मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (23:28 IST)

हातावर नारळ ठेवून जमिनीतलं पाणी शोधता येतं का? वैज्ञानिक सत्य काय आहे?

Nariyal
social media
चंद्रावर पाणी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाने पुरेशी प्रगती केली असली, तरी तळहातावर नारळ किंवा पाण्याचा ग्लास घेऊन भूगर्भात पाणी शोधण्याच्या पारंपरिक, अवैज्ञानिक पद्धती आजही ग्रामीण भागात प्रचलित आहेत.
 
केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या दुर्गम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतात पाणी शोधण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांना बोलावण्याइतका वेळ किंवा पैसा नाही.
 
त्यामुळेच अनेक शेतकरी त्यांच्या शेतात बोअरवेल बसवण्यासाठी फील्ड सर्व्हेअर आणतात. शेतातले पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी ते एखाद्या वस्तूचा वापर करतात आणि त्या वस्तूच्या मदतीने जिथे पाणी असल्याचं वाटतं, तिथे खड्डा खणायला सांगतात.
 
पाण्याचा शोध घेण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात, त्यामध्ये नारळ, इंग्रजी ‘Y’ अक्षराप्रमाणे दिसणारी कडुनिंबाची काडी, पाण्याने भरलेली दोन भांडी अशा गोष्टींचा समावेश आहे.
 
पण या पद्धती खरंच वैज्ञानिक आहेत का? भूगर्भशास्त्रज्ञ त्याबद्दल काय म्हणतात? या पद्धतीवर विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञ काय म्हणतात?
 
बीबीसी तेलुगूने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पद्धती किती विश्वासार्ह आहेत, याचा पडताळा घेतला
 
जमिनीत पाण्याचे स्रोत कसे शोधतात?
सुरेंदर रेड्डी यांनी त्यांना माहीत असलेल्या काही पद्धतींद्वारे जमिनीतील पाण्याच्या प्रवाहांचा शोध घेतला होता. त्यांनी चित्तूर आणि तिरुपती जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना विहीरी खोदायला मदत केली आहे.
 
ते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्याचे आहेत. ते शेतात पाणी शोधण्यासाठी नारळ, ‘वाय’ आकाराची कडुनिंबाची फांदी किंवा पाण्याचा तांब्या ठेवतात.
 
ते नारळ तळहातावर ठेवतात. शेंडीकडचा भाग हा बोटांच्या दिशेला असतो. अशापद्धतीने नारळ हातावर ठेवून ते शेतात फिरतात. एखाद्या जागी नारळ सरळ झाला तर तिथे जमिनीत पाणी आहे, असा त्यांचा अंदाज असतो.
 
ते कधीकधी Y-आकाराची कडुनिंबाची काठी हातावर ठेवून फिरतात. जिथे पाणी आहे, तिथे काठी सरळ राहते.
 
पाण्याचा तांब्या वापरण्याच्या पद्धतीबद्दलही सुरेंदर सांगतात.
 
हातावर पाण्याचा तांब्या घेऊन फिरताना ज्या ठिकाणी तांब्यातलं पाणी सांडतं तिथे विहीर खोदता येते, असं सुरेंदर यांचं म्हणणं आहे.
 
“बोअर कुठे खणता येईल, याबद्दल माझे काही आडाखे आहेत. मी या पद्धती स्वतःच शिकलो आहे. भूगर्भातील पाण्याचा स्रोत हा एका ऊर्जेतून शोधता येतो. नारळ किती सरळ होतो, यावरून किती फूट खणल्यावर पाणी लागेल हेही सांगता येत,” असं सुरेंदर रेड्डी सांगतात.
 
“मी 99 टक्के वेळेस अचूक पाणी शोधलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी हे काम करत आहे. माझ्याइतक्या अचूकपणे भूगर्भशास्त्रज्ञही हे सांगू शकत नाहीत. म्हणूनच शेतकरी त्यांच्यावर माझ्याइतका विश्वास ठेवत नाही,” सुरेंदर रेड्डी सांगतात.
 
