गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

स्वाइन फ्लूवर तुळस गुणकारी?

ND
ND
आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली गेलेली तुळस सध्या धुमाकूळ घालत असलेल्या स्वाइन फ्लूवरही प्रभावी असल्याचा दावा काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी केला आहे. तुळशीमुळे स्वाइन फ्लू दूर रहातो किंवा त्याचा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती बरी होण्यास तुळस मदत करते असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तुळस तापनिरोधक मानली गेली आहे. जगभरातील वैद्यक तज्ज्ञांनीही ही बाब आता मान्य केली आहे. तुळशीमुळे प्रतिकारक्षमताही वाढते. विशेषतः संसर्गजन्य रोगांत तुळस शरीराला ताकद पुरवते त्यामुळे आतल्या यंत्रणेला त्यारोगाविरोधात लढण्याला बळ मिळते. जपानीस एन्सेफलायटिस या रोगातही तुळशी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच स्वाइन फ्लूवरही ती गुणकारी ठरेल, असा दावा डॉ. यु. के. तिवारी या वनौषधींमधील तज्ज्ञ डॉक्टरने केला आहे.

तुळस स्वाइन फ्लूला दूर ठेवते इथपर्यंतच त्याचा गुण मर्यादित नाही. स्वाइन फ्लूग्रस्तांना बरे होण्यासही तुळशीची मदत लक्षणीय आहे. रूग्णाची रोगप्रतिकारक्षमता तुळशीमुळे वाढते आणि तो स्वाइन फ्लूविरोधात लढू शकतो, असा डॉ.तिवारी यांचा दावा आहे. गुजरातमधील आयुर्वेद विद्यापीठातील डॉ. भूपेश पटेल यांनीही तुळशीच्या गुणाला दुजोरा दिला आहे. तुळशीमुळे स्वाइन फ्लू आटोक्यात येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी तुळस थेट पोटात गेली पाहिजे. त्यासाठी रस, किंवा त्याच्या २० ते २५ पाने कुटून केलेली पेस्ट दिवसातून दोन वेळा घेतल्यास स्वाइन फ्लूवर नियंत्रण करता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. तुळशीमुळे रोगप्रतिकारकक्षमता वाढत असल्याने स्वाइन फ्लूला ती आपल्या आसपास फिरकू देत नाही किंवा तो झाला तरी त्याविरोधात लढण्यास शक्ती पुरवते, असा या दोन्ही डॉक्टरांचा निष्कर्ष आहे.