रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (18:39 IST)

लोकसभा अध्यक्ष सदस्यांचा माइक बंद करू शकतात का? माइकचं नियंत्रण कोणाकडे असतं?

18 व्या लोकसभेचं पहिलंच अधिवेशन हे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील शाब्दिक खडाजंगीमुळे गाजताना दिसत आहे.विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होतच आहे, पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही पक्षपातीपणाचा आरोप केला. ओम बिर्ला यांनीही या आरोपाचं खंडन केलं.
हे आरोप-प्रत्यारोप झाले ते लोकसभेमध्ये सदस्यांना बोलण्यासाठी जो माइक दिला जातो त्यावरून.

नेमकं काय घडलं?
शुक्रवारी (28 जून) सभागृहात काँग्रेस खासदार राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माइक बंद झाला. राहुल यांनी लोकसभा अध्यक्षांना त्यांचा माइक सुरू करण्याची विनंती केली.राहुल गांधी यांनी NEET परीक्षेतील पेपरफुटीवर चर्चेची मागणी केली होती. देशातील विद्यार्थ्यांना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा संदेश देण्यासाठी चर्चेची मागणी राहुल गांधींनी केली.
 
बिर्ला यांनी राहुल यांच्या मागणीला उत्तर देताना म्हटलं की, "आपण सभागृहाच्या नियमांप्रमाणे जाऊ आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावानंतर चर्चा घेण्याची सूचना केली."या दरम्यान राहुल गांधी यांचा माइक बंद झाला आणि त्यांनी अध्यक्षांना तो सुरू करण्याची विनंती केली.
 
काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ वरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. संसदेतील मायक्रोफोन बंद करणं ही तरुणांचा आवाज दाबण्याचा षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, “माझ्याकडे मायक्रोफोन बंद करण्याचं कोणतंही बटण नाही. आधीप्रमाणेच इथेही रचना आहे. मायक्रोफोन बंद करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.”
 
दुसरीकडे राज्यसभेतही याच मुद्द्यावरून सभापती जगदीप धनखड हेही संतापले. धनकड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना म्हणत होते की, ‘तुम्हाला विनंती आहे की कृपा करून...’ त्याचवेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी मधेच काहीतरी बोलले.
 
त्यावर संतापून धनखड यांनी म्हटलं की, इथे माइक बंद होतो का? जेव्हा मी बोलत असतो, तेव्हा कोणाचाच माइक सुरू नसतो. तुम्हाला हे माहीत आहे. तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. हे तुम्हाला माहीत आहे.दरम्यान, याच आरोपांवरून आता लोकसभेत माइकचं नियंत्रण कोणाकडे असतं, सभापती सदस्यांचा माइक बंद करू शकतात का, सभागृहातील रचना काय असते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
कशी असते सभागृहातील रचना?
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रत्येक खासदाराची एक निर्धारित आसन असतं. माइक त्या खासदाराच्या डेस्कशीच जोडलेला असतो.2014 मध्ये लोकसभा सचिवालयाने एक माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक खासदाराला एक माइक आणि स्विच बोर्ड दिलेला असतो. या स्विच बोर्डवर वेगवेगळ्या रंगाची बटणं असतात. जेव्हा खासदाराला बोलायचं असतं तेव्हा ते करड्या (ग्रे) रंगाचं बटण दाबतात. त्यानंतर त्यांच्यासमोरचा माइक activate होतो, आणि लाल बटण सुरू होतं.
 
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक चेंबर असतं. या चेंबरमध्ये साउंड टेक्निशियन बसतात. ते सभागृहाच्या कार्यवाहीची नोंदणी आणि रेकॉर्डिंग करतात. याच चेंबरमध्ये एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतो, त्यावर सगळ्या सभासदांच्या जागांचे नंबर लिहिलेले असतात. तिथूनच मायक्रोफोन सुरू किंवा बंद केले जातात.
 
लोकसभेत या प्रक्रियेचं नियंत्रण लोकसभा सचिवालयाद्वारे केलं जातं आणि राज्यसभेतलं नियंत्रण राज्यसभा सचिवालयाद्वारे केलं जातं.हे सर्व तंत्रज्ञ तज्ज्ञ आणि अनुभवी असतात.
 
अध्यक्ष माइक बंद करू शकतात का?
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज कव्हर करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या मते अध्यक्ष माइक बंद करण्याचे आदेश देऊ शकतात. मात्र ते नियमांनुसार असतात. त्यांच्याकडे थेट माइक बंद करण्यासाठीचं नियंत्रण नसतं.
सभागृहाच्या कामकाजात गोंधळ झाला तर लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती आपला अधिकार वापरतात.त्यावेळी सभागृहातील मायक्रोफोन तंत्रज्ञांकडून बंद केले जातात.
संसदेच्या शून्य प्रहरात प्रत्येक सदस्याला तीन मिनिटांचा वेळ दिलेला असतो. सदस्याची ही वेळ संपली की, त्याचा माइक आपोआप बंद होतो.जेव्हा एखाद्या विधेयकावर वगैरे चर्चा होणार असते तेव्हा प्रत्येक पक्षाला वेळ दिला जातो. अध्यक्ष त्या वेळेनुसारच चालतात आणि प्रत्येक सदस्याला बोलण्यासाठी ठराविक वेळ देत असतात.
 
माइकवरून यापूर्वी झालेले वाद
ओम प्रकाश बिर्ला यांच्यावर माइक बंद करण्याचे आरोप विरोधकांनी पहिल्यांच केलेले नाहीत.
बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळात गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं की, आपण बोलत असताना माइक ऑफ करून आपला अपमान करण्यात आला आहे.“हे माझ्या अधिकारांचं उल्लंघन आहे. माझा अपमान आहे. माझ्या स्वाभिमानाला आव्हान देण्यात आलं आहे. जर हे सभागृह सरकारच्या सुचनांनुसार चालणार असेल तर माझ्या मते ही लोकशाही नाही,” असं त्यांनी म्हटलं.गेल्या वर्षी मार्च महिन्यातही राहुल गांधी यांनी ब्रिटिश संसदेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांचे माइक बंद करण्यावरून टीका केली होती.भाजपने राहुल गांधींनी परदेशात केलेल्या या वक्तव्यावर टीका केली होती.
 
Published By- Priya Dixit