“जर जमिनीत पाणी असेल, तर नारळ किंवा फांदी सरळ उभे राहतात. जिथे पाण्याचे दोन-तीन प्रवाह असतील, तिथे नारळ किंवा फांदी फिरते,” असंही ते सांगतात.
 
‘या सगळ्या अवैज्ञानिक पद्धती’
तिरुपती इथले भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूजल सल्लागार सुब्बारेड्डी सांगतात की, नारळ, कडुलिंबाच्या फांद्या, पाण्याची भांडी यांचा वापर करून पाणी शोधण्याच्या पद्धती वैज्ञानिक नाहीत.
 
सुब्बारेड्डी असंही सांगतात की, काही लोकांच्या हातावरच पाण्याचीही एक रेषा असते आणि देव त्यांच्या स्वप्नात येऊन पाणी कुठे आहे हे सांगतो असाही अनेकांचा दावा असतो.
 
मात्र या गोष्टीत काही तथ्य नाहीये, केवळ वैज्ञानिक पद्धतींनी पाण्याचा शोध अचूकपणे घेता येतो, असं सुब्बारेड्डी सांगतात.
 
“जेव्हा जमिनीत पाण्याचे स्रोत भरपूर असतात, तेव्हा कोणत्याही पद्धतीने पाणी यादृच्छिकपणे शोधले जाऊ शकते. अशावेळी पद्धत अशास्त्रीय असली, तरी पाणी सापडतंच. पण जिथे बोअरवेल हजार फूटापर्यंत खोदल्या जातात, तिथे पाण्याचे स्रोत कमी असतात. अशाठिकाणी पाणी सापडण्याच्याही शक्यता कमी होतात.
 
त्यामुळेच अशा भागात शास्त्रीय पद्धतीने पाणी शोधण्याचा प्रयत्न केला तरी पाणी येत नाही. त्यामुळेच इथे पाणी खोदणं हा पैशाचा अपव्यय आहे,” असं सुब्बारेड्डी म्हणतात.
 
वैज्ञानिक पद्धती किती अचूक आहेत?
सुब्बारेड्डी म्हणतात की, भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती उपयुक्त आहेत. यासाठी रेझिस्टिव्हिटी मीटर म्हणजेच विद्युत प्रतिरोधक सर्वेक्षण ही जगभरात वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक वैज्ञानिक पद्धत आहे.
 
ते पुढे सांगतात की, "आम्ही रेझिस्टिव्हिटी मीटरचा वापर करून पृथ्वीच्या थरांतील विद्युतीय प्रतिकारशक्तीचा अंदाज लावतो. यावर आधारित आलेख काढला जातो. परिणाम सकारात्मक आहेत की नाही हे तपासून भूगर्भातील पाणी शोधून काढतो."
 
"भूगर्भातील पाणी किती खोलवर आहे हे ठरवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो. या पद्धतींमध्ये पृथ्वीचा पहिला थर किती खोल आहे आणि दुसरा थर किती खोल आहे हे बघतात. त्यानंतर कठीण खडक जिथे आहे तिथे न खोदता शास्त्रोक्त पद्धतीने खोदण्याचा निर्णय घेतला जातो."
 
" पेंड्युलम पद्धत आणि एल रॉड पद्धत या पूर्णपणे वैज्ञानिक पद्धती नाहीत. मात्र या दोन पद्धतींद्वारे पाण्याच्या प्रवाहाची दिशा ओळखता येते, परंतु पाणी किती खोल आहे हे समजू शकत नाही," असंही सुब्बारेड्डी म्हणाले.
 
जैविक निर्देशक
सुब्बारेड्डी म्हणतात की, भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहांच्या खुणा शोधण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून केले जात आहेत.
 
जमिनींच्या भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांनुसार पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज बांधता येतो.
 
ते पुढे सांगतात की, "हिंदू मान्यतेनुसार वराहमिहिराने भूगर्भातील पाण्याचे स्रोत कसे शोधायचे यावर एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात जैविक निर्देशकांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये कदंब, अर्जुन, वेत, हस्तीकर्ण, करंज, बेहडा यांसारखी झाडं असतील तिथे पाणी असतं.”
 
