शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (22:12 IST)

चंद्रयान-3 : प्रज्ञानच्या मार्गात आलं विवर, खड्ड्यात पडता पडता कसं बचावलं रोव्हर?

चंद्रयान-3 मोहिमेत भारताला आपलं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यश आलं असलं, तरी खरं काम त्यानंतर सुरू झालं. वैज्ञानिक प्रयोगांचा हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे.
 
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दररोज तिथे माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवत आहेत, ज्याचं विश्लेषण इस्रोचे संशोधक करत आहेत.
 
त्यातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचं चित्र उलगडेल अशी आशा वैज्ञानिकांना वाटते आहे, तसंच काही नवे प्रश्नही निर्माण होऊ शकतात.
 
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशिवाय चंद्रयान-3 चं प्रपल्शन मोड्यूलनंही निरीक्षणं नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
 
आतापर्यंत कोणती माहिती आणि निरीक्षणं नोंदवली गेली आहेत, चंद्रावर विक्रम आणि प्रज्ञान काय करत आहेत, जाणून घेऊया.
 
प्रज्ञान रोव्हर थोडक्यात बचावला!
27 ऑगस्ट 2023 रोजी प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात तीन मीटर अंतरावर एक विवर असल्याचं दिसून आलं. या विवराचा व्यास साधारण 4 मीटर होता.
 
त्यानंतर रोव्हरला माघारी फिरण्याची आज्ञा देण्यात आली. आता तो नव्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे, अशी माहिती इस्रोनं दिली आहे.
इथे डावीकडच्या फोटोत प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात आलेलं विवर दिसत असून, प्रज्ञान मागे फिरल्यावर उमटलेले चाकांचे ठसे उजवीकडे दिसत आहेत.
 
चंद्रावर सूर्यास्त होण्यापूर्वी तिथल्या पृष्ठभागाच्या जास्तीत जास्त भागात प्रवास करण्याचं काम प्रज्ञानला
 
पार पाडायचं आहे.
 
विक्रम लॅंडरने नोंदवले पहिले निरीक्षण
चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर तापमानाविषयी पहिलं वैज्ञानिक निरीक्षण नोंदवलं.
 
27 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोनं त्याविषयी माहिती दिली.
 
विक्रम लॅंडरवरील ‘चंद्राज सर्फेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट’ अर्थात ChaSTE (चेस्ट) या उपकरणाने इथल्या मातीचं तापमान मोजलं. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 सेमी वर पोहोचून तापमान नोंदवण्याची क्षमता या उपकरणात आहे.
 
ChaSTE नं पाठवेलल्या माहितीनासर चंद्राच्या मातीत 1 सेंटीमीटर खाली तापमान 50 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असून मातीमध्ये केवळ 8 सेंटीमीटर खाली तापमान -10 अंश सेल्सियस आहे.
 
म्हणजे केवळ 8 सेंटीमीटरमध्येच तापमानात साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त फरक दिसून येतो आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातले हे अशा प्रकारचे पहिलेच निरीक्षण आहे.
 
इस्रोचे वैज्ञानिक बीएचएम दारुकेशा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, “पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दोन-तीन सेंटीमीटरवर गेलं, तर तापमानात जेमतेम दोन तीन अंशांचा फरक पडतो. पण चंद्रावर हा फरक 50 अंशांपेक्षा जास्त आहे. हे खूप लक्षणीय आहे.”
 
पुढच्या दहा दिवसांत हे उपकरण तापमानात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवेल.
 
प्रज्ञान रोव्हरचा शिवशक्ती पॉइंटवर संचार
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला.
 
त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावरच्या ‘शिवशक्ती’ पॉइंटवर संचार करत असल्याचा व्हिडियो इस्रोनं प्रसारीत केला आणि चंद्रयान-3 मोहिमेचं दुसरं उद्दीष्टं पूर्ण झाल्याचं जाहीर केलं.
 
चंद्रयान-3 मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, रोव्हर फिरवणं आणि वैज्ञानिक प्रयोगांची उद्दिष्टे इस्रोनं समोर ठेवली आहेत.
 
पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रह किंवा उपग्रहाच्या पृष्ठभागावर असा रोव्हर फिरवण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ आहे. तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात नियंत्रित संचार करणारं हे पहिलंच यान ठरलं आहे.
 
चंद्रावरचा पहिला फोटो
चंद्रयान-3 चा विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरला, त्यानंतर लँडिंग इमेजर कॅमेऱ्यानं हा फोटो टिपला.
 
यात चंद्रयान-3 ची लँडिंग साईट म्हणजे विक्रम जिथे उतरला ती जागा दिसते, तसंच विक्रमचा एक पाय आणि पायाची सावलीही दिसते आहे.
चंद्राचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश तसा खडबडीत आणि विवरांनी भरलेला आहे. पण विक्रम लँडरनं उतरण्यासाठी तुलनेनं सपाट जागा निवडल्याचं दिसतं.
 
चंद्रावर सुरक्षितपणे लँडिंग करण्याचं चंद्रयान-3 मोहिमेचं पहिलं उद्दीष्ट पूर्ण झाल्याचं हा फोटो दर्शवतो.
 
प्रपल्शन मोड्यूलचाही संशोधनात वाटा
चंद्रयान-3 चा विक्रम लँडर प्रपल्शन मोड्यूलपासून 17 ऑगस्टला वेगळा झाला.
 
पण प्रपल्शन मोड्यूल पुढचे काही महिने किंवा कदाचित काही वर्ष चंद्राभोवती कक्षेत फिरत राहणार आहे.
 
हे यानही महत्त्वाची माहिती गोळा करतंय. या यानावर स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ म्हणजेच SHAPE हे उपकरण बसवण्यात आलं आहे.
 
हे SHAPE उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवेल. त्याची तुलना सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या अशाच प्रकारे घेतलेल्या निरीक्षणांशी करता येईल.
 
त्यातून पृथ्वीसारख्या जीवन असलेल्या ग्रहांचा शोध घेण्यात मदत होऊ शकते.
 



Published By- Priya Dixit