गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2024 (12:31 IST)

SIPमध्ये दरमहा 1 हजार रुपये गुंतवून तुम्ही करोडो कमवू शकता का? एसआयपीबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

200 रुपयांची गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा.. अलीकडे सोशल मीडिया वेबसाईट्सवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला एसआयपीसंबंधीच्या अशाच काही जाहिराती पाहायला मिळतात. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी गुंतवणूक करून असं भरीव उत्पन्न मिळू शकतं असं सांगितलं जातं. पण ही गुंतवणूक योजना काय आहे? यातून खरोखरच पैसे कमावता येतात का? या लेखात आपण या सगळ्याचे फायदे आणि तोटे बघू.
 
एसआयपी म्हणजे काय?
एसआयपी गुंतवणूक योजना (SIP) याला सिस्टीमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात. म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे. याद्वारे, प्रत्येक महिन्याला विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बँक खात्यातून पैसे कापून घेते. वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये हे पैसे गुंतवून कंपनी तुम्हाला परतावा देते.
 
एसआयपीमध्ये दोन प्रकारची गुंतवणूक असते
आर्थिक सल्लागार आणि वॉनक्र्यू या संस्थेत चीफ फायनान्शियल ऑफिसर असणारे सतीश कुमार सांगतात, एसआयपी गुंतवणूक योजनेत दोन प्रकारचे पर्याय असतात. ते सांगतात, "एसआयपीचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो ग्रोथ फंड आणि दुसरा म्हणजे डिव्हिडंड फंड. तुमच्या ग्रोथ फंडातील गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश ठराविक कालावधीसाठी गुंतवून शेवटी फायदा मिळवला जातो. पण डिव्हिडंड फंड गुंतवणुकीत तुम्हाला महिन्यातून एकदा, दर तीन महिन्यांनी एकदा आणि वर्षातून एकदा लाभांश मिळू शकतो."
 
मध्यमवर्गीयांसाठी हे गणित फायद्याचं आहे का?
या एसआयपी गुंतवणुकीचा फायदा फक्त मध्यमवर्गीय कुटुंबांनाच होतो असं अर्थतज्ज्ञ के. राजेश सांगतात. याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "जेव्हा शेअर बाजाराचा विचार केला जातो तेव्हा चांगल्या कंपनीचा शेअर 700 रुपयांपेक्षा जास्त असतो. तुमच्याकडे किमान 2000 रुपये असायला हवेत तेव्हा तुम्ही शेअर बाजारात प्रवेश करू शकता. त्या पैशातून तुम्ही फक्त 5 शेअर्स खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी कमी रकमेतच गुंतवणूक करू शकता. आणि जर यातील काही शेअर्स पडले तर तेवढंच नुकसान देखील होतं." "परंतु म्युच्युअल फंडातील किमान गुंतवणूक 500 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली कंपनी तुमच्या गुंतवणुकीच्या पैशातून अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेते. इथे एखदी कंपनी कोसळली आणि दुसरी कंपनी फायद्यात असेल तरी तुमच्या शेअरचं मूल्य वाढतच जातं." त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्याला किमान उत्पन्नाची हमी मिळण्यास मदत होते आणि तोटा होण्याचा धोका कमी होतो, असं राजेश सांगतात.
 
बँक खातं आणि एसआयपी गुंतवणूक यात काय फरक आहे?
बरेच लोक त्यांचे पैसे बचतीसाठी आणि वाढवण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे ठेवतात. पण ही एसआयपी गुंतवणूक त्यापेक्षा वेगळी असल्याचं राजेश सांगतात. "दोन्हींमधील फरक म्हणजे गुंतवणुकीची जोखीम आणि परतावा. जिथे जोखीम कमी असते तिथे परतावा कमी असतो. जिथे जोखीम जास्त असते तिथे परतावा जास्त असतो." उदाहरणार्थ, कोणत्याही बँकिंग संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या बचत खात्यात पैसे ठेवणं जोखीममुक्त असतं. त्यातून मिळणारं उत्पन्न केवळ 7-8% इतकंच असतं. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन योजनेत एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं धोकादायक आहे, पण शेवटी तुम्हाला 15 ते 18 % परतावा मिळण्याची शक्यता असते असं राजेश सांगतात. ते पुढे म्हणाले, "बँकेने 7% परतावा दिला तर वार्षिक महागाई 6% असते. आणि आपलं बहुतेक उत्पन्न त्यातच संपतं. पण बाजारातील म्युच्युअल फंडाचा परतावा 15-18% असल्याने महागाई वजा करूनही आपल्याला त्याचा फायदा मिळतो."
 
