला. हरियाणाच्या तत्कालीन पितृसत्ताक समाजात विनेशच्या आईने तिला एकटीने मोठं केलं.
विनेश सांगते, "वडील जिवंत होते तोवर सगळं ठीक होतं. मला खेळताना बघून त्यांना खूप आनंद व्हायचा. पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळं बदललं. गावातले लोक आईला म्हणायला लागले, वडील नाहीत हिचे, लग्न करून द्या हिचं. गीता-बबीताची गोष्ट वेगळी. त्या खेळू शकतात कारण त्यांचे वडील जिवंत आहेत. पण आईने साफ सांगून टाकलं, माझी मुलगी कुस्ती खेळणार. आमची परिस्थिती चांगली नव्हती पण आम्हाला चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या म्हणून आईने खूप संघर्ष केला."
विनेशची आई प्रेमलता सांगतात की त्यांनी विनेशसाठी खूप काही केलं आहे. त्या सांगतात अशी मुलगी सर्वांना मिळावी असंच मला वाटतं.
विनेशनं आपल्या आईसाठी गावात अलिशान घर बांधलं आहे. कॉमनवेल्थनंतर विनेश 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली तेव्हा तिचं पदक पक्कं समजलं जात होतं. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. क्वार्टर फायनलमध्ये विनेश जायबंदी झाली. सामना सोडून स्ट्रेचरवरून बाहेर पडताना विनेशच्या ऑलिम्पिकच्या स्वप्नाचा चक्काचुर झाला होता.
विनेशच्या करिअरचा सगळ्यांत कठीण काळ होता तो. ती स्वःतच्याच क्षमतांवर संशय घ्यायला लागली होती.
 
'पुन्हा भरारी घेतली'
"लोक म्हणत होते की जर खेळाडू गंभीररीत्या जखमी झाला तर त्याचं करिअर संपलच समजा. मला स्वतःलाही तसं वाटत होतं. तीन वर्ष माझा स्वतःशीच संघर्ष सुरू होता. मला कळत नव्हते मी ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करू शकेन की नाही.
 
रियो ऑलिम्पिकमध्ये जखमी झाल्यानंतर विनेशची सर्जरी झाली. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमनही केलं. काही वेळा यश मिळालं, कधी अपयश पदरी पडलं. 2018 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली.
 
अनेक सामने ती हरलीही. एखादा सामना हारला की लोक तिच्या चुका काढायला लागायचे, खासकरून लांब चालणाऱ्या मॅचमध्ये विनेशचा स्टॅमिना कमी पडतो हे बोलून दाखवायचे.
पण विनेशची मेहनत, नवीच प्रशिक्षक आणि सरावाच्या नव्या तंत्राने विनेश सगळ्यांना चुकीचं ठरवलं. वर्ल्ड चँपियनशिप ज्यात ती नेहमी हरायची, त्यात तिने 2019 साली कांस्य पदक जिंकलं.
 
आज विनेश जगातली आघाडीची कुस्तीपटू आहे.
सराव आणि कुस्तीच्या डावपेचांच्या पलिकडे एक व्यक्ती आहे जो नेहमीच विनेशच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला - सोमवीर राठी.
 
विनेशचा प्रेमविवाह
सोमवीर स्वतःही मल्ल आहेत आणि विनेशला 8 वर्षांपासून ओळखतात. कुस्तीच्या आखाड्यात दोघांचं प्रेमही फुलायला लागलं.
सोमवीरबद्दल विनेश सांगते, "माझ्या करिअरसाठी त्याने आपलं करिअर पणाला लावलं. तो एकटाच आहे जो माझ्या मनातलं मी काही न बोलताही ओळखू शकतो."
2018 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेव्हा विनेश भारतात परतली तेव्हा विमानतळावरच सोमवीरने विनेशला प्रपोज केलं आणि काही दिवसांत त्याचं लग्न झालं. कुस्तीचं वेड दोघांना आहे.
कुस्तीमधून वेळ मिळाला तर विनेशला संगीत ऐकणं आणि सिनेमे पाहाणं आवडतं. आणि तिला वेगवेगळे पदार्थ चाखायला फार आवडतं. "मी फुडी आहे, ती सांगते."
"मरायच्या आधी मी सगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊन पाहाणार आहे. माझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न आहे की मी सगळं जग फिरावं आणि तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाऊन पाहावेत."
विनेश रागावली तर चांगलं-चुंगलं खायला घालून तिचा राग शांत करता येईल हे कळालं, पण तिला राग येतो की नाही?
"अरे! मला राग येतोच. आणि एकदा का माझी सटकली तर मी तोडफोड करायलाही मागेपुढे पाहात नाही," विनेशच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य असतं.
विनेशला लहानपणी तर केस वाढवता आले नाहीत, पण आता ती स्वतःची हौस पूर्ण करतेय.
"एकदा मी कँपमध्ये खूप दिवस राहिले त्यामुळे केस वाढले. घरी आले तर मला पाहाताच काका म्हणाले, बोलवा हेअर ड्रेसरला. मी घरातल्या कपाटात लपून बसले आणि आईने बाहेरून दार लावून घेतलं.
 
विनेशचं सगळ्यांत मोठं स्वप्न कोणतं आहे?
क्षणाचाही विचार न करता विनेश ताडकन उत्तर देते, "खूप कमी लोकांना आयुष्यात दुसऱ्यांदा संधी मिळते. मला दुसरी संधी मिळाली आहे ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची. मी माझं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करीन.
 
Published By- Priya Dixit