रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

नवी मुंबईत शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी

PTI
PTI
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांमधील दोन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने आजपासून तात्काळ खाजगी तसेच पालिका अशा जवळपास १५० शाळांतील विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूबाबतचे भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथील ऍपीजे स्कूल आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.६ येथील शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण कुठून झाली याबाबत माहिती मिळत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने युध्द पातळीवर खाजगी तसेच पालिका शाळेतील सर्वच आजारी असलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी सुरु केली आहे. प्रत्येक विभागातील माता-बाल रुग्णालय तसेच नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पथके शाळेत जाऊन स्क्रिनिंग करीत आहेत.

महापालिकेने स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेल्या दोन शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु नवी मुंबईतील बहुतांशी खाजगी शाळा बंद होत्या. यामुळे पालकवर्गात भितीचे वातावरण होते. याबाबत पालकांनी स्वाईल फ्लूची भिती बाळगू नये असे आवाहन महापालिकेतर्फे देण्यात आले आहे. तर शाळांनी विद्यार्थ्यांची पिकनिक तसेच खेळाचे दौरे या काळात काढू नयेत अशा सूचना पालिकेने शाळांना दिल्या आहेत.