म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये काय फरक आहे?
बरेच लोक म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये गोंधळतात. आम्ही राजेश यांना या दोन्हीमधील फरकाबाबत विचारलं. यावर ते म्हणाले, "म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करता. तर एसआयपी म्हणजे त्यात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे." त्यांच्या मते, "तुम्ही म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. एकाच वेळी जास्त पैसे भरून गुंतवणूक करतात त्याला Lumpsum म्हणतात. तर एसआयपी हा दुसरा प्रकार आहे ज्यात तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवता. दोघांमध्ये तरलतेची जोखीम आहे. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी तो धोका कमी असतो."
 
नवीन गुंतवणूकदारांनी काय करावं?
अनेकदा गुंतवणूक उद्योगात नवीन असणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि यातून चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असं राजेश सांगतात. त्यांच्या मते, "गुंतवणूकदार किती धोका पत्करण्यास तयार आहे हे प्रथम जाणून घेतलं पाहिजे. मग, त्याने किती पैसे गुंतवायचे हे ठरवायचं." "त्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या बँकेत डिमॅट अकाउंट उघडू शकता. पैसे एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये गुंतवायचे हे ठरवायचं." झटपट श्रीमंत होण्याच्या कल्पनेने गुंतवणूक करत असाल तर सावध रहा असं राजेश सांगतात.
 
नियोजन करून गुंतवणूक करा
एसआयपी सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या भविष्यातील योजना, गुंतवणूक योजना आणि निवृत्ती योजना यांचा विचार केला पाहिजे, असं आर्थिक सल्लागार सतीश कुमार म्हणतात. ते सांगतात, "एखाद्याच्या वयानुसार कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची हे ठरवता येतं." उदाहरणार्थ, एखादा तरुण इक्विटी फंडमध्ये 100% गुंतवणूक करू शकतो. तेच एखादा व्यक्ती मध्यमवयीन असेल तर त्याने हायब्रिड फंडात गुंतवणूक करावी. याशिवाय, ज्येष्ठ व्यक्तींनी कोणतीही मोठी जोखीम न पत्करता डेट फंड आणि गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करावी.
 
पैसे काढता येतात का?
तुम्ही बँक खात्यातून कधीही पैसे काढू शकता. पण एसआयपीमधून तुम्हाला निम्मे तरी पैसे काढता येतात का याविषयी आम्ही राजेश यांना विचारलं. राजेश सांगतात, "आयकर भरणाऱ्यांसाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. यात तुम्ही कधीही पैसे टाकू शकता आणि कही गुंतवणूक काढू शकता. जर तुम्हाला अचानक गुंतवणूक करणं थांबवायचं असेल तर तुम्ही थांबवू शकता. जर तुम्हाला काही काळासाठी पैसे भरणं थांबवायचं असेल तर तसंही करता येतं."
 
कोणत्या प्रकारचे फंड उपलब्ध आहेत?
भारतात हजारो वित्तीय संस्था आहेत. त्याच वेळी, शंभरहून कमी असेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत ज्यांना एएमसी म्हणता येईल. यापैकी प्रत्येक कंपनीकडे शंभरहून अधिक फंड आहेत. यावर राजेश म्हणाले की, इक्विटी फंड हे असे असतात जे फक्त शेअर्समध्ये गुंतवले जातात. डेट फंड हे बाँड्स आणि डिपॉझिट्समध्ये गुंतवले जातात. तर हायब्रीड फंडमध्ये वरील सर्व गोष्टींचा समावेश असतो. लिक्विड फंड म्हणजे अल्प-मुदतीच्या मनी मार्केटमधील गुंतवणूक आणि बँकांना कर्ज देणे. जर तुम्ही फक्त आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर तो आयटी फंड असतो. जर तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर तो इन्फ्रास्ट्रक्चर फंड असतो. असे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड असल्याचे ते सांगतात.
 
कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी?
आजकाल सर्वच लोकांना झटपट पैसे कमवायचे असतात. लोकांच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेक घोटाळे सुरू झालेत. या क्षेत्रातही घोटाळे होतात का? कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी? असं आम्ही राजेश यांना विचारलं. त्यांनी उत्तर दिलं की, "इथे गुंतवणूक कंपन्यांचा विचार केला तर त्या कठोर नियमांनुसार काम करतात. या कंपन्या रिझर्व्ह बँक, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि सेबीद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे अशा कंपन्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. पण, तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक करणार आहात याची काळजी घ्यावी लागेल."
 
कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं फायद्याचं?
नवीन गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी याबाबत संभ्रमात असतात. कारण ज्यांनी आधीच गुंतवणूक केलेली असते पण अपेक्षित परतावा मिळत नाही अशांचे अनुभव ऐकून तणाव येतो. यावर उपाय म्हणून काही म्युच्युअल फंड पर्याय आहेत जे नेहमीच सुरक्षित आणि कमी जोखमीचे असतात. साधारणपणे, आयटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे हंगामी फंड असतात. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच चढ-उतार होत असतात असं राजेश सांगतात."परंतु, इंडेक्स फंडामध्ये वरील सर्व प्रकारच्या फंडांचा समावेश होतो. सर्व कंपन्यांकडे हा इंडेक्स फंड असतो. निफ्टी आणि सेन्सेक्सच्या मागील इतिहासानुसार, त्यांनी सातत्याने 16% परतावा दिला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुमची गुंतवणूक कंपनी कोणताही स्टॉक खरेदी करते, मग तो निफ्टी असो किंवा सेन्सेक्स. तुमच्या शेअर्सचे मूल्य त्यामधील कंपन्यांद्वारे ठरते."
 
फायदे आणि तोटे काय आहेत?
कोणत्याही गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे असतात. अशाच प्रकारे एसआयपीचेही फायदे आणि तोटे आहेत. राजेश सांगतात, "असे रिटर्न 3 ते 5 वर्षांच्या अल्प कालावधीत मिळतील याची शाश्वती नाही. तुम्ही 10 वर्षांहून अधिक काळ या योजनेद्वारे गुंतवणूक करत राहिल्यास, तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका कमी होतो." तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या 30% पेक्षा जास्त नुकसान होत नाही असं त्यांनी पुढे सांगितलं. त्याच वेळी सतीशकुमार म्हणतात की, "एसआयपी गुंतवणुकीच्या बाबतीत सांगायचं तर पैशांचं नुकसान होऊ नये यासाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना धोरण आखण्यासाठी कंपनीत तिचे फंड व्यवस्थापक आणि एक समिती असते. परंतु शेअर बाजारात आपण स्वतः एखादा शेअर विकत घेतो आणि त्याचं मूल्य कमी झालं तर आपलं नुकसान होतं."
 
तुम्ही 1000 रुपये गुंतवून करोडो कमवू शकता का?
बऱ्याच गुंतवणूकदारांना कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवायचा असतो. अनेक फसवणूक करणारे लोक अशा लोकांचा फायदा घेतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. सतीश कुमार ठामपणे सांगतात की, एसआयपीतून तुम्ही असे कमी काळात करोडो कमावू शकत नाही. त्यासाठी गुंतवणुकीचे इतरही पर्याय आहेत. परंतु त्यांनी इथे असंही नमूद केलंय की, एसआयपीच्या गुंतवणुकीतून जोखीम हळूहळू कमी होते आणि स्थिर परतावा मिळतो.
 
एसआयपी कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
एसआयपी गुंतवणूकदार त्याच्या भविष्यातील परताव्याचा अंदाज बांधू शकत नसेल तर एसआयपी कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून काही प्रमाणात या परताव्याचा अंदाज लावता येतो. एसआयपी कॅल्क्युलेटर आपल्या सामान्य कॅल्क्युलेटर प्रमाणेच काम करतं. तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला किती परतावा मिळेल याचे आकडे तुम्हाला मिळतात. यासाठी काही सूत्रं आहेत. याशिवाय तुम्ही थेट गुगलवर जाऊन उत्पन्नाचे आकडे मिळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमची गुंतवणूक सुव्यवस्थित करू शकता.
 
एनएव्ही म्हणजे काय?
प्रत्येक शेअरची किंमत असते. म्युच्युअल फंड मध्ये फक्त युनिट्स असतात. अशा प्रकारे, प्रत्येक युनिटची किंमत ही नेट असेट वर ठरते. यातून आपल्याला त्या फंडचा अंदाज येतो. म्युच्युअल फंडाची खरेदी असो वा विक्री, त्यांचा व्यवहार युनिट मध्येच होतो.
 
Published By- Dhanashri Naik