गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (14:02 IST)

'आयटी'त काम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक आहे का? काय आहेत कारणं

heart attack women
आयटी मध्ये नोकरी असली की पाच आकडी पगार आणि एसी रूममध्ये काम, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.पण कामाचा प्रचंड ताण, वेळेवर जेवण न करणं, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणं यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
 
हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन) येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की, आयटी कर्मचारी चयापचयासंबंधी विकारांनी ग्रस्त आहेत.
 
तसेच या समस्यांमुळे भविष्यात ते असंसर्गजन्य रोगाला (एनसीडी) बळी पडण्याची शक्यता असल्याचंही दिसून आलंय.
 
यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका असल्याचं आढळून आलं आहे.
 
अभ्यास काय सांगतो?
हैदराबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते.
 
हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेशी (आयसीएमआर) संलग्न आहे.
 
एनआयएनने अलीकडेच आयटी कर्मचार्‍यांची जीवनशैली आणि आरोग्यासंबंधी अभ्यास केला.
 
एनआयएनच्या संचालिका आर. हेमलता यांनी याबाबत सांगितलं की, 'देशाच्या अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्र खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.'
 
मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि जीवनशैली संबंधी चिंता वाढल्या आहेत.
 
जगभरात यावर जो काही अभ्यास झाला आहे त्यातून असं दिसून आलंय की आयटी कर्मचार्‍यांची कामाची पद्धत, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कामाचा ताण यांचा चयापचय क्रियांवर परिणाम होतो.
 
"त्यामुळे यासंबंधी आणखी काही माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने एनआयएनच्या वतीने यावर अभ्यास केला जातोय." असं त्या म्हणाल्या.
 
सर्वेक्षणात काय आढळून आलं?
या सर्वेक्षणासाठी हैदराबादमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या 183 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली..
 
शास्त्रज्ञांच्या पथकाने त्यांच्या विविध गोष्टी विचारात घेतल्या.
 
जसं की त्यांचं वजन, उंची आणि कंबरेचा घेर मोजला.
 
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आणि त्यांच्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले.
 
आयटी कर्मचार्‍यांवरील कामाचा दबाव जाणून घेतला.
 
या अभ्यासात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला 359 कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती.
 
त्यानंतर 183 लोकांची त्यांच्या वयानुसार निवड करण्यात आली.
 
एनआयएनच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की त्यापैकी 154 रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.
 
शास्त्रज्ञांच्या या पथकात गवरावरपू सुब्बाराव, परमिता बॅनर्जी, जी. भानुप्रकाश रेड्डी, हृषिकेश पांडा, किरण कुमार अंगडी आणि तिरुपती रेड्डी यांचा समावेश होता.
 
त्यांचे संशोधन परिणाम न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत
 
कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्षे
एनआयएनने त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून सरासरी 30 वर्षे वय असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांची निवड केली.
 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे वय 26 ते 35 वर्षे दरम्यान आहे.
 
सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून आयटी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला आणि आरोग्याच्या समस्या आणि पचनसंस्थेशी संबंधित आजारांचा अभ्यास करण्यात आला.
 
अभ्यासात काय आढळलं...
एनआयएन अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
 
46 टक्के कर्मचारी हे तीन किंवा त्यापेक्षा अधिक चयापचय जोखीम घटकांनी ग्रस्त असल्याचं अभ्यासात आढळलं.
 
एनआयएन शास्त्रज्ञ आणि प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक गवरावरपू सुब्बाराव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या कर्मचाऱ्यांमध्ये लिपोप्रोटीन (एचडीएल) पातळी आणि कंबरेचा घेर जास्त असल्याचं दिसून आलं.
 
कर्मचाऱ्यांची कामाची वेळ देखील महत्त्वाची आहे.
 
व्यायामाचा अभाव आणि दीर्घकाळ बसून राहाणे, यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो.
 
आयटी कर्मचारी रोज 8 तासांपेक्षा जास्त वेळ बैठं काम करतात.
 
फक्त 22 टक्के कर्मचारी दर आठवड्याला किमान 150 मिनिटांचा व्यायाम करतात.
 
व्यायाम न करण्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि हृदयविकाराची शक्यता वाढते, असं सुब्बाराव यांनी सांगितलं.
 
मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच चयापचयाशी संबंधित जोखमीचे घटक काय आहेत?
मेटाबॉलिक सिंड्रोम तीन किंवा पाच घटकांमुळे होऊ शकतो.
 
सुब्बाराव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आयसीएमआरने या संदर्भात काही नियम लागू सांगितले आहेत.
 
पुरुषांमध्ये कंबरेचा घेर 90 सें.मी. किंवा त्यापेक्षा कमी असावा.
 
महिलांमध्ये हा घेर 80 सें.मी. किंवा त्यापेक्षा कमी असावा.
 
ट्रायग्लिसराइड्सची पातळी 150 एमजी/ डीएल किंवा त्याहून कमी असावी.
 
