ओबामांची लोकप्रियता टिपेला
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता टिपेला पोहोचली आहे. त्याचवेळी मावळते अध्यक्ष जॉर्ज बुश यांची लोकप्रियता वेगाने घसरणीला लागली आहे. माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात ओबामांची लोकप्रियता 79 टक्के असल्याचे लक्षात आले आहे. बुश यांची लोकप्रियता घसरत 29 टक्क्यांपर्यंत आली आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी ओबामांना देशातील 80 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीच्या विळख्यात अडकलेल्या या देशाला पुनर्वेभव प्राप्त करून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वेक्षणानुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अमेरिकेची स्थिती खूपच वाईट आहे, असे 80 टक्के लोकांना वाटते. पाच वर्षांनंतर स्थिती सुधारेल असे 61 टक्के लोकांना वाटते. अर्थात, पुढील दोन वर्षात फार काही घडेल असे त्यांना वाटत नाही. सीएनएच्या सर्वेक्षणानुसार, ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्याने 68 टक्के लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओबामांचे शपथविधीनंतरचे भाषण छान होईल, असे 85 टक्के लोकांना वाटते. बुश यांच्यावेळी असे वाटणाऱ्यांची संख्या 61 टक्के होती. ओबामांना कारकिर्दीच्या प्रारंभीच संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे. मंदी हे त्यांच्यसमोरील मोठे आव्हान आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन त्यांनी अमेरिकी जनतेला दिले होते. अर्थात, पुढच्या दोन वर्षात फार काही घडेल अशी अपेक्षाही जनतेला नाही. अर्थव्यवस्था, आरोग्य देखभाल पद्धतीत सुधारणा आणि इराकमधील युद्ध संपविण्याचे वचन त्यांनी जनतेला दिले होते.