भूगर्भशास्त्रज्ञ अशी चिन्हं शोधतात आणि या भागात पाण्याची शक्यता जास्त असते. असं म्हणतात की, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साठून राहतं तिथे जमिनीत पाण्याचा प्रवाह असतो. हे काही प्रमाणात सिद्ध झालंय. भूगर्भशास्त्रज्ञ या जैविक निर्देशकांचा देखील विचार करतात."
 
शेतकरी या दोन्ही पद्धतींचा अवलंब करत आहेत
बीबीसीने तिरुपती येथील शेतकरी मुनीकृष्ण रेड्डी यांच्याशी संवाद साधला.
 
ते सांगतात की, शेतकरी पाणी कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी दोन-तीन माणसांना बोलावून मगच बोअरवेल खोदतात.
 
ते सांगतात की, नारळ फिरवून पाणी शोधणाऱ्यापासून ते भूगर्भशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांकडून जागेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सहमती झाल्यावरच खोदकामाला सुरुवात होते.
 
मुनीकृष्ण रेड्डी सांगतात की, "सुरुवातीला आम्ही एकाच ठिकाणी 9 वेळा खोदकाम केलं. त्यातल्या 8 ठिकाणी तर पाणीच लागलं नाही. आमचे पैसे गेले. एका विहिरीला फक्त एक इंचभर पाणी लागलं. काही लोकांनी नारळाचे प्रयोग केले तर काही लोकांनी कडुलिंबाचे प्रयोग केले. अनेक बोअरवेल खोदून काही उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही ठरवलं की जिथे सर्वजण सहमत असतील त्या ठिकाणीच खोदकाम करायचं."
 
त्यांचं म्हणणं आहे की, अवैज्ञानिक पद्धती असो वा भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेले दावे दोन्ही फोल ठरले होते.
 
"तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर त्या 10 एकरात पाणी शोधणं कठीण आहे. त्यामुळेच सुरेंदर रेड्डी सारख्या कुणाला फोन केला तर ते सहज येऊन पाण्याचा प्रवाह शोधतात. त्यानंतर भूवैज्ञानिकांना बोलवून त्या जागा दाखवायच्या. जर त्यांनीही सांगितलं की तिथे पाणी आहे तरच बोअरवेल खोदायची," असं मुनीकृष्ण रेड्डी सांगतात.
 
कडुलिंबाची झाडे आणि वैज्ञानिक पद्धत
सुब्बारेड्डी सांगतात की. कधीकधी कडुलिंबाची झाडे देखील पाण्याच्या साठ्यांची जैविक निर्देशक मानली जातात.
 
"जर कडुलिंबाची झाडं निरोगीपणे वाढत असतील आणि त्यांच्या फांद्या आणि पाने एका बाजूला वाकलेली असतील तर जवळच कुठेतरी पाणी आहे असं मानलं जातं. अशा ठिकाणी उपकरणे कुठे बसवली जातात हेही महत्त्वाचे आहे. हे त्या क्षेत्रातील भूवैज्ञानिकांच्या ज्ञानावर आणि अनुभवावर अवलंबून असते," असं ते सांगतात.
 
ते सांगतात की, कधीकधी खडक अडचणीचे ठरू शकतात आणि अशावेळी केवळ भूवैज्ञानिकच पाण्याचे स्रोत ओळखू शकतात.
 
1910 पासून भूजल सर्वेक्षण तंत्रज्ञान विकसित होत आहे.
 
तिरुपती एस व्ही विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश म्हणाले की, वैज्ञानिक पद्धतींवर 100% विश्वास ठेवला जाऊ शकतो.
 
ते सांगतात की, "हे शास्त्रोक्त पद्धतीने केले तर यशाचा दर चांगला असेल. भूगर्भातील पाण्याचा प्रवाह शोधण्यासाठी भूभौतिकीय पद्धत, चुंबकीय पद्धत, प्रतिरोधक पद्धत इत्यादींचा वापर बहुतेकवेळा केला जातो."
 




Published By- Priya Dixit