पुरुषांमध्ये लिपोप्रोटीन पातळी 40 एमजी/ डीएल पेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये 50 एमजी/ डीएल पेक्षा कमी असावी.
 
रक्तदाब 130/85 असावा
एनआयएनचे आणखी एक शास्त्रज्ञ भानुप्रकाश रेड्डी म्हणाले की, हे घटक बदलल्यास चयापचयाशी संबंधित आजार होतात.
 
मियापूर येथील आयटी कर्मचारी देविनेनी गौतमी यांनी बीबीसीशी बोलताना आयटी क्षेत्रात काम करताना येणाऱ्या समस्याबद्दल सांगितलं.
 
त्या सांगतात, लक्ष्य (टार्गेट) गाठण्यासाठी इथे प्रचंड दबाव असतो.
 
त्यामुळे जेवणावर अजिबात लक्ष नसतं, काहीतरी खाऊन कामाला सुरुवात करावी लागते.
 
बीपीओमध्ये काम करणाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करावं लागतं.
 
त्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होते.
 
त्यामुळे पोटात जळजळ, अपचन अशा समस्यांना सामोर जावं लागतं.
 
अनेक आयटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
 
आयटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या...
एनआयएनच्या अभ्यासात आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत.
 
यामध्ये 44.02 टक्के लोकांचं वजन जास्त आहे.
तर 16.85 टक्के लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.
3.89 टक्के कर्मचाऱ्यांना मधुमेह आहे.
64.93 टक्के लोकांमध्ये हायपर डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल)- सी ची पातळी कमी असल्याचं आढळून आलंय.
54.54 टक्के लोकांमध्ये कंबरेचा घेर जास्त आहे.
 
एनआयएन शास्त्रज्ञ सुब्बाराव यांनी बीबीसीशी या विषयावर संवाद साधला.
 
त्यांनी सांगितलं, "आम्ही आमच्या अभ्यासात वय हा महत्त्वाचा घटक मानला आहे."
 
30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
 
मात्र 30 वर्षांखालील कर्मचार्‍यांमध्येही हे जोखीम वाढवणारे घटक अधिक दिसले.
 
त्यांच्या रोजच्या आहारात बाहेरचं खाणं जास्त तर फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश कमी, असे प्रकार जास्त होत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
 
काहीवेळा ते कामाच्या दबावामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जेवण करणं टाळतात.
 
या सर्वांचा आयटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
 
30 वर्षांवरील वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव जास्त असतो.
 
या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम चयापचय क्रियेवर होत आहे.
 
महिला कर्मचाऱ्यांमध्ये आणखी एक गोष्ट आढलून आल्याचं एनआयएनच्या संचालिका डॉ. हेमलता यांनी सांगितलं.
 
त्या सांगतात की, "पोषण, शारीरिक हालचाली आणि तणाव यांचा 26 ते 35 वयोगटातील महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम होतो."
 
त्यांना मासिक पाळी वेळेवर येत नाही.
 
त्यांना मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारही सुरू झाल्याचं डॉ. हेमलता यांनी सांगितलं.
 
आता यावर उपाय काय?
शास्त्रज्ञ सुब्बाराव यांनी समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.
 
आयटी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत बदल व्हायला हवा.
कामाच्या ठिकाणी सकस आहार मिळायला हवा.
शारीरिक हालचाली (व्यायाम) केल्या पाहिजेत.
बाहेरचं खाणं (जंक फूड) शक्यतो टाळा.
बराच वेळ एका ठिकाणी न बसता मध्येच उठून एखादा ब्रेक घेऊन पाय मोकळे करून या.
 
अपोलो हॉस्पिटलचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉ. बी. सुजित कुमार यांनी बीबीसीला कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चयापचय विषयक समस्यांविषयी माहिती दिली.
 
ते म्हणाले, "दीर्घ वेळ बसून राहिल्याने थायरॉईड सारख्या समस्या उद्भवू शकतात.'
 
शिवाय हे बदल आनुवंशिकही असल्याचं आपल्याला माहीत आहे.
 
अशा प्रकारच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या व्यायामाची पर्वा न करता बराच वेळ बसून राहणं चांगलं नाही. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
 
तुम्ही दर तासाला उठून पाच मिनिटे चालायला हवं.
 
काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना उभं राहून काम करण्याची पर्याय दिला आहे. मात्र तो पर्याय नाही. तुम्ही उठबस करून काम केलं पाहिजे.
 
खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. जंक फूडमधील स्टिरॉइड्स थेट शरीरात जातात. हे चरबी आणि यकृतामध्ये जमा होते. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
 
नियमित आरोग्य तपासणी करायला हवी.
 
व्हिटॅमिन बी 12, थायरॉईड, सीरम आयर्न यासारख्या चाचण्या कराव्यात.
 
तुमचं वय जर 40 वर्षांपेक्षा कमी असेल तर, वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करणं केव्हाही चांगलं. पण जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करायला हव्यात.
 
 

Published By- Priya Dixit