स्वाइन फ्लूवरील लस डिसेंबरपर्यंत बाजारात
कॅडिला फार्मास्युटिकल्स (सीपीएल) इनफ्लूएंझा एच १ एन १ अर्थात स्वाइन फ्लूवर लस बाजारात आणण्याच्या तयारीत असून त्याची वैद्यकिय चाचणी करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही लस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे. स्वाइन फ्लूसह अनेक आजारांवर लस विकसित करण्यासाठी सीपीएल व सीपीएल बायॉलॉजिकल या कंपनीने अमेरिकास्थित नोवावॅक्सबरोबर करार केला आहे. या करारांतर्गत आता या लशीची चाचणी घेण्यासाठी औषध नियामक महासंचलनालयाकडे (डिसीजीआय) अर्ज करण्यात येणआर आहे, असे सीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आय. ए. मोदी यांनी सांगितले. डिसीजीआयकडून आम्हाला परवानगी मिळाल्यास आमच्या सहकारी कंपनीकडून उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात येईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. स्वाइन फ्लूवर लस आणणारी कॅडिला ही पहिलीच कंपनी ठरणार आहे. स्वाइन फ्लूवरच्या या नव्या लशीचा डोस दोन आठवडे द्यावा लागेल. सिप्ला उपलब्ध साधनक्षमतेच्या बळावर महिन्याला दहा लाख डोस तयार करू शकेल. सिप्लाची सहयोगी अमेरिकन कंपनी नोवावॅक्सला साइन फ्लूच्या लशीची वैद्यकिय चाचणी घेण्याची परवानगी अमेरिकेच्या फेडरल ड्रग एडमिनिस्ट्रेशनकडून मिळाली आहे. आम्हालाही ती लवकरच मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. स्वाइन फ्लूसंदर्भात कोणताही अर्ज तातडीने निकालात काढण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याअंतर्गत आम्हाला परवानगी मिळेल, असे मोदी यांनी नमूद केले.